Horticulture

आपल्या रोजच्या आहारामध्ये वांगी ही भाजी फारच महत्वाची आहे. कारण वांग्यामध्ये खनिजे तसेच अ, ब, क ही जीवनसत्वे, लोह व प्रथिने यांचे प्रमाण पुरेसे आहे. वांग्याचा आहारामध्ये भाजी, मसाला भरलेली वांगी, भरीत, दही वांगी असा अनेक प्रकारे उपयोग होतो. गरिंबापासून श्रीमंतापर्यंत, ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत सर्वांनाच लोकप्रिय असणारी आणि वर्षभर उपलब्ध होणारी वांगी ही सर्वसामान्य लोकांच्या आवडीची फळभाजी आहे. वांग्याचे मुळस्थान भारत असून बहुतेक सर्व राज्यांतून लागवड केली जाते.

Updated on 24 September, 2018 12:15 AM IST


आपल्या रोजच्या आहारामध्ये वांगी ही भाजी फारच महत्वाची आहे. कारण वांग्यामध्ये खनिजे तसेच अ, ब, क ही जीवनसत्वे, लोह व प्रथिने यांचे प्रमाण पुरेसे आहे. वांग्याचा आहारामध्ये भाजी, मसाला भरलेली वांगी, भरीत, दही वांगी असा अनेक प्रकारे उपयोग होतो. गरिंबापासून श्रीमंतापर्यंत, ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत सर्वांनाच लोकप्रिय असणारी आणि वर्षभर उपलब्ध होणारी वांगी ही सर्वसामान्य लोकांच्या आवडीची फळभाजी आहे. वांग्याचे मुळस्थान भारत असून बहुतेक सर्व राज्यांतून लागवड केली जाते.

भारतात प्रामुख्याने पश्चिम बंगाल, ओरीसा, बिहार, गुजरात, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश व इतर राज्यांमधुन वांग्याची लागवड केली जाते. महाराष्ट्रात या पिकाखाली जवळजवळ 30,000 हेक्टर क्षेत्र असून उत्पादन 690.0 मे.टन व उत्पादकता 30.0 प्रति हेक्टर एवढी आहे. महाराष्ट्रात जवळजवळ सर्वच जिल्हयांतून हे पीक घेतले जाते. परंतु विविध भागानुसार लोकांच्या आवडी विशिष्ट वांग्याच्या जातींसाठी वेगवेगळया आहेत. सांगली, सातारा भागात कृष्णाकाठी चविष्ठ वांगी प्रसिध्द आहेत. अहमदनगर, पुणे व सोलापूर भागात काटेरी किंवा डोरली वांगी जास्त पसंत केली जातात. तर खानदेशात भरताची वांगी हा प्रकार अधिक लोकप्रिय असून विदर्भात कमी काटे असलेली वांगीच सर्वांना आवडतात. वांगी हे पीक जवळच्या तसेच लांबच्या बाजारपेठांना विक्रीकरता पाठविण्याच्या दृष्टीने हे एक बागायती पीक फायदेशीर देखील आहे.

वांग्याच्या लागवडीसाठी सुधारित किंवा संकरित वाण निवडताना ठराविक बाबींचा विचार करणे महत्वाचे असते. प्रामुख्याने त्या परिसरातील लोकांची मागणी असणारा वाण तसेच बाजारपेठेत हमखास चांगला भाव मिळणारा वाण निवडणे गरजेचे असते. निवडलेला वाण शक्यतो भरपूर उत्पादन देणारा व रोग आणि किड यांना कमी प्रमाणात बळी पडणारा असावा व तेथील हवामानाशी मिळत-जुळतं घेणारा वाण निवडणे महत्वाचे असते. वांगी पिकाची लागवड करताना प्रामुख्याने सुधारीत व संकरित जातीची निवड, रोपवाटिका व्यवस्थापन, लागवड पध्दत , खत व पाणी व्यवस्थापन व पीकसंरक्षण या बाबी फारच महत्वाच्या आहेत. महाराष्ट्रात वांगी पिकाच्या बऱ्याच जातींची लागवड केली जाते. वेगवेगळया विभागात रंग व आकारानुसार तसेच काटेरी व बिनकाटेरी विविध जाती लावल्या जातात.

सुधारित व संकरित जाती: 

अ.क्र वाण वैशिष्ट्ये
1 मांजरी गोटा

या जातीचे फळ मध्यम ते मोठया आकाराचे, गोल असून जांभळट गुलाबी रंगाचे असते व त्यावर पांढरे सरमिसळ पट्टे असतात. व फळांच्या देठावर काटे असतात ही जात चवीला रूचकर असून फळे चार ते पाच दिवस टिकू शकतात. या जातीचे सरासरी उत्पादन हेक्टरी 250 ते 300 क्विंटल मिळू शकते.

2 कृष्णा

ही संकरीत जात असून झाडे काटक असतात. फळांचा आकार अंडाकृती, रंग आकर्षक जांभळा असून त्यावर पांढरे पट्टे असतात व फळांच्या देठावर व पानांवर काटे असतात. या जातीचे सरासरी 400 ते 450 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळते.

3 फुले हरित या जातीची फळे मोठया आकाराची असतात, ही जात भरीत करण्यासाठी चांगली आहे. या जातीच्या फळाचा रंग फिकट हिरवा व टोकाकडे पांढरे पट्टे असतात. ही जात खरीप हंगामासाठी चांगली आहे. या जातीचे सरासरी 200 ते 480 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळू शकते.


याशिवाय वांग्याच्या आणखी विविध जाती काही संस्थांनी तसेच खाजगी कंपन्यांनी विकसीत केल्या आहेत. काही जाती ठराविक भागातच चांगल्या मागणी असलेल्या असतात. वांग्याची शक्यतो आवडीनुसार जात निवडणे बाजारपेठेच्या दृष्टीने महत्वाचे असते व निवडलेली जात शक्यतो किड व रोगांना कमी प्रमाणात बळी पडणारी व भरघोस उत्पादन देणारी असावी म्हणजे बाजारभाव चांगले मिळून शेतकरी बांधवास चांगला फायदा होवू शकतो.


हवामान:

या पिकाला कोरडे आणि थंड हवामान चांगले मानवते. ढगाळ हवा आणि एकसारखा पडणारा पाऊ स या पिकाला अनुकुल नाही. कारण अशा हवामानात कीड आणि रोगांचा फारच उपद्गव होतो. सरासरी 13 ते 21 सें.ग्रे. उष्ण तापमानात हे पीक चांगले येते. महाराष्ट्रातील हवामानात जवळजवळ वर्षभर वांग्याचे पीक घेता येवू शकते

जमीन:

चांगला निचरा असलेली मध्यम काळी कसदार जमीन या पिकासाठी उत्तम समजली जाते. नदीकाठच्या गाळवट जमिनीत वांग्याचे भरपूर उत्पादन येते असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे.

लागवडीचा हंगाम:

महाराष्ट्रातील हवामानात वांगी पिकाची लागवड तिन्ही हंगामात करता येवू शकते. खरीप हंगामासाठी बियांची पेरणी जूनच्या दुसऱ्या आठवडयात आणि रोपांची लागवड जुलै-ऑगस्ट मध्ये केली जाते. रब्बी किंवा हिवाळी हंगामासाठी बियांची पेरणी सप्टेंबर अखेर करतात आणि रोपे ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये लावतात. उन्हाळी हंगामासाठी बी जोनवारीच्या दुसऱ्या आठवडयात पेरुन रोपांची लागवड फेब्रुवारीत केली जाते.

बियांचे प्रमाण:

कमी वाढणाऱ्या जातीसाठी हेक्टरी 400 ते 500 ग्रॅम बी पुरेसे होते. जास्त वाढणा-या किंवा संकरित जातीसाठी हेक्टरी 120 ते 150 ग्रॅम बी पुरेसे होते. पेरणीपूर्वी बियाण्यास प्रति किलो 3 ग्रॅम थायरम चोळावे.

रोपवाटिका:

वांग्याची रोपे तयार करण्यासाठी गादी वाफे साधारणतः 3 बाय २ मीटर आकाराचे करुन गादी १ मीटर रुंद व १५ सेंमी उंच करावी. प्रती वाफ्यात चांगले कुजलेले शेणखत दोन पाटया टाकावे व 200 ग्रॅम संयुक्त रासायनिक खत द्यावे. खत व माती यांचे मिश्रण करु न गादी वाफयात समप्रमाणात पाणी मिळेल अशा पध्दतीने तयार करावेत. प्रती वाफ्यास मर रोगाचे नियंञणासाठी 30 ते 40 ग्रॅम ब्लायटॉक्स टाकावे. वाफयाच्या रुंदीस समांतर 10 सेंमी अंतरावर खुरप्याने 1 ते 2 सेंमी खोलीच्या ओळी करु न त्यात पातळ पेरावे. सुरवातीस वाफयांना झारीने पाणी द्यावे. नंतर पाटाने पाणी द्यावे. रोपाच्या जोमदार वाढीसाठी उगवणीनंतर 10 ते 15 दिवसांनी प्रत्येक वाफ्यास 50 ग्रॅम युरिया खत आणि 15 ते 20 ग्रॅम बुरशीनाशक पावडर दोन ओळीमध्ये काकरी पडून द्यावे व हलके पाणी द्यावे. कीड व रोगाच्या नियंत्रणासाठी 10 दिवसाच्या अंतराने औषधांची फवारणी करावी. लागवडीपूर्वी रोपांना थोडा पाण्याचा ताण द्यावा म्हणजे रोप कणखर होईल. लागवड करण्याअगोदर एक दिवस रोपांना पाणी द्यावे. रोप लावगडीसाठी 5 ते 6 आठवडयात तयार होते. रोपे 12 ते 15 सेंमी उंचीची झाल्यावर लागवड करावी.

रोपांची लागवड:

रोपलागवडीपूर्वी जमिनीची नांगरट करुन चांगली मशागत करावी व शेणखत मिसळावे व जमिनीच्या मगदुराप्रमाणे योग्य अंतरावर सऱ्या वरंबे पाडावेत, हलक्या जमिनीत 75 बाय 75 सेंमी, जास्त वाढणाऱ्या किंवा संकरित जातीसाठी 90 बाय 90 सेंमी अंतर ठेवावे. मध्यम किंवा काळया कसदार जमिनीत कमी वाढणाऱ्या जातींसाठी 90 बाय 75 सेमी व जास्त वाढणाऱ्या जातींसाठी 100 बाय 90 सेमी अंतर ठेवावे.

खत व्यवस्थापन:

जमिनीच्या मगदुराप्रमाणे खतांच्या मात्रांचे प्रमाण कमी जास्त होवू शकते. महाराष्ट्राच्या मध्यम काळया जमिनीसाठी हेक्टरी 150 किलो नत्र, 50 किलो स्फुरद व 50 किलो पालाश द्यावे. संपूर्ण स्फूरद व पालाश व अर्धे नत्र लागवडीच्या वेळी आणि उरलेले अर्धे नत्र लागवडीनंतर तीन समान हप्त्यात विभागून दयावे. पहिला हप्ता लागवडीनंतर एक महिन्याने, दुसरा हप्ता त्यानंतर एक महिन्याने आणि तिसरा शेवटचा हप्ता लागवडीनंतर तीन ते साडेतीन महिन्यांनी द्यावा. खतांची मात्रा दिल्यानंतर लगेच पाणी द्यावे.

आंतरमशागत:

खुरपणी करुन पिकातील तण काढून टाकावे. लागवडीनंतर 30 ते 40 दिवसांनी रोपांना मातीची भर द्यावी. वेळोवेळी खुरपणी करुन पीक स्वच्छ ठेवावे. पाण्याची पाळी, जमीनीचा प्रकार व हवामान यावर अवलंबून असते. खरपी हंगामातील पिकास 10 ते 12 दिवसाच्या अंतराने पाण्याच्या पाळया द्याव्यात. रब्बी आणि उन्हाळी पिकांस रोप लावणीनंतर लगेच पाणी द्यावे. दुसरे पाणी 3 ते 4 दिवसांनी द्यावे. त्यानंतर हिवाळयात 8 दिवसाच्या अंतराने आणि उन्हाळयात 5 ते 6 दिवसांनी पाणी द्यावे. फुले येण्याच्या काळ व फळे पोसण्याच्या काळात पाण्याचा ताण देवू नये. तसेच वेळच्यावेळी पिकास गरजेनुसार पाणी द्यावे म्हणजे चांगले उत्पादन मिळेल.

 


पीकसंरक्षण:

वांगी या पिकावर प्रामुख्याने तुडतुडे, मावा, पांढरीमाशी  व कोळी या रस शोषणाऱ्या किडी आणि शेंडा व फळे पोखरणारी अळी या किडींचा प्रादुर्भाव होतो. तसेच रोगांमध्ये प्रामुख्याने बोकडया किंवा पर्णगुच्छ व मर रोग हे रोग दिसून येतात. तुडतुडे पानातील रस शोषून घेतात. त्यामुळे पाने वाकडी होतात. तसेच हे कीटक पर्णगुच्छ या विषाणुजन्य रोगाचा प्रसार करतात. मावा या किडीमुळे पाने पिवळी पउतात व चिकट होवून काळी पडतात. लाल कोळी या किडीमुळे पाने पांढरट पडतात. तसेच पानावर जाळे तयार होते आणि झाडाची वाढ खुंटते. शेंडे आणि फळे पोखरणारी अळी प्रथमतः कोवळया शेंडयात शिरुन आतील भाग खाते त्यामुळे शेंडे वाळतात फळे आल्यावर फळे पोखरते व अशी फळे खाण्यासाठी निरुपयोगी ठरतात

  • वांगी पिकांमध्ये एकात्मिक कीड व्यवस्थापनासाठी खालीलप्रमाणे उपाययोजना कराव्यात.
  • पीक लागवडीपूर्वी शेतांची खोल नांगरट करावी. ज्या शेतात अगोदर टोमॅटो, मिरची, भेंडी, वेलवर्गीय भाज्या या पिकांची लागवड केली असल्यास तेथे वांगी पिकाची लावगड करु नये. कारण या शेतात सुत्रकृमीची वाढ झालेली असेल.
  • रोपासाठी तयार केलेल्या वाफ्यात कार्बोफ्युरोन 30 ग्रॅम किंवा टाकावे. (1 बाय 1 मी वाफा) तसेच रोपांवार डायमेथोएट 30 टक्के प्रवाही 10 मिली 10 लिटर पाण्यातून वापरावे.
  • रोपांची पुर्नलागवड करताना रोपे इमिडॅक्लोप्रीड 10 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून तीन तास बुडवून ठेवावीत. व नंतर लावावीत
  • लागवडीनंतर 45 दिवसांनी तुडतुडे, मावा, पांढरी माशी या किडी आढळल्यास डायमेथोएट 30 टक्के प्रवाही, 10 मिली किंवा मिथिल डिमेटॉन 25 टक्के प्रवाही 10 मिली किंवा स्पार्क 10 मिली 10 लिटर पाण्यातून फवारावे.
  • लागवडीनंतर दोन महिन्यांनी किडलेले शेंडे व फळे आढळल्यास ती गोळा करुन नष्ट करावीत तसेच 4 टक्के निंबोळी अर्क फवारावे.
  • वांगी पिकावर कोळी आढळल्यास पाण्यात मिसळणारे गंधक 30 ग्रॅम किंवा डायकोफॉल 20 मिली 10 लिटर पाण्यातून फवारावे.

वांग्यावर विशेषत: शेंडा व फळे पोखरणारी अळी जास्त प्रमाणात दिसून येते. यामध्ये अळी प्रथमतः झाडावर फळे नसताना कोवळया शेंडयात शिरुन आतील भाग खाते. त्यामुळे शेंडे वाळतात. नंतर फळे आल्यावर फळात शिरुन आतील भाग खाते. त्यामुळे अशा फळांना बाजारात किंमत मिळत नाही. या किडीमुळे फळांचे 40-50 टक्के नुकसान होवू शकते. तसेच जून ते सप्टेंबर या कालावधीत किडीचे प्रमाण 50-70 टक्के असू शकते. तसेच वांग्यावरील सर्व किडींचे व्यवस्थापन करताना पिकाच्या लागवडीपासून ते पीक काढणीपर्यंत पिकाची स्थिती ध्यानात घेणे गरजेचे आणि महत्वाचे आहे.

वांग्यामधील बोकडया किंवा पर्णगुच्छ या रोगामुळे पानाची वाढ खुंटते. ती लहान आणि बोकडयासारखी दिसतात. हा रोग अतिसुक्ष्म अशा घातक लसीमुळे (मायकोप्लाझ्मा) होतो. आणि याचा प्रसार तुडतुडयांमुळे होतो. काही वेळा विशेषतः पावसाळी हंगामात हा रोग नुकसानकारक ठरतो. याच्या नियंत्रणासाठी रोपवाटिकेत रोपांची काळजी घ्यावी तसेच तुडतुडयांच्या नियंत्रणासाठी किटकनाशकांची फवारणी करावी म्हणजे या रोगाचा प्रसार होणार नाही. तसेच 30 ग्रॅम 50 टक्के कार्बारिल आणि १० ग्रॅम कार्बेन्डाझिम 10 लिटर पाण्यातून 10 ते 15 दिवसाच्या अंतराने 3 ते 4 फवारण्या घ्याव्यात. रोगट झाडे दिसताच ती उपटून नष्ट करावीत. सुत्रकृमीच्या नियंत्रणासाठी झेंडू, कांदा अशा प्रतिकारक पिकांची फेरपालट करावी. तसेच उन्हाळयात 2 ते 3 वेळा जमिनीची नांगरट करु न जमीन तापू द्यावी. तसेच रोगप्रतिकारक जातींची लागवड करावी. मर हा रोग जमिनीतील फयुजेरीयम या बुरशीमुळे होतो. खालची पाने पिवळी पडून गळून जातात व रोगट झाडांची वाढ खुंटते. हा रोग जमिनीतील बुरशीपासून होत असल्यामुळे पिकांची फेरपालट करणे, निरोगी झाडांची बी वापरणे, तसेच प्रतिकारक जातींची लागवड करणे किंवा ब्लायटॉक्स या औषधाचे ड्रेंचिंग करणे यासारखे उपाय योजावेत.

काढणी व उत्पादन:

वांगी फळांना योग्य बाजारभाव मिळण्यासाठी फळाची तोडणी योग्य वेळी होणे आवश्यक आहे. फळे पूर्ण वाढून त्यांना आकर्षक रंग आल्यावर काढणी करावी. फार कोवळी फळे काढल्यास उत्पादनात घट येते आणि जून फळे ग्राहकांच्या पसंतीस उतरत नाहीत. चार ते पाच दिवसांच्या अंतराने तोडणी करावी. किडलेली वांगी बाजूला काढावीत. वांग्याचा आकार आणि रंगानुसार त्यांची प्रतवारी करावी म्हणजे चांगला बाजारभाव मिळेल. तोडणीनंतर फळे बाजारात पोहचेपर्यंत त्याचा चमकदारपणा टिकून राहील अशा पध्दतीने पॅकिंग करावे. जातीपरत्वे हया पिकाचे सरासरी उत्पादन 200 ते 300 क्विंटलपर्यंत मिळू शकते. संकरीत जातींचे उत्पादन हयाहीपेक्षा जास्त मिळू शकते. काही संकरित जातींचे 400 ते 500 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळू शकते. दर्जेदार व अधिक उत्पादनासाठी पिकांची रोपनर्सरी टाकणेपासून ते पिकाचा कालावधी संपेपर्यंत प्रत्येक टप्प्यावर योग्य व व्यवस्थित काळजी घेतल्यास खात्रीशीर उत्पादन मिळू शकते. सर्वसाधारण तापमानात हिवळयात काढलेली फळे 3 ते 4 दिवस चांगली  राहू शकतात. मात्र उन्हाळयात एक-दोन दिवसांपेक्षा जास्त चांगली राहू शकत नाहीत. परंतु शीतगृहात 7.20 ते 10.00 सें.गे. तापमान आणि 85 ते 95 टक्के आर्द्गता असल्यास वांगी एक आठवडाभर चांगल्या स्थितीत साठवून ठेवता येतात. अशा पध्दतीने वांगी पिकासाठी सर्व बाबींचे वेळच्या वेळी चांगले नियोजन केल्यास शेतकरी बांधवास या पिकापासून चांगला होवू शकतो.

डॉ. कैलास शिंदे, डॉ. मधुकर भालेकर, डॉ. भरत पाटील
अखिल भारतीय समन्वित भाजीपाला सुधार प्रकल्प
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, जि. अहमदनगर

 

English Summary: Brinjal Cultivation Technique
Published on: 20 September 2018, 02:17 IST