भाजीपाला पिकांच्या उत्पादनात भारत हा जगामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. भाजीपाला पिकांमध्ये जीवनसत्वे, प्रथिने, कर्बोदके इ. मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध आहे, त्यामुळे मानवी आहारामध्ये भाजीपाला पिकांचे अनन्यसाधारण महत्व आहे. भाजीपाला पिकांचे प्रती हेक्टर मिळणारे जास्त उत्पादन, काढणीसाठी लागणारा कमी कालावधी, दिवसेंदिवस देशांतर्गत व परदेशात वाढणारी मागणी इ. कारणामुळे भाजीपाला पिके शेतकऱ्यांसाठी इतर पिकांच्या तुलनेत आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरत आहे.
कांदा पिकाच्या दर्जेदार उत्पादनासाठी योग्य जमिनीची निवड, योग्य जातींची निवड, दर्जेदार बियाणे, निरोगी रोपे, अन्नद्रव्य व पाणी व्यवस्थापन, आंतरमशागत, किडरोग व्यवस्थापन इ. बाबींना जसे अनन्यसाधारण महत्व आहे तसेच कांदा पिकाची योग्य परिपक्वतेला काढणी करणे व योग्यप्रकारे साठवणूक करणे अत्यंत महत्वाचे आहे.
स्थानिक बाजारपेठेत दराची स्थिरता आणि निर्यातीसाठी कांद्याची उपलब्धता वाढविण्यासाठी उन्हाळी कांद्याची साठवणूक करणे आवश्यक आहे. त्यामुळे बाजारभावाप्रमाणे टप्या टप्याने कांदा विक्री करणे शक्य होऊन आर्थिक फायदा मिळू शकतो.
साठवणुकीसाठी काढणीपूर्वी नियोजन
१. जातीची निवड:
खरिपात तयार होणाऱ्या जातींचा कांदा एक महिन्यापेक्षा जास्त टिकत नाही. रब्बी हंगामात तयार होणाऱ्या जातींचे कांदे योग्य पद्धतीने साठ्विल्यास जातीपरत्वे पाच महिने टिकतात. एन २-४-१, ॲग्रिफाऊंड लाइर्ट रेड किंवा अर्का निकेतन या जाती सहा महिने साठवणीत विशेष घट न होता चांगल्या टिकू शकतात. भीमा किरण, भीमा शक्ती या नवीन जातीदेखील साठवणीत चांगल्या टिकतात. त्यामुळे योग्य जातींची निवड महत्वाची ठरते.
२. खते आणि पाणी नियोजन:
लागवडी आधी माती परीक्षण करणे महत्वाचे आहे. त्यानुसार मुख्य व सुक्ष्मअन्नद्रव्ये यांचे व्यवस्थापन करावे. खतांची मात्रा, प्रकार तसेच पाणी नियोजन यांचा साठवणीवर खूप परिणाम होतो. सर्व नत्रयुक्त खते लागवडीनंतर ६० दिवसांच्या आत द्यावे. उशिरा नत्र दिले तर माना जाड होतात व कांदा टिकत नाही. पालाशमुळे साठवण क्षमता वाढते.
गंधकासाठी अमोनियम सल्फेट, सल्फेट ऑफ पोटॅश किंवा सुपर फॉस्फेटचा वापर केला तर गंधकाची गरज आपोआप पूर्ण केली जाते; परंतु अलीकडे संयुक्त दाणेदार खतांचा वापर होत असल्यामुळे त्यातून फक्त नत्र, स्फुरद व पालाश हीच अन्नद्रव्ये मिळतात, तेव्हा गंधकासाठी गंधकयुक्त खत लागवडीपूर्वी देणे हे साठवण चांगली होण्यासाठी आवश्यक आहे.
पाणी देण्याची पद्धत, पाण्याचे प्रमाण याचा परिणाम साठवणीवर होत असतो. कांदा पिकाला पाणी कमी; परंतु नियमित लागते. कांदा पोसत असताना एकाच वेळी भरपूर पाणी दिले तर माना जाड होतात. जोड कांद्याचे प्रमाण वाढते.यासाठी ठिबक किंवा तुषार सिंचन फायदेशीर ठरते. काढणीअगोदर जमिनीच्या प्रकारानुसार २ ते ३ आठवडे पाणी बंद करावे. त्यानंतर पात पिवळी पडून कांद्याच्या ५० ते ७० टक्के माना पडल्यानंतर काढणी करावी.
साठवणुकीसाठीचे नियोजन
१. कांदा सुकवणे
काढणीनंतर कांदा शेतातच पातीसह सुकू द्यावा. कांद्याच्या ओळी अशा तऱ्हेने लावाव्यात, की जेणेकरून पहिल्या ओळीतील कांदा दुसऱ्या ओळीतील पातीने झाकला जाईल. अशाप्रकारे कांदा शेतात चार दिवस सुकू द्यावा. त्यानंतर चार सें.मी. लांब मान ठेवून पात कापावी. चिंगळी, जोड कांदा व डेंगळे आलेले व खराब कांदे वेगळे काढावेत. राहिलेला कांदा सावलीत ढीग करून १५ दिवस सुकवावा. या काळात कांद्याच्या माना वाळून पिरगळतात, वरचा पापुद्रा वाळून कांद्याला घट्ट चिकटतो. अशाप्रकारे वाळलेला कांदा अधिक काळ चांगला टिकतो.
बऱ्याच वेळा शेतकरी कांदा काढला की कापून लगेच ढीग लावतात. ओल्या पानांनी ढीग झाकतात. मात्र कांदा काढून तो पानासहित वाळवला तर पानातील ॲबसेसिक ॲसिड पानातून कांद्यामध्ये उतरते, त्यामुळे कांद्यास सुप्तावस्था प्राप्त होते. त्यामुळे कांदे चांगले टिकतात.
२. साठवणगृहातील वातावरण
चांगल्या साठवणीसाठी साठवणगृहात ६५ ते ७० टक्के आर्द्रता, तापमान २५ ते ३० अंश सेल्सिअसच्या दरम्यान असावे लागते. नैसर्गिक वायुविजनाचा वापर करून साठवणगृहाची रचना केली तर तापमान व आर्द्रता काही अंशी मर्यादित ठेवून साठवणीतील नुकसान कमी करता येते.
३. साठवणगृहाची रचना
साठवणगृहाचे दोन प्रकार असतात. नैसर्गिक वायुविजनाचा वापर करून उभारलेले साठवणगृह आणि विद्युत ऊर्जेचा वापर करून बनवलेली शीतगृहे. नैसर्गिक वायुविजनावर आधारित चाळ ही एक पाखी आणि दोन पाखी या दोन प्रकारची असतात. एक पाखी चाळीची उभारणी दक्षिण-उत्तर करावी. दोन पाखी चाळीची उभारणी पूर्व-पश्चिम करावी.
चाळीची लांबी ५० फुटांपेक्षा जास्त असू नये. तळाशी हवा खेळती असावी, तसेच बाजूच्या भिंतीदेखील लाकडाच्या किंवा बांबूच्या असाव्यात. त्यास फटी असाव्यात. चाळीसाठी उंचावरची व पाणी न साठणारी जागा निवडावी. चाळीभोवतीची जागा स्वच्छ असावी. तळाशी मुरूम, वाळूचा थर द्यावा. त्यानंतर चाळीची उभारणी करावी. तळाशी एक फुटाची मोकळी जागा ठेवावी.
सिमेंट किंवा पन्हाळी पत्र्यांनी चाळीत उष्णता वाढते. सिमेंट पत्रे व त्यावर उसाच्या पाचटाचे आच्छादन केले तर तापमान कमी राहण्यास मदत होते. चाळीचे छप्पर उतरते असावे. ते उभ्या भिंतीच्या तीन फूट पुढे असावे, त्यामुळे पावसाचे ओसाडे कांद्यापर्यंत पोचत नाहीत, कांदा खराब होणार नाही.
४. साठवलेल्या कांद्याची उंची व रुंदी
चाळीतील कांद्याची उंची ४ ते ५ फुटांपेक्षा जास्त असू नये. उंची वाढल्यामुळे तळातील कांद्यावर वजन वाढते. हवा खेळती राहत नाही. पाखीची रुंदीदेखील ४ ते ४.५ फुटांपेक्षा जास्त असू नये. रुंदी वाढवली तर वायुविजन नीट होत नाही. थरातील मध्यावरील कांदे सडतात. कांदा साठविण्याआधी एक दिवस अगोदर चाळीत बुरशीनाशकाची फवारणी करून निर्जंतुक करावी, तसेच कांदे टाकताना जास्त उंचावरून टाकू नये. पावसाळ्यात बाजूने कांदे ओले होणार नाही याची काळजी घ्यावी.
अशाप्रकारे कांदा पिकाची योग्यप्रकारे काढणी करून काळजीपूर्वक साठवणूक केल्यास कांदा जास्त दिवस टिकून जास्तीत जास्त बाजारभाव मिळण्यास मदत होईल.
लेखक:
प्रा. योगेश भगुरे
(कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालय, नाशिक)
९९२२४१४८७३
Published on: 22 April 2020, 08:19 IST