या विकृतीमुळे पिकाचे खूपच नुकसान होते. ही विकृती गड्ड्यातील अंतर्गत पानांच्या वरच्या बाजूस तसेच गड्डा झाकलेल्या पानांवर आढळून येते. प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असल्यास संपूर्ण गड्ड्यातील पाने सडू लागतात आणि गड्डा विक्रीस अयोग्य होतो. या विकृतीचा प्रादुर्भाव गड्डा काढणीच्या अवस्थेत आढळून येतो.
जमिनीचे तापमान आणि हवेतील तापमानामध्ये जेव्हा जास्त फरक असतो तेव्हा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळून येतो.
कॅल्शियमची कमतरता असल्यास ही विकृती दिसून येते. जमिनीचा सामू ५.५च्या खाली (आम्ल धर्मी) असल्यासही प्रादुर्भाव आढळतो.
नियंत्रण : या विकृतीच्या नियंत्रणासाठी पाणी अतिशय काळजीपूर्वक द्यावे. विकृतीला प्रतिकारक जातींची लागवडीसाठी निवड करावी. लागवडीआधी माती परीक्षणाच्या अहवालानुसार कॅल्शियम क्लोराइड एकरी १० किलो द्यावे. जमिनीचा सामू ५.५ ते ६.५ च्या दरम्यान असावा.
पीक काढणी :
नुसत्या पानांच्या (लिफलेट्यूस) जातीच्या लेट्युसची काढणी पाने कोवळी असतानाच करावी.
गड्डा लेट्युसची काढणी गड्डा पूर्ण तयार झाल्यावर करतात. गड्डा काढतांना जमिनीच्या थोडे खाली धारदार चाकूने कापून काढतात.
अंदाजे ४५० ते ५०० ग्रॅम वजनाच्या गड्ड्यांची काढणी करावी. एकरी १२ ते १३ टन विक्रीलायक गड्डे मिळतात. गड्ड्यांवर सकाळी दव आढळून आल्यास दवाचे प्रमाण कमी झाल्यावर काढणी करावी.
पॅकिंग :
लेट्युसचे गड्डे पॅकिंग शेडमध्ये आणून आकार, वजनांप्रमाणे त्यांची प्रतवारी करावी. वायुविजनासाठी असलेल्या छिद्रांच्या कोरूगेटेड बॉक्सेसमध्ये दोन डझन गड्डे दोन थरांमध्ये पॅक करून बाजारपेठेत पाठविता येतात.
बॉक्सेसमध्ये गड्डे भरताना बॉक्सेसच्या तळाकडील भागात गड्ड्यांच्या खोडाकडील बाजू ठेवावी,
तर दुसरा भाग भरण्याच्या वेळी पहिल्या थरावर गड्ड्याची वरची बाजू ठेवावी व पॅकिंग करावे. यामुळे मालाला वाहतुकीमध्ये इजा होणार नाही.
प्री कूलिंग व कोल्ड स्टोरेज :
पूर्व शीतकरण (प्री कूलिंग) व शीतगृह (कोल्ड स्टोरेज) यांची सुविधा असल्यास उत्तम. अशा ठिकाणी गड्ड्यांची प्रतवारी व पॅकिंग केल्यावर बॉक्सेस पूर्व शीतकरण करण्यासाठी शून्य ते दोन अंश से. तापमान व ८० ते ९० टक्के सापेक्ष आर्द्रतेत ठेवावेत. शीतगृहात लेट्युसचे गड्डे तीन ते चार आठवड्यांपर्यंत शून्य अंश से. तापमान आणि ९० ते ९५ टक्के सापेक्ष आर्द्रतेमध्ये साठवून ठेवता येतात.
Published on: 24 March 2022, 02:48 IST