केळी म्हटले म्हणजे आपल्या डोळ्यासमोर पटकन येतो तो जळगाव जिल्हा. जळगाव जिल्ह्याला केळीच्या आगार म्हटले जाते. आपण जळगाव जिल्हा सोडला तर महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये केळीची लागवड आता मोठ्या प्रमाणावर होऊ लागली आहे. केळी हे एक महत्वपूर्ण आणि शेतकऱ्यांना चांगले आर्थिक उत्पन्न देणारे पीक असून चांगल्या व्यवस्थापनाच्या माध्यमातून भरघोस उत्पादन केळीचे मिळते.
जर व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून आणि पूर्वतयारी इत्यादी दृष्टिकोनातून जर केळी बागेचे व्यवस्थित व्यवस्थापन केले तर चांगले उत्पादन मिळते. यामध्ये जर आपण कांदेबाग लागवडीचा विचार केला तर प्रामुख्याने ऑक्टोबर महिन्यात केळी लागवड केली जाते तिला कांदेबाग केळी लागवड असे देखील म्हणतात.
कांदेबाग लागवडीचा विचार केला तर कडक थंडी तसेच अतिउष्ण हवामान इत्यादी वातावरणीय बदलाचा सामना या कालावधीत लागवड केलेल्या पिकाला करावा लागतो. त्यामुळे व्यवस्थित काळजी घेणे खूप गरजेचे असते. त्यामुळे आपण कांदेबाग लागवड करत असताना कशा पद्धतीने पूर्वतयारी करावी, याबद्दल महत्त्वपूर्ण माहिती या लेखात घेणार आहोत.
कांदेबाग लागवडीसाठी पूर्वमशागत आणि खत व्यवस्थापन
ज्या शेतामध्ये कांदेबाग लागवड करायची आहे अशा शेतीची पूर्व मशागत करताना जमीन चांगली भुसभुशीत करून घ्यावी व सऱ्या पाडून घ्याव्यात. पाडलेल्या साऱ्या व्यवस्थित ओलून घ्याव्यात व पुन्हा आठ ते पंधरा दिवसांनी त्या खोल व रुंद करावे. जर आपण शेणखताचा विचार केला तर यासाठी 40 ते 50 मॅट्रिक टन प्रति हेक्टर इतके शेणखताची आवश्यकता भासते.
त्यामुळे चांगले कुजलेले शेणखत वापरणे खूप गरजेचे आहे. तसेच काही जैविक खतांचा वापर देखील महत्वपूर्ण ठरतो. जर जैविक खतांचा वापर करायचा असेल तर प्रत्येक झाडाला 25 ग्रॅम अझोस्पिरिलम आणि 25 ग्रॅम पीएसबी ही जिवाणू खते शेणखताच्या सोबत मिसळून द्यावी. त्यामुळे अन्नद्रव्यांची कार्यक्षमता वाढते व पिकाला त्याचा चांगला उपयोग होऊन पिकाची वाढ व फळांचे उत्पादन देखील दर्जेदार मिळते.
त्यासोबतच रासायनिक खतांमध्ये प्रत्येक झाडाला 200 ग्रॅम नत्र, 40 ग्रॅम स्फुरद आणि 200 ग्रॅम पालाश अन्नद्रव्यांची आवश्यकता असते. स्फुरदयुक्त खत देण्यासाठी सिंगल सुपर फॉस्फेट आणि पोटॅशच्या पुरवठ्यासाठी म्युरेट ऑफ पोटॅश चा वापर करावा.
कांदे बागेला पाणीव्यवस्थापन
जर आपण कांदे बागेचा विचार केला तर त्याला सुरुवातीला कमी पाणी लागते. परंतु कांदेबाग केळीची सुरुवातीची अवस्था आहे थंडीत असल्यामुळे रात्रीच्या वेळेस पाणी देताना विशेष काळजी घेण्याची गरज असते. केळीच्या कुठल्याही प्रकारच्या लागवडीमध्ये जसे की जुनारी मूर्गबाग, कांदेबागामध्ये पाणी देताना अतिरिक्त पाणी साचणार नाही याची काळजी घेणेदेखील खूप गरजेचे आहे. बाग कायम वापसा स्थितीत राहील अशा पद्धतीने व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.
ठिबक सिंचनाचा वापर करत असाल तर जमीन ओलावा क्षेत्र खूप महत्त्वाचे ठरते. मध्यम ते भारी काळ्या जमिनीत ओलावाक्षेत्र 40 ते 50 टक्के इतके असावे. पाटपाणी पद्धतीने जर पाणी व्यवस्थापन कराल तर दोन पाण्याच्या पाळ्यामध्ये नियमित अंतर ठेवणे गरजेचे आहे.
Published on: 03 November 2022, 02:41 IST