भारतामध्ये डाळिंब हे १९८६ पर्यंत दुर्लक्षीत व कमी उत्पन्न देणारे पिक म्हणून ओळखले जायचे. परंतु कालांतराने औषधीय गुणधर्मामुळे याचे महत्व वाढीस लागून सन २००७-२००८ नंतर डाळिंबाखालील क्षेत्र व उत्पादन वाढले. अशाप्रकारे आवर्षणप्रवण भागातील शेतकऱ्यांना वरदान ठरलेले डाळींब सध्या वेगवेगळ्या अडचणीतून जात आहे. डाळींबावरील विविध समस्येपैकी तेलकट डाग रोग (बॅक्टेरियल ब्लाईट) ही एक मोठी समस्या आहे. या रोगाच्या प्रभावी नियंत्रणासाठी एकात्मिक रोग नियंत्रण पद्धतीचा वापर करणे गरजेचे आहे. त्याकरिता प्रतिबंधक उपाय योजना करणे आवश्यक आहे.
रोगाची ओळख:
डाळिंबावरील बॅक्टेरियल ब्लाईट रोग (तेल्या) हा प्रामुख्याने जिवाणूजन्य असून झॅन्थोमोनास अक्झानोपोडीस पिव्ही पुनीकीया जिवाणूमुळे होतो. या रोगास “अनुजीवजन्य करपा” असेही म्हणतात. महाराष्ट्रात या रोगाचा शिरकाव रोगग्रस्त कलमाद्वारे झालेला असुन, या रोगाचा प्रादुर्भाव सर्वप्रथम कर्नाटक राज्याच्या सीमेलगतच्या भागात डाळिंबाच्या “रुबी” या जातीवर सर्वप्रथम दिसुन आला.
रोगाची लक्षणे: तेलकट डाग रोगाचा प्रादुर्भाव पाने, फुले, खोड आणि फळांवर होतो.
- पान:
सुरुवातीस पानावर लहान तेलकट किंवा पानथळ डाग दिसतात. हे डाग कालांतराने काळपट होतात व डागाभोवती पिवळे वलय दिसते तसेच ते मोठे होऊन तपकिरी ते काळ्या रंगाचे होतात. उन्हात हे डाग बघितले की तेलासारखे चमकतात. डाग मोठा झाल्यावर पाने पिवळी पडून गळतात. - फुल:
फुलांवर व कळ्यांवर गर्द तपकिरी व काळपट डाग पडतात. पुढे यामुळे फुलांची व कळ्यांची गळ होते. - खोडावरील व फांद्यांवरील:
प्रामुख्याने खोडावर व फांद्यांवर सुरुवातीला काळपट किंवा तेलकट डाग गोलाकार दिसतात. खोडावर या डागाने गर्दलिंग किंवा खाच तयार होते व तेथुन झाड मोडते. तसेच फांद्यांवर डागांची तीव्रता वाढल्यावर फांद्या डागापासून मोडतात. - फळ:
फळावर सुरुवातीला एकदम लहान आकाराचे पानथळ तेलकट डाग दिसतात. कालांतराने हे डाग तपकिरी काळपट दिसतात व त्यावर भेगा पडतात. फळांवर लहान डाग एकत्र आले, की मोठ्या डागात रुपांतर होते. फळांवर या डागांमुळे आडवे उभे तडे जातात. फळाची प्रत पूर्णपणे खराब होते. तडे मोठे झाल्यावर फळे इतर कारणाने सडतात आणि गळून पडतात.
रोगास अनुकूल बाबी:
- या रोगाच्या जीवाणूंची वाढ २८ ते ३२ अंश सेल्सिअस तापमान तसेच वातावरणातील आर्द्रता ८० टक्क्यापेक्षा जास्त असल्यास झपाट्याने होते.
- बागेत किंवा बागेशेजारी तेलकट डाग रोगाचे अवशेष असणे.
- बागेत अस्वच्छ्ता असणे म्हणजेच तणांची मोठया प्रमाणावर वाढ असणे.
- झाडांची गर्दी, खेळत्या हवेचा तसेच सुर्यप्रकाशाचा अभाव असणे.
- ढगाळ व पावसाळी हवामान, वादळी पाऊस आणि वातावरणातील आर्द्रता जास्त असणे.
- रोगग्रस्त बागेतील गुटी कलमांचा वापर.
रोग प्रसार:
याचा प्रसार प्रामुख्याने बॅक्टेरियल ब्लाईटग्रस्त मातृवृक्षापासून बनविलेल्या रोपांद्वारे होतो. याशिवाय रोगट डागांवरून उडणारे पावसाचे थेंब, पाट पध्दतीने दिलेले ओलिताचे पाणी, निर्जंतुकीकरण न करता वापरण्यात येणारी छाटणीची अवजारे, शेतमजुरांचे आवागमन तसेच विविध किटकांद्वारे या रोगाचा प्रसार होतो.
तेल्याचे एकात्मिक रोग नियंत्रण:
- रोप कॅल्शियम हायड्रोक्लोराईडने निर्जंतुक केलेल्या खड्यात लावावे (१०० ग्रॅम /खड्डा).
- रोपांची लागवड कमीत कमी ४.५ मी.×३.० मी. अंतरावर करावी आणि प्रत्येक ठिकाणी तीन खोड ठेवावीत.
- स्वच्छता मोहिम काळजीपूर्वक राबवावी. खाली जमिनीवर पडलेली पाने गोळा करुन नष्ट करावेत.
- बहार धरताना जमिनीवरील रोगट जिवाणूंची संख्या कमी करण्यासाठी ब्लिचिंग पावडर १५० ग्रॅम प्रति ५-६ लिटर पाण्यात मिसळुन झाडाखाली भिजवण करावी किवा झाडाखाली भुकटी हेक्टरी २० किलो धुरळावी.
- फळे काढणी पावसाळ्यात झाली असेल तर ब्रोमोपॉल ५०० पीपीम फवारावे (ब्रोमोपॉल ५० ग्रॅम प्रति १०० लि. पाणी).
- संपूर्ण फळे काढणी झाल्यानंतर बागेला 3 महिने विश्रांती द्यावी.
- बहार घेण्यापूर्वी संपूर्ण पानगळ करून घ्यावी (इथरेल १ ते २ मिली/लिटर) रोगट फाद्यांची छाटणी करावी.
- खाली पडलेली संपूर्ण पाने व छाटलेले रोगट अवशेष गोळा करून जाळून टाकावेत.
- झाडाच्या फांद्या प्रादुर्भाव झालेल्या भागाच्या २ इंच खालुन छाटाव्यात.
- छाटणी करताना कात्री प्रत्येकवेळी १ टक्का डेटोलच्या द्रावणात निर्जंतुक करुन घ्यावी.
- छाटणी झाल्यानंतर लगेच कापलेल्या भागावर १० टक्के बोर्डोपेस्ट लावावी.
- झाडाच्या खोडाला निमओईल + बक्टेरियानाशक (५०० पीपीएम)+कॅप्टन ०.५ टक्के याचा मुलामा द्यावा.
- पानगळ व छाटणीनंतर बक्टेरियानाशक (५०० पीपीएम)+कॅप्टन ०.५ टक्के यांची फवारणी करावी.
- नविन पालवी फुटल्यावर बक्टेरियानाशक (२५० पीपीएम)/बोर्डोमिश्रण (१ टक्का) / कॅप्टन (०.२५ टक्के) ची फवारणी करावी.
रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास खालील ४ फवारण्या ५ दिवसांच्या अंतराने कराव्यात तसेच प्रत्येक फवारणीपूर्वी तेलकट व रोगट फळे तोडून टाकावीत.
- पहिली: कॉपरहायड्रॉक्साईड २ ग्रॅम अधिक स्ट्रेप्टोमायसिन* ०.५ ग्रॅम अधिक ब्रोनोपॉल ०.५ ग्रॅम अधिक सर्फेक्टंट ०.५ मि.लि. प्रतिलिटर पाणी.
- दुसरी: कार्बेन्डाझिय १ ग्रॅम अधिक स्ट्रेप्टोमायसिन* ०.५ ग्रॅम अधिक ब्रोनोपॉल ०.५ ग्रॅम अधिक सर्फेक्टंट ०.५ मि.लि. प्रतिलिटर पाणी.
- तिसरी: कॉपर ऑक्झिक्लोराईड २.५ ग्रॅम अधिक स्ट्रेप्टोमायसिन* ०.५ ग्रॅम अधिक ब्रोनोपॉल ०.५ ग्रॅम अधिक सर्फेक्टंट ०.५ मि.लि. प्रतिलिटर पाणी.
- चैाथी: मँकोझेब (७५ टक्के विद्राव्य) २ ग्रॅम अधिक स्ट्रेप्टोमायसिन* ०.५ ग्रॅम अधिक ब्रोनोपॉल ०.५ ग्रॅम अधिक सर्फेक्टंट ०.५ मि.लि. प्रतिलिटर पाणी.
टीप:
- सदर औषधांची फवारणी फळ काढणीच्या ३० दिवसापुर्वी बंद करावी. पावसाळी हंगामात ही फवारणी फळ काढणीच्या २० दिवसापुर्वी बंद करावी.
- स्ट्रेप्टोमायसिन* या मध्ये स्ट्रेप्टोमायसिन सल्फेट ९० टक्के अधिक टेट्रासायक्लीन हायड्रोक्लोराइड १० टक्के आहे.
डॉ. दत्तात्रय भा. गावडे
विषयतज्ञ (पिक संरक्षण)
कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव, पुणे
7028779777
Published on: 09 August 2018, 10:06 IST