उन्हाळी बहाराचे पहिले पाणी सुरू करण्यापूर्वी काही अत्यंत महत्त्वाच्या बाबी, सीताफळ छाटणी महत्त्वाची सीताफळ बागेपासून दर्जेदार फळे घेण्याकरिता हवामानातील बदलाप्रमाणे व्यवस्थापन करणे ही महत्त्वाची बाब आहे.हवामानातील बदलाचे चित्र हळूहळू स्पष्ट होऊ लागले आहे. त्याप्रमाणे बहार घेणे पुढे-मागे करावे लागणार आहे.उन्हाळी बहार घेताना त्या विभागातील तापमान, आर्द्रता, पर्जन्यमान, सूर्यप्रकाश, वाऱ्याचा वेग, धुके, अवकाळी पाऊस, गारा इत्यादी हवामान घटकांचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो.
उन्हाळी बहाराचे पहिले पाणी सुरू करण्यापूर्वी काही अत्यंत महत्त्वाच्या बाबी बागेस २ महिने पूर्ण ताण देणे. पाणी बंद ठेवावे. मालाची काडी तपकिरी रंगाची करून घेणे.झाडास आकार देणे व छाटणी यामुळे रोग व किडीचा उपद्रव कमी होतो. उदा.- गोगलगाय, खवले कीड, मिलिबग, मुंग्या व फळसड रोग. जुन्या बागांवर ‘बांडगूळ’ आढळल्यास मुळ्यांसहित नष्ट करा. फवारणी व्यवस्थित करता येते व फळांच्या वाढीसाठी बागेत हवा मोकळी, खेळती राहते. सीताफळ बाग घनदाट असेल तर फळसड व फळे काळी पडण्याचे प्रमाण अधिक असते. बहाराचे पाणी सुरू करण्यापूर्वी झाडांची छाटणी १५ ते २० दिवस अगोदर करावी.
आच्छादनाचा वापर करावा. त्यामुळे जमिनीचा पोत सुधारतो, मुळांचे तापमान समतोल ठेवण्यास मदत होते. जमिनीची पाणी साठविण्याची क्षमता विक्रमी वाढते.
बागेची स्वच्छता महत्त्वाची असून, बागेत पडलेली रोगट व किडकी फळे गाडून किंवा जाळून नष्ट करावीत.संतुलित खतांची मात्रा वापरा, त्याचबरोबर बोरॉन, कॅल्शिअम व सिलिकाचा वापर महत्त्वाचा आहे. नत्रयुक्त खतांचा वापर गरजेपुरताच करावा. नत्राच्या अधिक वापरातून किडीचा, रोगाचा उपद्रव वाढतो. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने शिफारस केलेली मात्रा वापरा. (नत्र २५०, स्फुरद १२५, पालाश १२५ ग्रॅम प्रति झाड)
बागेत आच्छादन पिकांचा वापर करा. त्याद्वारा जमिनीची धूप थांबते, बागेचे तापमान मर्यादित ठेवण्यास मदत होते व बागेतील मित्रकीटकांना पूरक वातावरण उपलब्ध होते. मधमाशीलादेखील पूरक खाद्य परागकण उपलब्ध होऊन फळधारणा चांगली होते. बागेतील तापमान मर्यादित राहिल्यामुळे फळधारणा चांगली होते. फुलगळ व फळगळ कमी होते.
बागेभोवती वारा नियंत्रित करणाऱ्या झाडांची लागवड करावी. त्यामुळे फुलगळ थांबते व अति वाऱ्यामुळे फळे फांद्यांना घासत नाहीत व प्रतवारी कमी होत नाही.अति पाणी देणे म्हणजे कीड व रोगांना आमंत्रण ठरते. झाडांना ठिबकद्वारा गरजेपुरतेच पाणी द्यावे.खोडावर स्टिकी बँड्सचा वापर करून मुंगळ्यांच्या झाडावर चढण्याच्या वाटा बंद कराव्यात.सूर्यप्रकाश हा फळांच्या वाढीतील मुख्य घटक आहे. बहाराचे पाणी सुरू करण्यापासून ते फळांच्या काढणीपर्यंत चांगला प्रखर सूर्यप्रकाश महत्त्वाचा आहे. आर्द्रता हा दुसरा घटक झाडांची वाढ, फळधारणा, कीड व रोगांचा उपद्रव याबाबत पूर्ण परिणाम घडवून आणत असतो. सर्वांत अधिक फळधारणा जमिनीलगतच्या भागात आढळून येते. त्याचे प्रमुख कारण म्हणजे जमिनीलगत अधिक आर्द्रता असते, हे होय.
सीताफळ छाटणी महत्त्वाची
उन्हाळी बहारामध्ये दुबार छाटणी केली जाते.पहिली छाटणी ही बहाराचे पाणी सुरू करण्यापूर्वी १५ ते २० दिवस अगोदर केली जाते. उन्हाळी बहाराचे पाणी जानेवारी ते मेमध्ये सुरू करण्यात येते. सध्या सीताफळ आगारात छाटणीचे काम प्रगतिपथावर आहे.
जून २५ ते २७ नंतर झाडांवर फळे असताना दुसरी छाटणी करावी. झाडांना ८ ते १० दिवसांत पालवी येते. त्यातूनच नवीन फुलांची निर्मिती होते. सदरची फळे नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यांत काढणीस येतात व एकाच झाडापासून दोनदा फळे घेणे शक्य होते.फळे साधारण सुपारीच्या आकाराची झाल्यानंतर फळांची विरळणी अत्यंत महत्त्वाची बाब आहे. विरळणी करताना चांगल्या आकारमानाची देखणी फळे ठेवावीत. वेडीवाकडी, कीड व रोगग्रस्त फळांची विरळणी करावी.
विनोद धोंगडे नैनपुर
Published on: 27 March 2022, 04:08 IST