Mango Update : आंब्याच्या कलमांना सर्वसाधारणपणे ४ थ्या ते ५ व्या वर्षी आंबे लागतात. परंतु काही झाडांना दुसऱ्या वर्षीच मोहोर येतो. दुसऱ्या वर्षी आलेला मोहोर काढून टाकायचा असतो. फलधारणेसाठी त्यास वाढू द्यायचे नसते. आंब्याचे व्यापारीदृष्ट्या उत्पादन ८ व्या वर्षी चालू होते. काही झाडांवरील फळेसुद्धा विक्रीस नेतात. काही झाडांना मोहोर भरपूर येतो परंतु त्यापासून फळधारणा कमी होते. पुंकेसर असलेली फुले जर मोहोरलेल्या झाडात अधिक असतील तर ती साहजिकच गळून पडतील. तसेच मर्यादित किड्यांच्या हालचालीमुळे परागीकरण कमी प्रमाणात झाल्यास फळधारणा कमी प्रमाणात होते. तिसरे कारण म्हणजे भुरी व तुडतुड्यांपासून मोहराचे संरक्षण योग्य प्रमाणात होणे हे होय.
मिज माशी : आंब्याच्या मोहरावर मिज माशी अंडे घालते. गुलाबी रंगाच्या अळ्या पानाच्या व फळाच्या आतील भाग खाऊन टाकतात.
लक्षणे : मोहराच्या दांड्यावर प्रथम गाठी निर्माण होतात. नंतर त्या काळ्या पडतात. मोहराची व लहान फळांची गळ होते.
उपाययोजना- ०.०५ % फोस्फोमिडॉन, ०.५ % डायमिथोएटची फवारणी करावी.
मोहोरावरील भुरी रोग : या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव मोहोर तसेच फळांच्या देठावर होतो. प्रादुर्भाव झालेल्या ठिकाणी पांढऱ्या बुरशीची वाढ होते. देठावर, मोहरावर व कोवळ्या फळावर एक प्रकारचे बुरशीचे जाळे तयार होते. संपूर्ण झाडावर पांढऱ्या रंगाची पावडर आढळून येते. वाऱ्यामुळे हा रोग फैलावला जातो काही दिवसांनी मोहोर काळा पडून गळतो व कोवळी फळे गळून पडतात. फळनिर्मितीवर याचा विपरीत परीणाम होतो. फळधारणेच्या वेळी जेव्हा हवामान ढगाळ व हवेमध्ये आर्द्रता असते तेव्हा या रोगाचे प्रमाण वाढते.
उपाययोजना : या रोगाच्या नियंत्रणासाठी कीटकनाशकाच्या द्रावनामध्ये पाण्यात मिसळणारे गंधक २ ग्रॅम या प्रमाणात मिसळून फवारणी करावी. आंब्यावरील तुडतुडे, शेंडा पोखरणारी अळी आणि भुरी रोग नेहमी आंब्याच्या मोहरावर मोठ्या प्रमाणात आढळून येतात. आंबाच्या मोहोराचे संरक्षण करताना या किडींवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. तुडतुडे आंब्यावर नेहमीच आढळून येतात. मोहोर येण्यापूर्वी झाडावर कीटकनाशके, बुरशीनाशके मारणे अत्यावश्यक आहे. कारण झाडाच्या मोहोरावरील कीटकावर नियंत्रण ठेवणे अतिशय कठीण जाते.
मोहोरावरील पीक संरक्षणाची योग्य ती अंमलबजावणी केली तर तुडतुडे, खोडकिडा व मिज माशी या किडीवर नियंत्रण ठेवून त्यांचा प्रतिबंध करता येतो. आंब्याला मोहोर येण्यापूर्वी खोड, फांद्या आणि पाने यावर औषधाची फवारणी करावी. राहिलेल्या चार फवारण्या पंधरा दिवसांच्या अंतराने कराव्यात. शक्यतो दर फवारणीच्या वेळेस वेगवेगळी कीटकनाशके वापरावी. कीटकनाशकाच्या बरोबर पाण्यात मिसळणारे गंधक अथवा कार्बेन्डाझिम दुसऱ्या व चौथ्या फवारणीच्या वेळी मिसळून फवारावे. कीटकनाशकाच्या निवडीबरोबर त्याची मात्रा व वेळेवर फवारणी या बाबीसुद्धा तितक्याच महत्वाच्या आहेत.
लेखक - प्रा.अशोक म्हस्के, (उद्यानविद्या विभाग)
प्रा.दिपाली सातव, (कृषि महाविद्यालय,आष्टी)
Published on: 24 January 2024, 01:41 IST