Horticulture

सजीव वनस्पतींमध्ये जी रासायनिक द्रव्ये अल्प प्रमाणात कार्यरत होऊन त्या वनस्पतींच्या अंतर्गत कार्यपद्धतीत बदल घडवून आणतात, त्यांना वनस्पती संजीवके असे म्हणतात. सजीव वनस्पतीमध्ये अथवा शेतातील पिकांमध्ये कार्यरत असणाऱ्या संजीवकांना पीक-संजीवक असे म्हणतात.

Updated on 25 July, 2020 11:02 PM IST


सजीव वनस्पतींमध्ये जी रासायनिक द्रव्ये अल्प प्रमाणात कार्यरत होऊन त्या वनस्पतींच्या अंतर्गत कार्यपद्धतीत बदल घडवून आणतात, त्यांना वनस्पती संजीवके असे म्हणतात. सजीव वनस्पतीमध्ये अथवा शेतातील पिकांमध्ये कार्यरत असणाऱ्या संजीवकांना पीक-संजीवक असे म्हणतात.

संजीवकांचे प्रकार :

संजीवकांचे वाढ प्रेरक आणि वाढ निरोधक असे मुख्य दोन प्रकार आहेत. संजीवकांच्या वेगवेगळ्या प्रक्रियांमध्ये भाग घेण्याच्या प्रवृत्तीला अनुसरून संजीवकांची निरनिराळ्या गटांमध्ये वर्गवारी केली जाते. .

) ऑक्झीन :

ज्या रासायनिक द्रव्यामध्ये वनस्पतीच्या पेशी लांबट करण्याची क्षमता असते अशा द्रव्यांना ऑक्झीन्स फळझाडात वाढ नियंत्रित करण्यासाठी, फुल व फळांची गळ थांबविण्यासाठी नवीन मुळे येणे, सुप्तावस्था मोडणे बहार, नियंत्रित करणे व इतर कारणांसाठी सजीवकांचा उपयोग होतो. अशाच वेगवेगळ्या उपयोगासाठी वापरात येणाऱ्या संजीवकांची माहिती या लेखात करून घेऊ या. हा संजीवकांमधील महत्त्वाचा गट आहे. यासाठी बाजारात प्लॅनोफिक्स, सिरडीक्स. इ. ऑलर उपलब्ध आहेत. या गटामध्ये इंडॉल असेटिक ॲसिड, ब्यूटेरिक अॅसिड, नॅफ्थलिक अॅसेटिक आसिड, ट्रायआयोही बेझॉडक अॅसिड, २-४ डायक्लोरो फेनॉक्झी अँसेटिक अॅसित (२-४-०) ४ क्लोरोफेनॉक्झी अँसेटिक अॅसिड (२-४-५ ट्रायक्लोरोफेनॉक्सी ॲसेटिक अॅसिड (२-४-५) इ. प्रकारच्या ऑक्झीनचा समावेश होतो. या संजीवकांचा उपयोग करून फुलांची व फळांची गळ थांबविणे, कलमांना मुळे येणे, फुलांचे नियमन करणे व वनस्पतीच्या वाढीस मदत करून उत्पादन वाढविणे शक्य होते.

) जिबरलिन्स :

या रासायनिक द्रव्यामध्ये वनस्पतीच्या पेशी लांबट व पेशी विभाजन करण्याची क्षमता असते. या दोन्हीही क्रियांना चालना देण्याची क्षमता या गटात आहे. अशा द्रव्यांना जिबरेलिन्स असे म्हणतात.  या गटात अनेक प्रकारची जिबरेलिन्स उपलब्ध असली तरी जिबरेलिक अॅसिड-३ (जीए-३) हे या गटातील महत्त्वाचे संजीवक आहे. द्राक्षांमध्ये या संजीवकाचा वापर शेतकरी मोठ्या प्रमाणावर करतात. जिबरेलिन्सचे मुख्य कार्य झाडाची वाढ करण्याचा असले तरी फूलांचे नियमन करणे. बियांचे प्रमाण कमी करण, फळांचा आकार वाढविणे इ. साठी त्याचा उपयोग करता येता. बाजारात हे संजीवक जी. ए. प्रोजीब या नावाने उपलब्ध आहे.

) सायटोकायनिक्स :-

या रासायनिक द्रव्य मध्ये वनस्पतींच्या पेशींचे विभाजन करण्याची क्षमता असते. अश्या द्रव्यांना सायटोकायनिंस असे म्हणतात.  या गटामध्ये कायनिज,कायनेटिन आणि बी. ए. यांचा समावेश होतो.  यांचे मुख्य कार्य पेशींचे विभाजन करणे हे असले तरी प्रजनन वाढीस मदत करतात.

) वाढ निरोधके :

या रासायनिक द्रव्यांमध्ये फळझाडांचे आकारमान मर्यादित राखून उत्पानक्षमता वाढविणे, वनस्पतीच्या अंतर्गत होणाऱ्या शरीर क्रिया थांबविण्याची अथवा कमी करण्याची क्षमता असते. अशा द्रव्यांना वाढ निरोधके असे म्हणतात. ही संजीवके वाढनिरोधके असून अॅबसेसिक अॅसिड आणि मॉलिक हायड्झाईड यांचा त्यामध्ये समावेश होतो. कोंब येण्यास विलंब करणे, पानांमधून पाण्याचे उत्सर्जन कमी करणे, फुलांचे नियमन करणे इ. साठी वाढविरोधकांचा उपयोग करता येतो. एम. एच ४० ह्या नावाने वाढनिरोधक संजीवक उपलब्ध आहे.

) इथिलीन :

इथिलीन हे फळे पिकविण्यासाठी मदत करणारे संजीवक असून याचा उपयोग वनस्पती मधील अनेक शरीर क्रियांमध्ये होतो. फळांची परिपक्वता वाढवणे, फळे एकसारखी पिकण्यास मदत करणे, फळांचा रंग सारखा व चांगला येणे, इ. कारणांसाठी इथिलीनचा उपयोग होतो. हे संजीवक बाजारात इथेफॉन, इथेल या नावाने उपलब्ध आहे. फळझाडांमध्ये बहार धरताना पानगळ होण्यासाठी सुद्धा संजीवकाचा वापर करतात.

) वाढरोधक :

या संजीवकांचा उपयोग काही वेळा वाढ संप्रेरकांपेक्षाही महत्त्वाचा आहे. यामध्ये सी. सी. सी., अलार (बी-९), फॉस्फान डी या प्रकारच्या वाढ रोधकांचा समावेश आहे. ही वाढ रोधके अवर्षणात प्रतिकारक शक्ती वाढविण्यास, थंडी आणि वारा यापासून संरक्षण होण्यासाठीस पिकाची प्रतिकारशक्ती वाढविण्यास, फळांचा आकार व वजन वाढविण्यास, फुलांचे प्रमाण वाढविण्यास, उपयुक्त ठरले आहे. लिहोसीन (सायकोसिल) हे संजीवक बाजारात उपलब्ध आहे. वरील संजीवकांशिवाय काही संजीवक सदृश रसायने बाजारात उपलब्ध आहेत. त्याचा वापर शेतकरी करतात  त्यामध्ये ट्रायकाँटीनोल, विपुल, पारस,  फोटोसिंथ, कल्टार, सायटोझाईम, बायोझाईम, प्लँटोझाईम, इ. चा समावेश होतो.


संजीवकांचे
उपयोग :

फळझाडांमध्ये पीक संजीवकांचा वापर करून अनेक फायदे मिळविता येतात. उत्पादनक्षमता, गुणवत्ता वाढविता येते. तसेच हुकमी पीक, बिगर हंगामी पिके घेता येतात.

) वनस्पतींची अभिवृद्धी करण्यासाठी संजीवकांचा उपयोग

फाटे व गुटीकलमांना लवकर आणि भरपूर मुळे येण्यासाठी संजीवकांचा उपयोग होतो. उदा. डाळिंब, द्राक्ष, अंजीर यासाठी आयबीए हे ऑक्सीन गटातील संजीवक चांगले परिणामकारक ठरते. भेटकलम, शेंडाकलम आणि डोळा भरणे या कलम पद्धतीत खुंट आणि सायन यांचे मिलन साधून एकजीव होण्यासाठी संजीवके मदत करतात. संत्रा, मोसंबी, लिंबू या फळझाडांची अभिरुद्धी डोळे भरून केली जाते. कलमे जगण्यासाठी आणि वाढण्यासाठी या संजीवकांचा उपयोग होतो. आय.बी.ए. आणि एन.ए.ए. या संजीवकांचाही वापर करून घेता येतो.

) सुप्तावस्था मोडण्यासाठी संजीवकांचा वापर :

डोळ्यांची सुप्तावस्था आणि बियांची सुप्तावस्था मोडून काढण्यासाठी संजीवकांचा उपयोग होतो. बियांच्या सुप्तावस्थेमुळे बीज वेळेवर रुजत नाहीत, त्यामुळे उगवण व त्यापुढील वाढ होण्यास उशीर होतो. त्याचप्रमाणे डोळ्यांच्या सुप्तावस्थेमुळे डोळे फुटण्याचे प्रमाण कमी होते आणि डोळे अंकुरण्यास उशीर होतो. यांचा परिणाम म्हणून फुले-फळे येण्यास उशीर होतो.  झाडावरील सर्व फळे एकसारखी व एका अवस्थेत तयार होण्यासाठी बी सुप्तावस्था एकाच वेळी मोडणे आवश्यक असते. आवळा, सीताफळ या फळझाडांचा बियांची सुप्तावस्था मोडण्यासाठी आणि द्राक्षे, अंजीर या फळझाडांमध्ये डोळ्यांची सुप्तावस्था मोडण्यासाठी जिबरेलिक अॅसिड, इथेल या. संजीवकांचा उपयोग होतो.

) फळांचा बहार नियंत्रित करण्यासाठी संजिवकांचा उपयोग :

फळांमध्ये फुलांचा बहार येण्याअगोदर झाडांची शाखिय वाढ पूर्ण व्हावी लागते. झाडांच्या अंतर्गत शरीरक्रिया आणि बाह्य वातावरण यांच्या एकत्रित परिणामामुळे शाखिय वाढ पूर्ण होण्यासाठी कमी अधिक वेळ लागतो. शाखिय वाढ होऊन ती पक्व झाल्यावर डोळ्यांत फुलांची निर्मिती होते. ही निर्मिती काही काळ सुप्तावस्थेत राहते आणि ठराविक कालावधीनंतर डोळे फूटन त्यातन फुलांचा मोहोर बहाराच्या रुपाने बाहेर पडण्यासाठी फळझाडांची अंतर्गत स्थिती आणि बाह्य वातावरणातील सूर्यप्रकाश, आर्द्रता, तापमान या घटकांचा समन्वय साधण्यासाठी संजीवकांचा उपयोग होतो. बहारपूर्व अवस्थेत झाडाभोवती मशागत करून, झाडांचे पाणी तोडून, पानगळ, करून सुप्तावस्था आणली जाते तसेच इथेलसारखी संजीवके वापरून पानगळ करता येते आणि पाणी न तोडताही हा समन्वय साधता येतो. इथेल प्रमाणे क्लोरमक्रॉट या संजीवकाचा काही प्रमाणात उपयोग करून घेता येतो.

 

) बियांची संख्या कमी करून उत्पादन वाढविणे :

काही फळपिकात फळांत बिया नसणे किंवा बिया असणे हे फायद्याचे असते. उदाहरणार्थ, सीताफळ, पपई, पेरू इ. काही फळझाडांत फुले असताना जिबरेलिक अॅसिड हे संजीवक वापरले तर फळातील बियांची संख्या कमी होते. बियांचा आकार लहान राहतो आणि बियांचा मऊपणा वाढतो. या परिणामांमुळे फळांची गुणवत्ता वाढून दर अधिक मिळतात. बिनबियांच्या काळात संजीवके वाढून दर अधिक मिळतात. बिनबियांच्या काळात संजीवके वापरून फळांचा आकार आणि वजन वाढवतात. त्यामुळे दुहेरी फायदा होतो. एक म्हणजे वजन वाढल्यामुळे उत्पादन वाढते आणि आकारमान आणि चवीत बदल झाल्यामुळे गुणवत्ताही वाढते. बिनबियांच्या द्राक्ष जातीत जिबरेलिक अॅसिड वापरून दीड ते दोन पट अधिक फायदा मिळविता येतो. थॉमसन सिडलेस, किशमिश चोर्नी इ. बिनबियांच्या द्राक्ष जातीत या संजीवकाचा यशस्वी वापर जगभर केला जात आहे.

) फळझाडांचे आकारमान मर्यादित राखून उत्पादन क्षमता वाढविणे :

काही फळझाडांच्या विस्तार जास्त मोठा होतो. पण त्यामानाने त्यांवर फळे कमी लागतात. फळांची , निगा राखणे, फळांची काढणी करणे या कामांतही अडचणी  येतात. अशा परिस्थितीत झाडांची वाढ आणि विस्तार मर्यादित राखण्यासाठी क्लोरमक्वॉट, मॅलिक हैड्रोझाईन इ. संजीवके या परिणामासाठी उपयुक्त ठरतात. फळझाडाच्या मर्यादित वाढ  आणि विस्तारामुळे दर हेक्टरी झाडांची संख्या वाढवून घेता येते आणि उत्पादनक्षमता वाढवून वेगवेगळी कामे सहजपणे  करता येतात.

) फळपिकांत काटकपणा लवकर उत्पानक्षम होण्यासाठी संजीवके :

फळपिकांमध्ये संजीवकांचा वापर करून फळझाडांना काटकपणा, तसेच उत्पादनाची सुरुवात लवकर करता येते. बरीचशी फळझाडे बहुवर्षीय असून सुरुवातीची काही वर्ष त्यांची फक्त शाखिय वाढ होत असते. ही शाखिय वाढ होत असताना संजीवकांचा वापर केला तर शाखिय वाढीवर मर्यादा येऊन फळे येण्याची अवस्था लवकर सुरू होते. फळझाडांची शाखिय वाढ होत असताना झाडांच्या शाखांत लुसलुशीतपणा अधिक असतो. त्यामुळे हा भाग विशेष हवामानातील, पाणी टंचाईस आणि रोग किडीस लवकर बळी पडतो. संजीवके वापरल्यावर हा भाग कणखर बनतो.

) पीक संजीवकांचा वापर :

मूळ संजीवके प्रयोगशाळेत तयार करून त्यांची चाचणी घेतली जाते. कोणती संजीवके कोणत्या प्रमाणात आणि कोणत्या अवस्थेत वापरावीत. याबद्दलची माहिती उपलब्ध केली जाते. काही संजीवके पाण्यात विरघळतात तर काही संजीवके विरघळण्यासाठी अल्कोहोल अथवा अॅसीटोन हे माध्यम वापरावे लागते. संजीवकांची मूळ तीव्रता ९५ ते १०० टक्के असते. फळझाडांमध्ये संजीवकांचा वापर वेगवेगळ्या रितीने केला जातो.

१) भुकटी स्वरुपात  २) द्रव स्वरुपात  ३) मलम स्वरुपात  ४) वायू स्वरुपात ही संजीवके फळझाडांवर वेगवेगळ्या रितीने वापरली जातात. फळझाडावर फवारणी करूनफळझाडाचे भाग संजीवकात बुडवून, मुळाजवळ झिरपून , इंजेक्शन देऊन अशाप्रकारे आपण संजीवकांचा वापर फळझाडांसाठी करू शकतो.

लेखक -

1) प्रा. हरिष . फरकाडे

    सहायक प्राध्यापक (वनस्पती रोगशास्त्र विभाग)

   श्री. शिवाजी उद्यानविद्या महाविध्यालय, अमरावतीu

   मो. नं.-8928363638 .मेल. agriharish27@gmail.com

2) गजानन . चोपडे (एम.एस.सी. किटकशास्त्र विभाग)

3) प्रा. डॉ. नीरज गु. निस्ताने (फळबाग उत्पादन विभाग)

4) राहुल सु. शेटे (एम.एस.सी. वनस्पती रोगशास्त्र विभाग)

English Summary: Find out! Importance of various revitalizers in orchards
Published on: 25 July 2020, 11:01 IST