खते देण्याच्या वेगवेगळ्या पद्धती पैकी जमिनीत मातीआड खते देणे, दाणेदार स्वरूपात खते देणे, फवारणीद्वारे खते देणे याद्वारे आपण नत्रयुक्त खतांची कार्यक्षमता वाढू शकतो. शेतामध्ये फेकून देऊन नत्रयुक्त खते देण्याच्या पद्धती मुळे नत्र अमोनियाच्या स्वरूपात हवेत उडून जाते व त्यामुळे नत्र खताचा ऱ्हास होतो.
आपण आपल्या शेतामधील उपलब्ध स्रोत्यांचे संवर्धन करून नत्र कार्यक्षमता वाढविणे सहज शक्य आहे. या लेखात आपण शेतातील उपलब्ध स्रोतांचे संवर्धन करुन नत्र कार्यक्षमता वाढवणे विषयी माहिती घेऊ.
नत्राची कार्यक्षमता वाढवण्यासाठी उपायोजना
- पिक अवशेष व्यवस्थापन- पीक काढणीनंतर शिल्लक भागास पिकांचे अवशेष असे संबोधतात. पीक अवशेष हे कर्ब आणि नत्राचे प्राथमिक स्त्रोत आहेत. शेतातील पिकांच्या अवशेषांचा द्वारे पुढील पिकास नत्राचा दीर्घकाळ पुरवठा होत असल्यामुळे पीक वाढीच्या काळात चांगल्याप्रकारे नत्र पुरवठा होतो. तृणधान्य पिकांद्वारे एक हंगामामध्ये 40 ते 100 किलो प्रति हेक्टर नत्र पुरवठा होऊ शकतो. तृणधान्य पिकांच्या तुलनेत कडधान्य वर्गीय व गळित पीक अवशेष द्वारे कर्ब व नत्राचा पुरवठा अधिक होतो. तसेच कडधान्य व गळीत पिकांचे अवशेषांमध्ये कर्ब नत्र गुणोत्तर हे कमी असल्यामुळे ते लवकर कुजतात.
- हिरवळीची खते- मुळांवर गाठी असलेल्या विविध पिकांचा हिरवळीचे खते म्हणून चांगल्या प्रकारे उपयोग होतो. एका वर्षामध्ये हिरवळीच्या पिकांद्वारे प्रति हेक्टरी 20 ते 300 किलो पर्यंत नत्र मिळू शकते. हिरवळीचे पीक हे लवकर वाढणारे, कमी कालावधीत तयार होणारे मोठ्या प्रमाणात शुष्क सेंद्रिय पदार्थ तयार करणारे, नत्र स्थिरीकरण करणारे व कमीत कमी मशागत लागणारे असावे.
- पिकांची फेरपालट- एकाच जमिनीवर विशिष्ट क्रमाने पीक घेण्याच्या पद्धतीसपिक फेरपालट असे म्हणतात. योग्य पद्धतीने पिकांची फेरपालट केल्यास नत्र कार्यक्षमता वाढण्यास मदत होते. मुळांवर गाठी असलेली पिके व तृणधान्ये पिके एकापाठोपाठ क्रमाने घेण्याच्या पद्धती फार पूर्वीपासून प्रचलित आहेत.
- यामुळे जमिनीची सुपीकता व उत्पादकता दीर्घकाळ टिकते. मुळांवर गाठी असलेल्या पिकांमध्ये नत्र स्थिरीकरण करून त्यापिकास व पुढील पिकास नत्र उपलब्ध करून देण्याची क्षमता असते.
- नवीन वाण निर्मिती करून नंतर कार्यक्षमता वाढवणे- जमिनीत सारख्या प्रमाणात नत्र घेऊन वेगवेगळे वाण वेगळेवेगळे उत्पन्न देतात. पिकांची नत्र वापर क्षमता, मुळांची वाढ इत्यादी गोष्टींमुळे उत्पन्नात फरक पडतो. अधिक नत्र वापर क्षमता अधिक उत्पन्न क्षमता असलेल्या वाणांची निर्मिती करून नत्राची कार्यक्षमता वाढवता येते.
Published on: 08 December 2021, 12:16 IST