केळी पिकावर आढळणारा ‘ मर रोग ’ अत्यंत घातक असून त्याचा प्रसार सर्वत्र झपाटयाने वाढत आहे. हा रोग ‘ पनामा ’ मर या लोकप्रिय नावाने ओळखला जातो. फ्युजेरियम ऑक्झिस्पोरम (क्युबेन्स) या बुरशीमुळे या रोगाचा प्रादुर्भाव होतो. ऑस्ट्रेलियामध्ये सन १८७४ साली हा रोग प्रथमच आढळून आला. भारतात प्रथमच पश्चिम बंगाल येथे १९११ मध्ये हा रोग येथे आढळून आला. दक्षिण भारतात केरळ, तामिळनाडू कर्नाटक व आंध्रप्रदेश या राज्यात हा रोग मोठ्या प्रमाणात आढळतो. तथापि बिहार, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश व गुजरात या राज्यातही हा रोग वेगाने पसरत आहे.
हेही वाचा: फळबाग लागवडीपूर्वी जमिनीची योग्यता तपासणं आहे महत्त्वाचं
मालभोग, नांगजनगोड रसाबळे, अम्रितपाणी, सिल्क, कानयाळी मोनयन व विरूपाक्षी हे वाण या रोगास बळी पडतात. या बुरशीची ‘उष्णकटिबंधीय प्रजात 4’ ही अत्यंत विनाशकारी आहे. केळीचे बारमाही पीक असते. जमिनीत बुरशीची तग प्रसार धरून राहण्याची ३० वर्षापेक्षा जास्त क्षमता असते. या बुरशीचे अलैगिक पध्दतीने असंख्य प्रमाणात निर्माण होणारे बिजाणूंमुळे रोगाचे प्रसार थोपवून त्याचे नियंत्रण करणे कठीण आहे. रामबाण उपायाचा व रोगप्रतिकारक वाणांचा अभाव यामुळे या रोगाची प्रखरता अधिक जाणवते. महाराष्ट्रात या रोगाचा प्रसार होऊ नये यासाठी हा लेख प्रसिध्द करण्यात येत आहे.
रोगाची लक्षणे –
या रोगाची सुरूवात लागवडी नंतर चार ते पाच महिन्याने होते.झाडावरील जुन्या पानांच्या देठाकडील तळभागी फिकट हिरवे ते फिकट पिवळया रंगाच्या रेषा दिसतात. पानांच्या कडा पिवळ्या पडत-पडत संपूर्ण पान पिवळे होते. खालून वर या क्रमाने झाडावरील सर्व पाने १ -३ आठवडयात पिवळट होतात. जुन्या पानांच्या कडा वाळतात पाने देठाकडील बाजूने हळू–हळू जमिनीच्या दिशेने वाकतात. पाने संपुर्ण वाळतात व गळून पडतात. नविन येणारी पाने चुरगळलेली फिकट रंगाची असतात.रोगग्रस्त झाडाचे खोड जमिनी लगत उभे चिरले जाते.खोडाच्या आतील भागात लालसर किंवा तपकिरी रंगाचे चट्टे पडतात हे चट्टेनंतर काळपट होतात अन्नद्रव्य वाहक नलिका मरतात.बाहेरून अशाक्रमाने चट्टे पडत जाऊन तेथील अन्नद्रव्य वाहक नलिका मरतात. झाड बुटके राहते. अति तीव्र लक्षणात झाड मरून जाते.
रोगाचा प्रसार –
या रोगाचा प्रसार प्रामुख्याने रोगट कंद, संसर्गित माती, बागेतील रोगट झाडांचे अवषेश, रोगट बागेत वापरलेली अवजारे, वाहने, चरणाऱ्या गुरांचे खुर, रोगग्रस्त बागेतून वाहणारे पाणी, बागेत वाढणारी दगडी तसेच दुधाणी ही तणे, सुत्रकृमी तसेच केळीवरील कंद पोखरणारे सोंडे व खोड पोखरणारी अळी या रोगाचे वाहक असतात.
अनुकूल बाबी -
- लागवडीसाठी हलक्या जमिनीचा वापर.
- केळी एकपिक पध्दतीचा विस्तृत प्रमाणावर वापर.
- केळी पिकाचा वारंवार खोडवा घेणे.
- जमिनीचे 300 से. तापमान व कमी आर्द्रता.
- जमिनीतील पाण्याचा अयोग्य निचरा.
- रोगास बळी पडणाऱ्या स्थानिक वाणांचा वापर.
- सुरुवातीस पाण्याचा ताण व त्यानंतर पडणारा मोठया प्रमाणात पडणारा संततधार पाऊस.
- वादळी वाऱ्यासह सहित पडणारा पाऊस व त्यामुळे जमिनीत साठलेले पाणी.
नियंत्रणाचे उपाय –-
- संसर्गरोग नियंत्रण नियमांची कडक अमंलबजावणी करून शेजारील राज्यातील कंद किंवा ऊती संवर्धित रोपे यांची लागवड करण्याचे काटेकोरपणे टाळावे, खात्रीशीर व रोगमुक्त कंद किंवा ऊती संवर्धित रोपे लावगडीसाठी वापरावीत.
- हंगाम संपताना बागेतील सर्व झाडांचे अवषेश गोळा करून पुर्णपणे नष्ट करून बाग नेहमी स्वच्छ ठेवावी.
- बाग लावणे पुर्वी तागाचे हिरवळीचे पीक घ्यावे.
- भात, ऊस, कांदा यांची १– २ वेळा लागवड करून नंतर केळीचे पीक घ्यावे.
- लागवडीपुर्वी शेतात प्रति झाडास १० किलो याप्रमाणे चांगले कुजलेले शेणखत व त्यासोबत ट्रायकोडर्मा हे जैविक नियंत्रक १०० ग्रॅम प्रति झाड वापरावे. रासायनिक खतांची शिफारस केलेलीच मात्रा वापरावी. अतिरिक्त नत्राचा वापर करू नये, बागेत पाणी साठू देवू नये, पाण्याचा उत्तम निचरा करावा.
- लागवडीसाठी प्रादुर्भावग्रस्त बागेतील कंद, मनुवे वापरू नयेत.
- बाग नेहमी तणमुक्त व स्वच्छ ठेवावी.
- लागवडीच्यावेळी कंद २ टक्के कार्बेन्डेझिम या बुरषीनाशकाच्या द्रावणांत ३०.४० मिनिटे बुडवून लागवड करावी.
- लागवडीनंतर ५,६ व ९ महिन्यांनी २ टक्के कार्बेन्डेझिमची बुंध्याजवळ आळवणी करावी.
- केळी बागेस ठिबक सिंचनाव्दारेच योग्य प्रमाणात पाणी द्यावे.
- रोगग्रस्त बागेतून पाणी बाहेर जावू देवू नये.
- बागेतील मर रोगग्रस्त झाडे निवडून त्यांची दुर अंतरावर विल्हेवाट लावावी.
- लागवडीनंतर ३ व ५ महिन्यांनी प्रतिझाड ४० ग्रॅम कार्बोफ्यूरान बुंध्याभोवती टाकून सोंड किडयांचे नियंत्रण करावे.
- सुत्रकृमीच्या नियंत्रणासाठी निमबेसेडिन ०.०३ टक्के प्रवाही १५ मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणात ३० मिनीटे कंद प्रक्रिया करावी. त्याचप्रमाणे सुडोमोनास फ्लोरोसन्स ०.५ टक्के डब्लू पी (२x१०९ बीजकंण प्रति ग्रॅम) हा जीवाणू २० ग्रॅम +२५०ग्रॅम निंबोळी पेंड पावडर याचे मिश्रण प्रति झाड या प्रमाणात खोडाभोवती बागंडी पध्दतीने लागवडीवेळी द्यावे. त्यानंतर तिसऱ्या व सहाव्या महिन्यात हिच प्रक्रिया पुनःकरावी.
लेखक -
डॉ.के.बी.पवार
भ्रमण ध्वनी क्रमांक - 9834954837
श्री.एस.बी.माने
अखिल भारतीय समन्वित संषोधन प्रकल्प (केळी), जळगाव.
डॉ के बी पवार, प्रभारी प्रमुख व कनिष्ठ रोग शास्त्रज्ञ
एस बी माने संशोधन सहयोगी
केळी संशोधन केंद्र जळगाव.
Published on: 29 October 2020, 05:42 IST