Horticulture

जमिनित फळबाग लागवड करताना जमिनीची निवड या विषयाला सर्वात शेवटी प्राधान्य दिले जाते. जर जमिनीचा पोत चांगला नसला तर फळबागेची वाढ समाधानकारक होत नाही म्हणून फळबाग लागवडीपूर्वी जमिनीची योग्यता तपासून घेणे गरजेचे आहे.

Updated on 24 February, 2021 4:07 PM IST


जमिनित फळबाग लागवड करताना जमिनीची निवड या विषयाला सर्वात शेवटी प्राधान्य दिले जाते. जर जमिनीचा पोत चांगला नसला तर फळबागेची वाढ समाधानकारक होत नाही म्हणून फळबाग लागवडीपूर्वी जमिनीची योग्यता तपासून घेणे गरजेचे आहे. महाराष्ट्र राज्यात फळबागेखालील क्षेत्र दिवसेंदिवस वाढत चालले आहे. फळांना बाजारात असलेली वाढती मागणी, चांगल्या बाजारभावांची अपेक्षा, उपलब्ध आधुनिक तंत्रज्ञान आणि त्यानुसार मिळणारे अपेक्षित उत्पादन, पाण्याची मर्यादित गरज अशा विविध कारणांमुळे शेतकरी फळबागांकडे वळत आहेत. परंतु यात प्रामुख्याने एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जे शेतकरी आधुनिक तंत्रज्ञान पूर्णपणे वापरतात त्यांनाच चांगले उत्पादन मिळते.

फळबाग लागवड करताना शेतकरी सर्वप्रथम त्या फळांना असणारा बाजारभाव यांचा विचार करतो, त्यानंतर आपणाकडे उपलब्ध असलेल्या पाण्याचा विचार करतो. त्यानंतर पीक लागवडीनंतर त्यावर येणारे गंभीर रोग आणि किडींचा विचार करतो. या येणाऱ्या रोगाचा आणि किडींचा बंदोबस्त शक्य आहे का याचा विचार करतो. परंतु ज्या जमिनीवर फळबाग लागवड करावयाची आहे त्या जमिनीचा विचार फारसा लक्षात घेतला जात नाही. आपणाकडे असणारी जमीन कोणत्या फळबागेस योग्य याचा विचार लागवडीपूर्वीच केला पाहिजे. बऱ्याचवेळा शेतकरी फळबागेची लागवड करतात.

सुरुवातीस फळबागेची वाढ अपेक्षेप्रमाणे समाधानकारक असते. परंतु ३-४ वर्षानंतर फळझाडाची वाढ मंदावते. झाडाची पाने सुकल्यासारखी दिसतात नंतर ती पूर्णपणे वाळतात. काही भागात तर १० ते १५ फुट वाढलेली आंब्याची, चिकूची झाडे उन्मळून पडलेली आहेत आणि मग नेमके चुकले कुठे याचा विचार सुरू होतो. याचाच अर्थ असा की, जी जमीन फळबागेसाठी निवडली आहे ती त्यासाठी योग्य नाही. म्हणून फळबाग लागवडी अगोदर त्यादृष्टिने जमिनीची योग्यता तपासून घेणे खूपच महत्त्वाचे आहे. अन्यथा ज्यावेळी झाडांना फळांची अपेक्षा असते. त्याचवेळी झाडे मरण्यास किंवा सुकण्यास सुरुवात होते. त्यासाठी फळबाग लागवडीपूर्वी जमिनीची कोणती माहिती घ्यावी हे समजावून घेणे गरजेचे आहे. यातील प्रमुख मुद्यांची माहिती या लेखात दिली आहे.

१) माती परीक्षण :

माती परीक्षणाचे महत्त्व आता शेतकऱ्यांच्या लक्षात येत आहे. त्यानुसार बरेच शेतकरी पीक लागवडीपूर्वी माती परीक्षण करून घेतात आणि त्यानुसार खतांचा वापर करतात. परंतु यात अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी की, आपण प्रचलित पद्धतीने माती परीक्षण करून त्यानुसार फळझाडांची त्या जमिनीसाठी निवड ठरवू शकत नाही. कारण यासाठी आपण मातीचा नमूना सर्वसाधारण ३० सें.मी. पर्यंतच्या घेतलेला फुटापर्यंत खड्डा घेतलेला असतो. त्यात शेणखत, सुपर फॉस्फेट, फॉलीडाल काही वेळेला पोयटा माती भरतो आणि त्यात रोप लावतो. त्यामुळे सुरुवातीस झाडांची वाढ चांगली होते पण जसजशी झाडांची मुळे खोल जाण्यास सुरुवात करतात तसतशी झाडांच्या वाढीवर परिणाम दिसून येतो. याचे प्रमुख कारण म्हणजे ज्या खोलीपर्यंत मुळे गेलेली असतात त्या ठिकाणी असलेली परिस्थिती बऱ्याच वेळा अशा ठिकाणी चुनखडीचे प्रमाण अधिक असते.

काही क्षारांचे प्रमाण अधिक असते किंवा अतिशय कठीण थर असतो. यामुळे मुळांना नीट वाढता येत नाही. जर चुनखडी जास्त असेल तर माती चिकट असते. मुळांना त्यात वाढता येत नाही. हवेचे प्रमाण कमी असल्याने मुळे गुदमरून जातात व ती हवेच्या दृष्टिने आणि वाढीसाठी धडपडतात त्यांचा केसांच्या पुजक्यासारख्या गुंता होतो. जास्त ओलसरपणामुळे ती कुजतात व मुळांच्या गुंत्यामुळे झाडांना पुरेसा भक्कम आधार मिळत नाही. त्यामुळे ती वाऱ्याने कोलमडतात. पांढरी मुळे कमी होतात. अन्नद्रव्यांचे पुरेशा प्रमाणात शोषण होत नाही व झाडांच्या वाढीवर अनिष्ठ परिणाम होतो. यामध्ये आपण केलेला खर्च, वेळ वाया जातो. कारण झाडे वाचविण्यासाठी आपण   वेगवेगळी औषधी वापरत असतो, यामुळे खर्चात वाढ होते. झाडांमध्ये सुधारणा होण्याची शक्यता खूप कमी असते. कारण जमिनीतील चुनखडी जर साधारण १० टक्क्यांपेक्षा जास्त असेल. तर त्याचे दुष्परिणाम अटळ असतात.

 


आपण जर ३० सें.मी. पर्यंत खोलीच्या मातीच्या नमुना तपासणीस पाठवला आणि त्यात चुनखडी कमी असली तर आपणास भविष्यातील धोका लक्षात येत नाही. कारण चुनखडी जर ३ फुटापेक्षा अधिक खोलीवर असली तर मुळे त्या खोलीपर्यंत जाईपर्यंत झाडांवर दुष्परिणाम दिसणार नाही आणि २-३ वर्षांनी या थरातील चुनखडीचे दुष्परिणाम दिसतात. यासाठी 'माती परीक्षण करण्यास देण्यापूर्वी मातीचा नमुना वेगळ्या 'पद्धतीने घ्यावा.

सर्वसाधारण ४ ते ५ फुटापर्यंत जमिनीत खड्डा घ्यावा. एक एकर क्षेत्रात एक प्रकारच्या ठिकाणी ३० खड्डे घ्यावेत. या खड्डयातून पहिला १ फुट, २ फुट, ३ फुट, ४ फुट अशा वेगवेगळ्या खोलीच्या ठिकाणापासून माती घ्यावी. ती एकत्र न मिसळता प्रत्येत फुटाची माती घ्यावी. सर्व खड्ड्यातील एका खोलीची माती एक करावी अशी प्रत्येक खोलीच्या थराची स्वतंत्र माती एक करून त्याचे वेगवेगळे नमुने प्रयोगशाळेत पाठवून त्याचे परीक्षण करून घ्यावे. त्यामध्ये जमिनीच्या सामू, क्षाराचे प्रमाण, चुनखडीचे प्रमाण, जलधारणा शक्ती उपलब्ध अन्नद्रव्य तपासून घ्यावेत.  यामुळे आपणास जमिनीत नक्की कुठल्या थरात चुनखडी किती आहे, क्षार किती आहे इत्यादिची माहिती मिळेल व त्यावरून फळझाडांची निवड करता येईल. चुनखडी काही फळझाडांना अधिक बाधक आहे तर काही पिकाना कमी बाधक आहे. चुनखडी अधिक असेल तर आवळा, चिच, जांभूळ यांना कमी बाधक आहे. तर आंबा, चिकू, डाळिंब याना त्रासदायक ठरते.

चुनखडी प्रमाणेच जर जमिनीत काळी पाषाण, किंवा कडक मुरूम देखील बाधक असतो. आंबा, चिकू, इ. झाडांची फळे खोलवर जातात ती जेव्हा या कडक भागात येतात तेव्हा झाडांची वाढ खुंटते कारण मुळे पुढे जात नाहीत. अन्नद्रव्यांचे शोषण नीट होत नाही आणि झाडे गळून जातात. माती परीक्षणात पुढील बाबी अतिशय महत्त्वाच्या आहेत. 

अ) जमिनीचे भौतिक गुणधर्म :

मातीमधील चिकण माती, वाळू, पोयटा यांचे प्रमाण किती आहे. यावरून मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता, सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण, अन्नद्रव्ये पुरवठा करण्याची क्षमता समजते. जास्त पाणी धरून ठेवण्याची क्षमता ही चिकण माती, वाळू यावरून ठेवते. पाण्याच्या निचरा देखील यांच्या प्रमाणावर ठरतो. मातीने गरजेएवढेच पाणी धरून ठेवले पाहिजे नाहीतर मुळे कुजण्याचा धोका संभवतो. जर पाणी अजिबात धरून ठेवले नाही तर पिकास पाणी कमी पडून ते सुकण्याची शक्यता असते. यासाठी सेंद्रिय खतांचा वापर वाढवावा लागतो, यासाठी जमिनीतून निचरा चांगला असावा. हवा खेळती असावी. जमिनितील पाण्याची पातळी खूप वर असू नये, जमिनीची खोली पुरेशी असावी. एकदम खोल काळ्या जमिनी किंवा हलक्या जमिनी उत्पादनास पोषक नसतात मध्यम पोताच्या जमिनी. फळबागेस उत्तम असतात. जमिनीचे तापमान २६ से ते ३२० से इतके असल्यास फळबागेस फायदेशीर ठरते.

ब) जमिनीचे रासायनिक गुणधर्म :

१) जमिनीचा सामू :

सर्वसाधारणपणे जमिनीचा सामू ६ ते ८ पर्यंत फळबागेसाठी चांगला असतो. खास चोपण जमिनीत फळबाग घेणे टाळावे. सोडियमचे क्षार ०.९ टक्के पेक्षा जास्त असू नयेत. अन्नद्रव्यांची उपलब्धता जमिनीच्या सामू वर अवलंबून असते उदा. बोरॉन  पण जमिनीत कमी असतो तर आम्लधर्मी जमिनीत तो उपलब्ध नसतो. आम्लधर्मी जमिनीत कॅल्शियम व मॅग्नेशियम कमी असतो तर लोहाचे प्रमाण चांगले असते. जमिनीचा सामू जास्त असेल तर तो कोणत्या क्षारामुळे वाढला आहे ते तपासावे.

२) जमिनीत क्षार :

जमिनीची विद्युत वाहकता तपासल्यास क्षारांचे प्रमाण समजते. विद्युत वाहकता ६ ते ८ डेसी/मी पर्यंत असल्यास क्षार सहनशील फळपिके उदा. पेरु, चिकू, अंजीर, द्राक्ष, आवळा, बोर, फालसा घ्यावी. जर क्षारांचे प्रमाण ३ ते ६ डेसी/मी पर्यंत असेल तर क्षारांना मध्यम सहनशील फळपिके उदा. आंबा, डाळिंब, लिंबू, घ्यावी. संत्र्यासाठी १.५ ते ३.० डेसी/मी. पर्यंत क्षार चालू शकतात.

 


महाराष्ट्रात लागवड होत असणाऱ्या प्रमुख फळबागेसाठी सर्वसाधारण जमीन कशी असावी याची माहिती पुढे दिली आहे.

१) आंबा :

आंब्यासाठी लालसर पोयट्याची जमीन उत्तम जमिनीचा सामू ६ ते ७.२ पर्यंत असावा. चोपण जमीन, खूप हलकी, कठीण मुरुम, पाषाण असणारी जमीन आंब्यासाठी अयोग्य असते. डोंगर उताराच्या जमिनीवर आंब्याचे उत्पादन कमी मिळते. चुनखडीचे प्रमाण १० टक्क्यांपेक्षा कमी असावे. खूप खोलीच्या चिकणमाती अधिक असणाऱ्या जमिनीत आंबा लागण टाळावी. कारण यात क्षारांचे प्रमाण अधिक आणि कमी निचरा असतो. जमिनीत उतार माफक असावा व पावसाचे पाणी साठून राहू नये. खूप उताराच्या जमिनीत पाणी वाहून जाण्याचे प्रमाण अधिक असल्याने आंबा पिकास पाणी वारंवार द्यावे लागते. आंब्याची मुळे खूप खोल जात असल्याने मुळे खोलवर जातील या दृष्टिने फुटणारा मुरुम असणारी जमीन आंब्यास मानवते.

२) चिकू :

चिकूची वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनीत लागवड करतात. चिकूसाठी खोल जमीन, वालुकामय पोयटा, उत्तम निचरा होणारी जमीन चांगली असते. जमिनीचा सामू ६ ते ८ पर्यंत असावा. उथळ जमीन व कडक मुरुम, पाषाण आणि अधिक चुनखडी असणाऱ्या जमिनीत चिकूची लागवड करू नये. पाण्यातून जाणाऱ्या क्षारांना चिकू प्रतिबंधक आहे. अशा क्षारांना चिकू फारसा जुमानत नाही.

३) पेरु :

पेरूसाठी हलकी वालुकामय पोयटा व चिकण पोयटायुक्त जमिनी उत्तम असतात. नदीकाठच्या जमिनीत पेरू चांगले उत्पादन मिळते, पेरुची मुळे वरच्या थरात अधिक असतात. पेरुस जमिनीचा सामू ४.५ ते ८.२ या दरम्यान असला तरी मानवतो. क्षारास थोड्या फार प्रमाणात सहनशील आहे.

४) डाळिंब :

डाळिंबासाठी उत्तम निचरा असणारी हलकी ते मध्यम हलकी जमीन असावी. जमिनीचा सामू ५.५ ते ७.० इतका असावा. चोपण, क्षारयुक्त जमिनीत डाळिंबाची लागवड करू नये. चिकणमाती भरपूर असलेल्या जमिनीत निचऱ्याचा प्रश्न असल्याने अशा जमिनीत डाळिंब लावू नये. हलक्या जमिनीत आकर्षक रंगाचे चांगल्या प्रतीच्या डाळिंबाचे उत्पादन मिळते.

५) लिंबूवर्गीय फळझाडे :

लिंबू हे बऱ्याच प्रकारच्या जमिनीत चांगले उत्पादन देते तरी पण चांगला निचरा असणाऱ्या जमिनीत विशेषतः पोयट्याच्या किंवा वालुकामय पोयट्यात या पिकाचे उत्पादन चांगले मिळते. क्षारयुक्त चिकणमातीयुक्त आणि जास्त चुनखडीयुक्त जमिनीत लिंबू व इतर फळझाडांची वाढ मंदावते जमिनीचा सामू ५.५ ते ६.५ असल्यास या फळझाडास फायदा होतो.

अंजीर :-

अंजीर पिकास हलकी, पोयट्याची तसेच चिकण माती परंतु अत्यंत निचरा असणारी जमीन असावी. खूप आम्लधर्मी जमीन अंजीर पिकास अयोग्य असते. जमिनीचा सामू ६.० ते ६.५ असल्यास फायदेशीर ठरतो. क्षारयुक्त जमिनीस अंजीर कमी प्रतिसाद देते आणि उत्पादन घटते.

७) सीताफळ :

सीताफळाची लागवड हलक्या तसेच वालुकामय पोयट्याच्या जमिनीत करावी. खूप चिकणमाती असणाऱ्या जमिनीत मुळकूज होण्याच्या शक्यतेने अशा जमिनीत सीताफळाची लागवड करू नये. जमिनीचा सामू ६.५ ते ७.६ असल्यास वाढीस फायदा होतो.

८) आवळा :

आवळ्यासाठी क्षारयुक्त आणि चोपण जमीन असली तरीदेखील उत्पादन चांगले मिळते. त्यास जमिनीचा सामू ६.५ चे ९.५ इतका असला तरी उत्पादन चांगले मिळते.

९) पपई :

पपई लागवडीस उत्तम निचऱ्याची जमीन आवश्यक असते गाळाची जमीन उत्तम, जमिनीचा सामू ६.५ ते ७.० दरम्यान असावा. पपईची मुळे खूप खोल जात नसल्याने जमिनीस खोली कमी असली तर पपई लागवड करता येते. जमिनीत पाणी साठले तर पिकास खूप हानीकारक ठरते. म्हणून खूप काळ्या जमिनीत पाणी धरून ठेवणाऱ्या जमिनीत पपई लागवड करू नये.

वरील सर्व बाबींचा विचार करून आपल्या जमिनीत कोणती फळबाग लावावी हे ठरविता येईल. तसेही जमिनी इतकेच आपल्या भागांतले हवामान हे ही तितकेच महत्त्वाचे आहे. हे लक्षात घ्यावे आणि लागवड करून नंतर उपाययोजना करण्यापेक्षा फळबाग लागवडीपूर्वीच शास्त्रीय विचार करून फळबाग लागवड करावी.

लेखक :-

  • शुभम विजय खंडेझोड

            (एम.एस.सी भाजीपाला शास्त्र) उद्यानविद्या विभाग,

            डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.

           डॉ. ज्ञानेश्वर सुरेश रावनकर

(एम.एस.सी, पी. एच.डी. भाजीपाला शास्त्र)

उद्यानविद्या विभागडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.

English Summary: It is important to check the suitability of the soil before planting orchards
Published on: 14 October 2020, 01:12 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)