द्राक्ष बागेमध्ये चांगले द्राक्षांचे उत्पादन व वजनासाठी द्राक्ष वेलीमध्ये अन्नद्रव्यांचा समतोल राखणे फार महत्त्वाचे असते. म्हणजेच अन्नद्रव्यांची कमतरता ही राहायला नको किंवा त्यांचे प्रमाणही जास्त व्हायला नको याकरिता द्राक्ष बागातदारांना अन्नद्रव्यांची कमतरता व त्याची लक्षणे याबद्दल माहिती असणे गरजेचे असते.
या लेखामध्ये आपण पालाश आणिस्फुरदया मुख्य अन्नद्रव्यांची कमतरता व उपाय योजना याबद्दल माहिती घेणार आहोत.
- पालाश म्हणजे पोटॅशची कमतरता- द्राक्ष बागेची छाटणी केल्यानंतर साधारणपणे 25 दिवसांपासून पुढे जमिनीमध्ये पोटाशी ची कमतरता असल्यास त्याच्या कमतरतेची लक्षणे पानांवर दिसायला लागतात. पालाशच्या कमतरतेची लक्षणे दिसू लागताच त्वरित पालाश पुरवठा न केल्यास पाने हळूहळू कडेने पिवळी पडू लागतात.काडीची पक्वता होण्यास उशीर होतो तसेच द्राक्ष मण्यात साखर कमी भरते. माल तयार व्हायला उशीर होतो यासारखे दुष्परिणाम पालाशच्या कमतरतेमुळे दिसतात.
उपाययोजना
पालाश कमतरतेची सुरुवातीची लक्षणे दिसतात सल्फेट ऑफ पोटॅश पाच ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे चार दिवसांच्या अंतराने तीन फवारण्या कराव्यात. जमिनीतील कमतरतेचा नियंत्रणासाठी एकरी सात किलो याप्रमाणे तीन वेळा सात दिवसांच्या अंतराने सल्फेट ऑफ पोटॅश( एकूण 20 किलो ) द्यावे.
- स्फुरदाची(फॉस्फरस) कमतरता- फास्फोरस याच्या कमतरतेमुळे छाटणीनंतर 40 ते 60 दिवसात दरम्यान काडी तळापासून हिरवी न राहता गुलाबी होते. पानांचे देठ ही गुलाबी होतात. याची अल्प प्रमाणातील सुरुवात ही छाटणीनंतर फुटी आठ ते नऊ इंच असल्यापासून होते. याच वेळी वरील लक्षणे दिसू लागताच फॉस्फरस कमतरता भरून काढण्याकरता उपाय योजना करावी.
- फॉस्फरसची तीव्र कमतरता- छाटणीनंतर 40 ते 60 दिवसांत दरम्यानची तीव्र कमतरता असल्यास काडी तळापासून पुढे सात ते दहा पेरापर्यंत गुलाबी होते. पानांचे देठ गुलाबी होतात तसेच घडांचे मणी हिरवे न राहता पिवळसर पोपटी होतात. मण्यांची फुगवण मागे पडून कमी राहते. पानाच्या शिरा देठापासून बाहेरच्या बाजूकडे गुलाबी होत चाललेल्या आहेत पानांचा रंग हिरव्या कडून फिक्कट हिरव्या कडे झुकत चालला आहे.ही फॉस्फरसच्या कमतरतेचे सुरुवात असते.
उपाय योजना
- फॉस्फरस कमतरता भरून काढण्यासाठी 12:61:0 हे विद्राव्य खत अडीच ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे चार दिवसांच्या अंतराने दोन वेळा फवारावे. जमिनीत एकरी सात किलो याप्रमाणे सात दिवसांच्या अंतराने तीन वेळा द्यावे.
- झिंक कमतरता असेल तर त्वरित भरून काढण्यासाठी झिंक चिलेटेड (12 टक्के ) अर्धा ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे दुपारी 4 नंतर पानांवर फवारणी करावी.चार दिवसांच्या अंतराने दुसरी फवारणी करावी. जमिनीत झिंक सल्फेट (21 टक्के) एकरी पाच किलो याप्रमाणे चार दिवसांच्या अंतराने दोन वेळा ठिबकद्वारे द्यावे.
Published on: 13 February 2022, 06:58 IST