सीताफळ हे कोरडवाहू तसेच डोंगराळ भागातील प्रमुख फळपीक म्हणून सुपरिचित आहे.महाराष्ट्रातील पुणे, जळगाव,धुळे आणि बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सीताफळाची लागवड झालेली आढळून येते.मराठवाड्यातील बालाघाटच्या डोंगररांगामध्ये सीताफळ हे नैसर्गिकरित्या वाढलेले दिसते.भविष्यात या दुर्लक्षित व विनाखर्चिक फळपिकाकडे शास्त्रीय दृष्टीकोनातून बघणे गरजेचे दिसून येत आहे. सहसा या फळपिकावर किडींचा व रोगांचा प्रादुर्भाव जास्त दिसून येत नाही. परंतु बदलत्या वातावरणीय परिस्थितीमुळे पिठ्या ढेकूण या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढतांना दिसून येत आहे.
सीताफळ या फळपिकावर सहसा कीड व रोगांचा प्रादुर्भाव होत नसला तरी बदलत्या हवामानामुळे त्यावर किडींचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आढळून येतो. यामुळे याचे नियोजन करणे आवश्यक आहे. सीताफळाची व्यावसायिकदृष्ट्या लागवड करण्यासाठी रोग व किडींचे नियंत्रण करणे गरजेचे आहे. आजच्या लेखात आपण याचविषयी माहिती घेणार आहोत.
सीताफळ या पिकाचे पीक संरक्षणाचे तीन भाग पडतात :-
१) सीताफळावरील किडी व त्यावरील उपाय.
२) सीताफळावरील रोग व त्यावरील उपाय.
३) सीताफाळाच्या शारीरिक विकृती व त्यावरील उपाय.
महत्त्वाच्या किडी आणि त्यांचे नियंत्रण :
- पिठ्या ढेकूण (पांढरे ढेकूण, मेण कीडे, किंवा मिलीबग
ही कीड पाने,कोवळ्या फांद्या,कळ्या आणि कोवळी फळे यामधून रस शोषण करते. त्यामुळे पानांचा व फळांचा आकार वेडावाकडा होतो. कळ्या व फळे गळतात. अशा फळांना बाजारभाव कमी मिळतो. या किडीचा प्रादुर्भाव पावसाळ्यानंतर जास्त आढळतो. या किडीच्या अंगातून स्त्रवणाऱ्या मधासारख्या चिकट पदार्थावर काळी बुरशी चढते. त्यामुळे झाडांची पाने काळी पडून प्रकाश संश्लेषणाची क्रिया मंदावते.
नियंत्रण :-
- कीडग्रस्त फांद्या व पाने काढून त्यावर १० टक्के कार्बारिल भुकटी टाकून ती गाडावीत.
- मिलीबगला खाणारे परभक्षी किटक क्रिटोलिमस मोन्टोझरी प्रती एकरी ६०० ग्रॅम या प्रमाणात १५ दिवसांच्या अंतराने ३ ते ४ वेळा बागेत झाडावर सायंकाळच्या वेळेत सोडावेत.भुंगेरे सोडल्यानंतर कोणत्याही प्रकारचे किटकनाशक बागेवर फवारू नये.
- व्हर्तीशिलीयम लिकॅनी (फुले बगीसाइड) हे जैविक बुरशीनाशक ४० ग्रॅम +५० ग्रॅम फिश आइल रोझीन सेप प्रती १० लिटर पाण्यातून आर्द्रतायुक्त हवामानात फवारावे.
- मिलीबगला मारक पण परभक्षी किटकांना कमी हानीकारक डायक्लोरोव्हॉस किंवा क्लोरोपायरीफॉस २५ मिली. + २५ ग्रॅम ऑइलरोझीन सोप, बुप्रोफेझीन २५ एससी २० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून भुंगेरे सोडण्यापूर्वी फवारणी करावी.
फळ पोखरणारे पतंग (फूट बोरर) :-
ही कीड दक्षिण भारतात अधूनमधून आढळते.या पतंगाच डोके आणि खांद्याजवळचा भाग हिरवा असतो. अळ्या बाहेर पडल्यानंतर त्या फळांमध्ये घुसतात.फुलांमध्ये व घुसताना त्या वाकडा तिकडा मार्ग तयार करतात.नंतर त्याआतील गर खातात. त्यामुळे फळे खाली गळून पडतात. ही कीड ओळखण्याची खूण म्हणजे या किडीची विष्ठा फळावरील छिद्रावर जमा होतो.
उपाय :-
१) किडकी फळे वेचून नष्ट करावीत.
२) झाडाजवळ खणून माती हलवून घ्यावी.
३) १० लीटर पाण्यात ४० ग्रॅ.या प्रमाणात पाण्यात विरघळणारे ५० टक्के कार्बारिल फवारावे.
- फळमाशी : (फूट फ्लाय):-
ही कीड वर्षभर आढळते. ही कीड फळाच्या आत अंडी घालते आणि मग अळ्या फळांचा गर खातात.या किडीची ओळख म्हणजे ही कीड अंडी घालताना फळाला बारीक छिद्र करते. त्या छिद्रातून पातळ द्रव्य बाहेर येते. कीड लागल्यावर फळे सडतात. शेवटी ही फळे खाली गळून पडतात.
नियंत्रण :-
सर्व किडकी फळे वेचून नष्ट करावीत. उन्हाळ्यात जमीन खोलवर खणून किंवा नांगरून त्यांचा नाश करावा. १० मी. ली. मेटॉसीड + ७०० ग्रॅम गूळ + ३ थेंब सीट्रॉनील ऑईल एकत्र करून घ्या. मिश्रणाचे ४ थेंब टाकून ते प्लॉस्टिकच्या डब्यात टाकावे. या डब्याला २ मी.मी. छिद्र करावे. त्यामुळे या किडीचे नर आकर्षित होऊन ते मरतील. त्यामुळे किडींचा बंदोबस्त आपोआपच होईल. पाण्यात विरघळणारे कार्बारील ५० टक्के ४० ग्रॅम प्रति १० लीटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारावे.
मऊ देवी कीडे (सॉफ्ट स्केल इनसेक्ट) :-
ही कीड दोन प्रकारची असते. ही कीड सीताफळांच्या पानांची नासाडी करते. ही कीड सहसा पानांच्या खालच्या बाजूवर अंडी घालते. या किडीच्या एका वर्षात तीन पिढ्या तयार होतात. टक्के मेलॉथिऑन फवारावे. अशा एकूण ३-४ फवारण्या दर १५ ते २० दिवसाच्या अंतराने द्याव्यात.
- फलकीडे (थ्रीप्स) :-
सीताफळ आणि द्राक्षांवरही फुलकिडे आढळतात. ही कीड व तिची पिल्ले पानातील व फुलातील रस शोषण करतात. त्यामूळे काही वेळेस पाने गळून पडतात. यांचा जीवनक्रम फारच थोड्या दिवसांचा असतो.
नियंत्रण :- फ्लोनीकॅमीड ५० डब्ल्युजी २ ग्रॅम, बुप्रोफेझीन २५ एससी २० मिली , डायफेन्थुरॉन ५० डब्ल्युपी १२ ग्रॅम, फिप्रोनील ५ एससी ३० मिली किंवा अॅसिफेट ७५ एसपी ८ ग्रॅम.तसे पाहिले तर सीताफळांवर ही कीड अगदी क्वचितच येते परंतु ही कीड आल्यास १० लि. पाण्यात वरील कीटकनाशकाची फवारणी करावी.
पांढरी माशी (व्हाईट फ्लाय):-
ही कीड दक्षिण भारतात कधीकधी आढळते. याची पिल्ले पानाच्या खालच्या भागातून अन्नरस शोषतात. त्यांच्या पोटातून ते चिकट पदार्थ पानांवर टाकतात. त्यामुळे त्यावर एक थर जमा होतो व अन्न तयार करण्याची प्रक्रिया मंदावते. त्यामुळे फळे लहान राहून उत्पन्नात घट येते.
नियंत्रण - ही कीड सीताफळावर क्वचितच येत असल्यामुळे यावर औषधे फवारण्याची सहसा गरज भासत नाही. ही कीड दिसल्यास निंबोळी तेल ५ टक्के ५० मिली, डायफेन्थुरॉन ५० डब्ल्युपी १२ ग्रॅम, बुप्रोफेझीन २५ एससी २० मिली,फ्लोनीकॅमीड ५० डब्ल्युजी २ ग्रॅम ,फिप्रोनील ५ एससी ३० मिली. प्रती १० लिटर पाणी या प्रमानात कीटकनाशके फवारावीत.
सुत्रकृमी (निमॅटोड्स) :-
अ) मुळांवर गाठी करणारी सुत्रकृमी (रुट रॉट निमॅटोड):-
या सुत्रकृमीच्या सुमारे ५० जाती आहेत. त्यापैकी मेलॉईडीगायणी इक्वागणीटा ही जात उष्ण कटिबंधातील प्रदेशात आढळते, महाराष्ट्रही त्याला अपवाद नाही. ही मादी चंबूच्या आकाराची असून ती मुळाच्या आंतरभागात राहून तोंडातील सुईसारख्या अतिसूक्ष्म पण तीक्ष्ण अवयवांच्या सहाय्याने मुळांतील रस शोषून घेते. नर आकाराने लांबट दोऱ्यासारखा असून तो १.१० ते १.९५ मी.मी. इतका लांब असतो. त्याचे प्रमाण मादीपेक्षा खूपच कमी असून ते प्रजोत्पादनाचे काम झाल्यावर लगेच मरतात व पिकांना उपद्रव करीत नाहीत.
नुकसानीचा प्रकार :-
आपल्या सुईसारख्या अवयवाने हे सुत्रकृमी झाडाच्या अतिलहान मुळातील अन्नरस शोषण घेतात. त्यामुळे मुळांवर गाठी निर्माण होऊन झाडाची वाढ खुंटते. पाने पिवळी पडतात. फळे व फुले गळतात. फळे लागली तरी आकाराने लहान राहतात व परिणामतः झाडाचे उत्पन्न कमी होते. याशिवाय सूत्रकृमीने इजा 'केल्याने बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्यास मदत होते
नियंत्रण :- सूत्रकृमी नाशकांचा वापर अतिशय खर्चिक व अवघड असल्याने प्रतिबंधात्मक उपाय करणेच फायद्याचे ठरते.
प्रत्येक झाडास निंबोळी पेंड २ ते ३ किलो द्यावे. बागेत झेंडूची लागवड करावी ( झेंडूच्या मुळ्यांमधून निघणाऱ्या रसात सुत्रकृमीनाशक गुणधर्म असतात. त्यामुळे सुत्रकृमीचे आपोआपच नियंत्रण होते.
- फोरेट १० जी झाडास २०० ग्रॅम जमिनीत १५ सें.मी. खोलपर्यंत मातीत मिसळून द्यावे व लगेचच पाणी द्यावे.
- बहार धरण्याच्या वेळेस प्रत्येक आळ्यामध्ये ६० ते ७० ग्रॅम १० टक्के फोरेट (थायमेट) जमिनीत १५ सें.मी. खोलीपर्यंत मातीत मिसळून घ्यावे व नंतर ताबडतोब पाणी द्यावे.
लेखक -
श्री. आशिष वि. बिसेन
(वरिष्ठ संशोधन साहाय्यक, कीटकशास्त्र विभाग)
भा.कृ.अनु.प.- केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर.
इ.मेल. ashishbisen96@gmail.com
Published on: 13 September 2021, 12:16 IST