लिंबू फळबागेसाठी लिंबू ची जात, लागवडीसाठी योग्य जमीन इत्यादी गोष्टी महत्त्वाच्या असतात. लागवडीनंतर पहिल्या वर्षापासून जर आपण लिंबू फळ पीकला योग्य प्रमाणात रासायनिक आणि सेंद्रिय खतांचा पुरवठा केल्यास त्याची वाढ चांगली होते व त्यापासून सातत्यपूर्ण व चांगले उत्पादन मिळवणे शक्य होते. या लेखात आपण लिंबू फळबाग विषयी माहिती घेणार आहोत.
- लिंबू लागवडीसाठी आवश्यक जमीन:
लिंबू लागवड करण्यासाठी प्रामुख्याने मध्यम काळी, मुरमाड, पाण्याचा निचरा होणारी तसेच उदासीन सामू असणारी जमीन फायदेशीर ठरते. ज्या जमिनीत लागवड करायची त्यामध्ये चुनखडी नसावी. क्षारांचे प्रमाण हे साधारणतः 0.50 डेसी. सा. प्रति मीटरपेक्षा कमी तसेच ई. सो. टक्केवारी म्हणजेच (ई एस पी प्रती उपलब्ध होण्याचे प्रमाण) दहा टक्क्यांपेक्षा कमी असलेली जमीन लागवडीसाठी फारच फायदेशीर असते.
- लिंबू फळ पिकाची लागवड पद्धत:
लिंबाची लागवड करण्यासाठी सहा बाय सहा मीटर अंतरावर तीन बाय तीन बाय तीन फूट आकाराचे खड्डे खोदावेत. लिंबाची लागवड करण्यापूर्वी कार्बेन्डाझिम दोन ग्रॅम अधिक क्लोरोपायरीफॉस 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाणी या द्रावणाने खड्ड्यांचे निर्जंतुकीकरण करावे. जेव्हा खड्डा भराल तेव्हा त्यात शेणखत दहा किलो, एस एस पी दोन किलो, निंबोळी पेंड एक किलो आणि ट्रायकोडर्मा 25 ग्रॅम पोयटा मातीमध्ये मिसळून घ्यावे. मग लिंबू कलमांची लागवड करावी.
- जातींची निवड करताना घ्यायची काळजी:
लागवड करण्यासाठी विशिष्ट रोगांना तसेच किडींना प्रतीकार क्षम असलेल्या जातींची निवड करावी. रोप घेताना ह्या खात्रीलायक रोपवाटिका मधूनच घ्यावीत.
- लिंबू पिकासाठी ठिबक सिंचनाद्वारे अन्नद्रव्य व्यवस्थापन:
अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी शिफारशीच्या मात्रांचा 80% प्रति झाडासाठी प्रति वर्षासाठी दीड महिन्याच्या अंतराने समान हप्त्यात ठिबक सिंचनाद्वारे द्यावे. 1875 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट प्रति झाड द्यावे. सिंगल सुपर फॉस्फेट हे 15 किलो निंबोळी पेंड अधिक 15 किलो सेंद्रिय खतांबरोबर द्यावे.
- लिंबू पिकासाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन:
लिंबू हे पीक संवेदनशील असून त्यामध्ये अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे विविध विकृती दिसून येतात. त्या टाळण्यासाठी संयुक्त मिश्र खतांची फवारणी करावी. एका वर्षातून साधारणपणे दोन वेळा झिंक सल्फेट, मॅग्नेशियम सल्फेट, मॅंगेनीज सल्फेट प्रत्येकी पाच ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
त्यासोबतच फेरस व कॉपर सल्फेट यांची प्रत्येकी तीन ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. तसेच सेंद्रिय खते देतांना प्रति झाड 500 ग्रॅम व्हॅम, 100 ग्रॅम स्फुरद विरघळणारे जिवाणू तसेच 100 ग्रॅम ऍझोस्पिरीलम अधिक 100 ग्रॅम ट्रायकोडर्मा हरजियानम द्यावे.
वरील खतांची मात्रा देताना नत्रयुक्त खतांची मात्रा प्रति झाडासाठी समान तीन हप्त्यांमध्ये विभागून द्यावी. म्हणजेच जानेवारी, जुलै आणि नोव्हेंबर मध्ये देणे फायद्याचे असते. तसेच झाडाच्या नत्राच्या एकूण गरजेपैकी 50 टक्के मात्र रासायनिक खतांद्वारे द्यावी आणि उरलेली मात्र सेंद्रिय खते किंवा निंबोळी पेंड च्या स्वरूपात द्यावी. योग्य फळधारणा झालेल्या झाडासाठी 15 किलो निंबोळी पेंड आणि 15 किलो सेंद्रिय खत वापरावे.
Published on: 13 July 2021, 11:38 IST