सध्या पिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी विहीर आणि बोरवेल मधून अमर्यादित स्वरूपात पाण्याचा उपसा करण्यात येतो.त्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी दिवसेंदिवस प्रचंड प्रमाणात खालावत आहे.ज्या वेगाने पाण्याचा उपसा होतो त्याच वेगाने पाण्याचे पुनर्भरण करण्यासाठी प्रयत्न केले जात नाही.
परिणामी भूजल साठा कमी होऊन विहीर आणि बोरवेल चे पाणी पातळी सुद्धा लक्षणीयरीत्या घटली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. या समस्येवर सर्वोत्तम उपाय म्हणजे जलपुनर्भरण हे होय. या लेखामध्ये आपण विहीर पुनर्भरणाचे तंत्र जाणून घेणार आहोत.
विहीर पुनर्भरणाचे तंत्र
- या तंत्रामध्ये पावसाळ्यात शेतजमीनीतून वाहणारे पावसाचे पाणी एकत्रितपणे वळवून विहिरीजवळ आणावे.या वळवलेल्या पाण्याचा उपयोग विहिरी पुनर्भरण यासाठी करावा. यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे वाहणारे पाणी सरळ विहिरीत सोडू नये.कारण त्यामुळेवाहणाऱ्या पाण्यासोबत आलेली माती आणि गाळ विहिरीत साठू शकतो.
- कोरडवाहू शेती संशोधन केंद्राने विहीर पुनर्भरण तंत्रज्ञान विकसित केले आहे. या तंत्रामध्ये दोन प्रकारच्या गाळण यंत्रणा आहेत. त्यामुळे पावसाच्या पाण्याबरोबर येणारा गाळ अडविला जातो व शुद्ध पाणी विहिरीत सोडले जाते.
- शेतकऱ्यांनी आपल्या शेताच्या रचनेनुसार व उतारानुसार पावसाचे वाहते पाणी गाळण यंत्रणेकडे वळवावे. शेतातील पाणी सरळ टाक्यात घेण्याऐवजी टाक्या बाहेर एक साधा खड्डा करून त्यामध्ये दगड गोटे,रेती भरावी. त्यामधून एक पीव्हीसी पाईप टाकून त्या पाइपने पाणी प्रथम प्राथमिक गाळण यंत्रणेत घ्यावे. शेता कडील चारी द्वारे वाहणारे पाणी प्रथम प्राथमिक गाळण यंत्रणेत घ्यावे
- मुख्य गाळण यंत्रणेचा अलीकडील दीड मीटर बाय एक मीटर बाय 1 मीटर आकाराचे दुसरी टाकी बांधावी.त्याला प्राथमिकगाळणयंत्रणा म्हणतात. शेतातून वाहत येणारे पाणी प्रथम या टाकीत घ्यावी. तेथे जड गाळ खाली बसतो आणि थोडे गढूळ पाणी पीव्हीसी पाईप च्या माध्यमातून किंवा खाचेद्वारे मुख्य कारण गाळणयंत्रणात सोडावे.
- विहीर पुनर्भरण मॉडेलच्या दुसर्या भागाला मुख्य गाळण यंत्रणा असे म्हणतात. यंत्रणा विहिरीपासून दोन ते तीन मीटर अंतरावर बांधावे. यासाठी दोन मीटर लांब बाय दोन मीटर रुंद आणि दोन मीटर खोल खड्डा करावा.
- या खड्ड्याला आतून सिमेंट विटांचे बांधकाम करून टाकी सारखे बांधून घ्यावे. यात मुख्य गाळण यंत्रणा च्या खालील भागातून चार इंच व्यासाचा पीव्हीसी पाईप विहिरीत सोडावा. या टाकीत 30 सेंटीमीटर उंचीपर्यंत मोठे दगड, 30 सेंटीमीटर उंचीपर्यंत छोटे दगड आणि त्यावर 30 सेंटीमीटर जाडीचा वाळूचा थर टाकावा. असे 90 सेंटिमीटर जाडीचे गाळन थर असावे. त्यावरील साठ सेंटीमीटर भागात पाणी साठते. या गाळण यंत्रणेमार्फत पाणी गाळले जाऊन विहिरीत सोडावे.
Published on: 02 February 2022, 02:47 IST