नाशिकमधून रशियात निर्यात झालेल्या ४१ कंटेनरमध्ये कीटक सापडल्याचा संशय व्यक्त करीत तेथील प्लांट क्वारंटाईन विभागाने द्राक्ष मालास नकार दिला आहे. यामुळे भारतीय प्लांट क्वारंटाईन विभागाने यासंबंधित १४ निर्यातदार कंपन्या आणि संबंधित पॅकहाऊस यांच्यावर बंदी घातल्याचे समोर आले आहे. रशियाने केलेले कृत्य आणि म्हणणे ऐकून न घेता केंद्र सरकारने घातलेल्या बंदीमुळे जिल्ह्यातून होऊ घातलेली ५० टक्के निर्यात ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान निर्यातदारांनुसार ज्या किटकांबाबत रशियाने दावा केला आहे, ते महाराष्ट्रात उपलब्धच नसताना रशियाच्या तक्रारी अडून निर्यातीस वेठीस धरण्यात येत आहे का असा प्रश्न निर्माण होत आहे. २०२१९-२० या सालाच्या द्राक्ष
हंगामात भारतातून ८५०० कंटनेर युरोप व रशियात निर्यात झाले, त्यापैकी रशियात १५०० कंटेनर पाठविण्यात आले. यातील ४१ कंटेनर नाशिकमधून गेले होते. दरम्यान जिल्ह्यातील निर्यातदाराचे कामकाज अपेडा मान्यता प्राप्त आहे. द्राक्ष निर्यातीमध्ये कीटक सापडल्याचे रशियाच्या प्लांट क्वारंटाईन विभागाकडून भारतीय प्लांट क्वारंटाईन विभागाला कळविताच १४ निर्यातदारांचे परवाने तातडीने निलंबनाचा निर्णय घेण्यात आला.
.
पण ज्या किटकांच्या नावामुळे द्राक्ष नाकारण्यात आले किंवा निर्यातदारांचे परवाने रद्द करण्यात आले, अशा प्रकारची किटके भारतात आढूळन आली नसल्याचे भारतीय द्राक्ष निर्यातदार संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ खापरे यांनी सांगितले. दरम्यान जगन्नाथ खापरे यांनी पुण्यातील राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राकडे याबाबत विचारणा केली, तेव्हा हे किटक भारता नसल्याची माहिती पुण्यातील संस्थेने दिली. यामुळे फक्त संशयामुळे निर्यात होणाऱ्या द्राक्ष मालावर बंदी घालण्यात आली आहे.
मेगासेलिया स्केलरिज कीटक सापडल्याचा दावा
दरम्यान मेगासेलिया स्केलरिज कीटक आणि सेराटिटिज कॅपिटाटा ही फळमाशी महाराष्ट्रात सापडत नसल्याचे राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राने पत्राद्वारे खापरे यांनी कळविले आहे. केंद्राच्या प्लांट क्वारंटाईन विभागाने परवाने रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र असे असताना अपेडा व संबंधित घटकांना विचारात घेणे अपेक्षित होते. मात्र त्यांना याबाबत विचारात घेतले का नाही? किंवा निर्यातदार, विभागाचे प्रतिनिधी व राज्यातील कृषी विभागाच्या बुधवारी रोजी झालेल्या बैठकीत का बोलवले नाही असा प्रश्न निर्माण होत आहे.
Published on: 05 October 2020, 12:46 IST