आवळ्याचे झाड अत्यंत काटक असल्यामुळे या पिकाची फारशी काळजी न घेताही या फळझाडापासून चांगले उत्पादन मिळते. आवळ्यापासून कमी खर्चात मिळणारे उत्पादन, फळांचे आहारदृष्ट्या महत्व आणि औषधी उपयुक्तता यामुळे आवळा या फळपिकाच्या लागवडीस अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. आवळा या फळझाडाचे उगमस्थान दक्षिणपूर्व आशियातील मध्य आणि दक्षिण भारतातील आहे. हिमालयाच्या पायथ्यापासून ते दक्षिणेकडे श्रीलंकेपर्यंत हे झाड चांगले वाढते. समुद्रसपाटीपासून तेराशे मीटर उंचीपर्यंत आवळ्याची वाढ चांगली होते. भारतात उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, बिहार, राजस्थान, आसाम इत्यादी राज्यात आवळ्याची लागवड केली जाते. महाराष्ट्रात सह्याद्री, सातपुडा, अजिंठ्याच्या डोंगराळ भागात तसेच अकोला, बुलढाणा, सातारा, कोल्हापूर, अमरावती, चंद्रपुर, भंडारा, नागपुर, जळगाव व यवतमाळ या भागातील जंगलात आवळ्याची झाडे आढळतात.
चवीला तुरट आणि आंबट असलेल्या आवळ्यात क जीवनसत्व भरपूर असते. जीवनसत्वासह आवळा आपल्याला पैसा देतो. हो, प्रक्रिया उद्योगातून आपण आवळ्याच्या फळापासून मुरब्बा, सॉस, कॅन्डी, वाळलेल्या चकत्या, च्यवनप्राश, आवळा सुपारी, जेली, लोणचे, टॉफी, आवळा पावडर, इत्यादी पदार्थ मोठ्या प्रमाणावर तयार केली जातात आणि त्याला खूप मागणी आहे. खाद्यपदार्थ बनविण्यासह या फळात औषधी गुणही आहेत. आवळ्याचे फळ वाळवल्यानंतरही यातील ‘क’ जीवनसत्व नष्ट होत नाही. ताप, हगवण आणि मधुमेहावर आवळ्याचा उपयोग करतात. आवळ्याचे तेल केसांच्या वाढीसाठी गुणकारी समजले जाते. आवळा खाल्ल्याने पोटाचे विकार कमी होतात व पचनक्रिया सुधारते. आवळ्याच्या १०० ग्रॅम खाण्यायोग्य भागात खालील प्रमाणे अन्नघटक असतात.
अन्नघटक |
प्रमाण (%) |
अन्नघटक |
प्रमाण (%) |
पाणी |
८१.० |
स्फुरद |
०.०२ |
शर्करा (कार्बोहायड्रेट्स) |
१४.० |
चुना |
०.०५ |
प्रथिने (प्रोटीन्स) |
०.५० |
जीवनसत्व ‘ब’ |
०.०३ |
स्निग्धांश |
०.१ |
जीवनसत्व ‘क’ |
०.६ |
खनिजद्रव्ये |
०.७ |
निकोटिनिक आम्ल |
०.०००२ |
तंतुमय पदार्थ |
३.४ |
उष्मांक (कॅलरी) |
५९ |
लोह |
१.२ |
|
|
अशा या औषधी आवळ्याच्या लागवडीविषयीची माहिती आपण जाणून घेऊ
हवामान-
आवळा हे समशीतोष्ण हवामानातील फळझाड आहे. जरी तापमान हे
४६ अंश सेल्सिअस उष्ण असले तरी याची वाढ चांगली होत असते. उन्हाळ्यात जास्त तापमान आणि हिवाळ्यात अति थंड वातावरण असणाऱ्या भागात आवळ्याची झाडे चांगली वाढतात. आवळ्याची झाडे दोन्ही प्रकारच्या वातावरणात वाढू शकतात.
पण जर रोप लहान असतील आणि आपण त्यांची लागवड केली असेल तर लागवडीनंतर सुरुवातीच्या २-३ वर्षाच्या काळात अति उष्णता आणि थंडीपासून आवळ्याचे संरक्षक करणे आवश्यक आहे.
लागवडीसाठी जमीन कशी लागते-
हलक्या ते भारी अशा सर्व प्रकारच्या जमिनीत आवळ्याची लागवड करता येते. अत्यंत हलकी, खळकाळ, भरड, गाळाची, मुरमाड, भारी, मातीचा सामू ६.५ ते ९.५ पर्यंत असलेल्या जमिनीत आवळ्याची लागवड करता येते. परंतु चुनखडीयुक्त रेताड जमीन आवळ्याच्या लागवडीस योग्य नसते.
आवळ्याच्या सुधारित जाती-
- बनारसी - उत्तर प्रदेशात बनारसी जातीची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. या जातीची फळे आकाराने मोठी असून चकचकीत, पिवळसर रंगाची असतात. या जातीच्या फळांचे वजन ४०-४५ ग्रॅम असते. या जातीची फळे मुरब्बा आणि लोणच्यासाठी उत्तम समजली जातात. या जातीच्या फळांमध्ये साखरेचे प्रमाण १२.५ % आणि आम्लता १.५ % असते. या जातीच्या फळांच्या १०० ग्रॅम खाण्यायोग्य भागात ६५० मिलिग्रॅम ‘क’ जीवनसत्व असते.
- कृष्णा (एन.ए.-५) - या जातीची फळे मध्यम ते मोठ्या आकाराची, मऊ सालीची, चमकदार, पिवळसर रंगाची, लाल छटा असलेली असतात. या जातीच्या फळांचे वजन ३५-४० ग्रॅम असते. मुरब्ब्यासारखे टिकाऊ पदार्थ तयार करण्यासाठी ही जात उत्तम आहे. या जातीच्या फळात साखरेचे प्रमाण ११.५ % आणि अम्लता १.४ % असते. फळांच्या १०० ग्रॅम खाण्यायोग्य भागात ४७५ मिलिग्रॅम ‘क’ जीवनसत्व असते.
- चकिया - ही जात उशिरा तयार होणारी असून नियमित आणि भरपूर उत्पादन देणारी आहे. या जातीची फळे मध्यम आकाराची, चपटी आणि रंगाने हिरवट असतात. फळांचे वजन ३०-३२ ग्रॅम असते. लोणच्यासाठी आणि इतर टिकाऊ पदार्थ तयार करण्यासाठी ही जात उत्तम असून नेक्रोसिस या रोगास ही जात बळी पडत नाही. या जातीमध्ये फळगळ होत नाही म्हणून आवळ्याच्या व्यापारी उत्पादनासाठी या जातीची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. फळांच्या १०० ग्रॅम खाण्यायोग्य भागात ५०० मिलिग्रॅम ‘क’ जीवनसत्व असते.
- कांचन (एन.ए.-४) - ही जात भरपूर उत्पन्न देणारी असून या जातीची फळे मध्यम आकाराची आणि पिवळसर रंगाची असतात. या जातीच्या फळांचे वजन ३०-३२ ग्रॅम असते. फळांमध्ये साखरेचे प्रमाण १० % आणि आम्लता १.४५ % असते. फळांच्या १०० ग्रॅम खाण्यायोग्य भागात ५०० मिलिग्रॅम ‘क’ जीवनसत्व असते. ही जात त्रिफळाचूर्ण आणि लोणच्यासाठी उत्तम आहे.
- हाथीझूल (फ्रांसिस) - या जातीची फळे आकाराने मोठी आणि हिरवट पिवळ्या रंगाची असतात. फळाचे वजन ४०-४१ ग्रॅम असते. फळातील गर मऊ असून फळात साखरेचे प्रमाण १२ % आणि आम्लता १.७ % असते. फळाच्या १०० ग्रॅम खाण्यायोग्य भागात ३८५ मिलिग्रॅम ‘क’ जीवनसत्व असते.
- नरेंद्र-६ - ही जात चकिया या जातीपासून संशोधित केलेली आहे. फळे मध्यम गोल आकाराची असतात. फळांचा रंग हिरवट पिवळसर असतो. पृष्ठभाग चिकन चमकदार असतो. गर पिवळा असतो. गरात रेषा अजिबात नसतात. गर मुलायम असतो. मुरब्बा, कॅन्डी बनविण्यास ही जात चांगली आहे.
- नरेंद्र आवळा-७ - ही जात फ्रांसिस या आवळ्याच्या जातीपासून संशोधित केलेली आहे. ही झाडे सरळ वाढतात. नोव्हेंबर ते डिसेंबरमध्ये फळे तयार होतात. फळे मोठ्या आकाराची असतात. फळाचे वजन ४०-५० ग्रॅम असते. फळांचा आकार लंबगोलाकार असतो. पृष्ठभाग चमकदार, फिक्कट पिवळ्या रंगाचा असतो. गरात रेषा अजिबात नसतात. या जातीमध्ये सुद्धा फ्रांसिस जातीप्रमाणे नेक्रोसिस रोग दिसून येत नाही.
- आनंद-१ – या जातीचे झाड मध्यम उंचीचे असते. फांद्या पसरणार्या असतात. खोडाची साल पांढरी असते. फळे मोठी गोल, सफेद रंगाची, रेषाहीन, गुलाबी छटा असलेली पारदर्शक असतात. फळाचे वजन ३५ ग्रॅम असून जीवनसत्व ‘क’ ७७० मी.ग्रॅम प्रती १०० ग्रॅम असते. बी लहान असते. उत्पादन शक्ती चांगली असते. प्रत्येक झाडास ७५-८० किलो फळे येतात.
- आनंद-२ – ही झाडे मध्यम ते उंच वाढणारी असतात. खोडाची साल भुरक्या रंगाची असते. फळे मोठी असून वजन ४५ ग्रॅम असते. या जातीची फळे मोठी, गोल, निळसर, अर्धपारदर्शक असून गर निळ्या रंगाचा, रेषाहीन असतो. जीवनसत्व ‘क’ चे प्रमाण १०० ग्रॅम ला ७७५ मी.ग्रॅम असते. उत्पादन १००-१२५ किलो प्रती झाड येवढे येते.
- आग्रा बोल्ड (एन.ए.-१०) – ही जात बनारसी या जातीपासून निवड पद्धतीने तयार केली गेलेली आहे. या जातीचे झाड मध्यम उंचीचे असून फुलांचा रंग गर्द गुलाबी असतो. फळाचे सरासरी वजन ४१.५० ग्रॅम असते. फळे गोलाकार चपटी असून मध्यम आकाराची असतात. फळांचा रंग हिरवट पिवळा असून गुलाबी छटा असतात. गर ३९.०८ ग्रॅम, हलका रेषेदार, पांढरट हिरवा, मऊ व रसदार असतो. साखरेचे प्रमाण ९.९० ब्रिक्स असून आम्लता २.१७ % असते. जीवनसत्व ‘क’ चे प्रमाण १०० ग्रॅम ला ५२८ मी.ग्रॅम असते. ही जात लवकर परिपक्व होणारी असून साठवणुकीसाठी योग्य आहे.
- बी.एस.आर.-१ – ही जात अधिक उत्पन्न देणारी असून (१५५ किलो प्रती झाड) उशिरा परिपक्व होणारी आहे. फळे खालच्या बाजूने चपटी तर वरच्या बाजूने गोलाकारा असतात. फळाचे सरासरी वजन २७.३० ग्रॅम असते. फळांमध्ये साखरेचे प्रमाण १८.१० 0 ब्रिक्स येवढे असते तर जीवनसत्व ‘क’ चे प्रमाण १०० ग्रॅम ला ६२० मी.ग्रॅम असते.
- लाल आवळा - लाल आवळा ही उत्तर प्रदेशातील स्थानिक जात आहे. या जातीची फळे छोटी आणि जास्त टणक असून फळाच्या देठाकळे आकर्षक गर्द गुलाबी छटा असते.
अभिवृद्धी-
आवळ्याची लागवड प्रामुख्याने बियांपासून केली जाते. परंतु बियांपासून तयार केलेल्या झाडांना लागवडीनंतर उशिराने फळे येतात. उत्पादन कमी येते, फळांची प्रत निकृष्ट असते व मातृवृक्षांचे सर्व गुणधर्म येत नाही. म्हणून आवळ्याच्या झाडाची अभिवृद्धी कलम पद्धतीने किंवा डोळे भरुण (पॅच बडिंग) करावी. अभिवृद्धीसाठी उत्तम दर्ज्याची, मोठी फळे देणारी आवळ्याची जात निवडावी. निवडलेल्या झाडांची डोळ्काडी अथवा डोळे वापरुन आवळ्याची अभिवृद्धी करावी. डोळे भरण्याचे काम जून-जुलै किंवा ऑगस्ट-सप्टेंबर किंवा फेब्रुवारी-मार्च महिन्यात करतात. डोळे भरण्यासाठी १ वर्ष वयाचा खुंट वापरावा.
लागवड-
लागवडीपूर्वी जमिनीची मशागत करावी. पावसाळ्यापूर्वी मे महिन्यात ६० x ६० x ६० से.मी. आकाराचे खड्डे ८-९ मीटर अंतरावर खोदावेत. खड्डे उन्हाळ्यात महिनाभर चांगले तापू द्यावेत. त्यानंतर खड्डे माती अधिक १०-१५ किलो शेणखत अधिक १ किलो सुपर फॉस्फेट आणि ५० ग्रॅम ट्रायकोडर्मा मिसळून भरून घ्यावेत. त्यानंतर डोळे भरुण तयार केलेली कलमे अथवा रोपे पावसाळ्यात लावावीत. लागवडीनंतर रोपांना बांबूच्या काठीचा आधार द्यावा. रोपांची लागवड केल्यानंतर रोपांची पाने गळतात आणि थोड्याच दिवसात रोपांना नवीन पालवी फुटते.
वळण आणि छाटणी-
आवळ्याच्या झाडाला सुरुवातीपासूनच योग्य प्रकारे वळण देणे आवश्यक आहे. आवळ्याच्या झाडाचे लाकूड अतिशय ठिसूळ असते. त्यामुळे आवळ्याच्या फांद्या फळांच्या भाराने वाकून मोडतात. म्हणून सुरुवातीच्या काळात झाडाचा सांगाडा मजबूत होण्यासाठी आणि झाडांची वाढ योग्य होण्यासाठी आवळ्याच्या झाडाला योग्य वळण देणे आवश्यक आहे. आवळ्याच्या झाडाला जमिनीपासून १ मीटर उंचीवर ५-६ जोमदार फांद्या चारही दिशांना विखुरलेल्या स्थितीत वाढतील अशा ठेवाव्यात. खोडावर येणारी फुट काढून टाकावी. फळांचा हंगाम संपल्यावर रोगट, कमजोर, वाळलेल्या आणि वेड्यावाकड्या वाढलेल्या फांद्या छाटून टाकाव्यात.
खते आणि पाणी व्यवस्थापन-
झाडाचे वय (वर्षे) |
प्रती झाड खतांची मात्रा |
|||
शेणखत (किलो) |
नत्र (ग्रॅम) |
स्फुरद (ग्रॅम) |
पालाश (ग्रॅम) |
|
१ |
५-१० |
५० |
५० |
५० |
२-४ |
१५-२० |
१०० |
१०० |
१०० |
५-६ |
२५-३० |
२०० |
१५० |
१५० |
७ व त्यापुढील |
३०-४० |
४०० |
२०० |
२०० |
पूर्ण शेणखत पावसाचे सुरूवातीस व अर्धी रासायनिक खते जून-जुलै महिन्यात द्यावे. उरलेली अर्धी रासायनिक खते ऑगस्ट-सप्टेंबर मध्ये पावसाचा अंदाज घेऊन द्यावी.
कलमांच्या लागवडीनंतर पावसाळ्यात पाणी देण्याची आवश्यकता नसते. आवळ्याची नवीन लागवड केल्यानंतर पहिली दोन वर्षे झाडांना उन्हाळ्यात १५ दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे. झाडे मोठी झाल्यावर त्यांना पाणी द्यावे लागत नाही. मात्र फळधारणेच्या काळात १५ दिवसाच्या अंतराने पाणी दिल्यास आवळ्याच्या फळांचे उत्पादन वाढते. जमिनीत पाण्याचा ओलावा टिकून राहण्यासाठी तसेच तनांची वाढ होऊ नये म्हणून प्रत्येक झाडाच्या खोडाभोवती गवताचे आच्छादन करावे.
आंतरपिके, आंतरमशागत आणि तननियंत्रण-
आवळ्याची लागवड हलक्या ते मध्यम जमिनीत केली जात असल्यामुळे अशा जमिनीचा पोत आणि कस टिकविण्यासाठी चवळी, उडीद, मुंग, वाटाणा, हरभरा इत्यादी पिके आंतरपिके म्हणून घेता येतात. याशिवाय आवळ्याच्या दोन झाडांमधील जागेमध्ये तसेच जमिनीची सुपीकता सुधारण्यासाठी ढेंच्याची लागवड करून हे पीक फुलावर येण्यापूर्वीच जमिनीत हिरवळीचे खत म्हणून गाडून टाकावे. तणांचा योग्य वेळी बंदोबस्त न केल्यास आवळ्याच्या पिकाची वाढ आणि उत्पादन यावर वाईट परिणाम होतो. म्हणून बागेतील तणे वेळोवेळी उपटून, खुरपून काढून टाकावीत. तसेच उन्हापासून आणि अति थंडीपासून लहान कलमांचे संरक्षण करण्यासाठी कलमांवर गवताचे छप्पर बांधावे. रोपांना किंवा कलमांना बांबुचा आधार द्यावा.
महत्वाच्या किडींचे व्यवस्थापन-
- खोडअळी- ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात या कीडीचा उपद्रव मोठ्या प्रमाणात दिसून येतो. या किडीची अळी रात्रीच्या वेळी फांदीची साल पोखरून आत शिरते आणि सालीचा आतील भाग खाते. अळीने पाडलेल्या छिद्रातून अळीची विष्ठा बाहेर दिसते.
नियंत्रण- या अळीच्या नियंत्रणासाठी फांद्यावर आणि खोडावर असणार्या अळ्या काढून टाकून नष्ट कराव्यात. अळीने केलेल्या छिद्रात रॉकेल किंवा पेट्रोलमध्ये भिजवलेला कापसाचा बोळा झाकून छिद्र मातीने लिपुन घ्यावा.
- गॉल माशी- ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात या कीडीचा उपद्रव दिसून येतो. या किडीची अळी खोडावर छिद्र पडून आत शिरते आणि आतील भागावर उपजीविका करते. अळीमुळे नुकसान झालेल्या भागावर फोडासारखी वाढ दिसते.
नियंत्रण- या किडीच्या नियंत्रणासाठी किडलेल्या फांद्या तोडून नष्ट कराव्यात. याशिवाय कीडीचा प्रादुर्भाव वारंवार आढळून आल्यास क्लोरोपायरीफॉस २० % इ.सी. ५ मी.ली. १० लीटर पाण्यात मिसळून १५ दिवसाच्या अंतराने फवारणी करावी.
- पिढ्या ढेकूण- ही कीड झाडाच्या नवीन कोवळ्या फांद्यावर हल्ला करून रस शोषण करते. त्यामुळे पाने पिवळी पडतात. किडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झाल्यास फांद्यावरील वरील संपूर्ण पाने व फुले वाळून गळून पडतात.
नियंत्रण- किडीचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणात झाला असल्यास स्पीनोसॅड २.५ मी.ली. किंवा क्विनॉलफॉस २५% इ.सी. ५ मीली १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
महत्वाच्या रोगांचे व्यवस्थापन-
- तांबेरा- आवळ्याच्या स्थानिक जाती तांबेरा रोगाला मोठ्या प्रमाणावर बळी पडतात तर बनारसी आणि चकीया या जाती तांबेरा रोगास प्रतिकारक आहेत. तांबेरा रोगाच्या प्रादुर्भावामुळे पानांवर आणि फळांवर तपकिरी रंगाचे ठिपके आढळतात.
नियंत्रण- या रोगाच्या नियंत्रणासाठी ३० ग्रॅम डायथेन एम-४५ किंवा २० ग्रॅम डायथेन झेड-७८ दहा लिटर पाण्यात मिसळून पिकावर फवारणी करावी.
ब्ल्यू मोल्ड- हा रोग पेनिसिलियम आईसलॉन्डिकम या बुरशीच्या प्रादुर्भावामुळे होतो. तपकिरी रंगाचे लिबलिबीत ठिपके फळांवर दिसून येतात. या ठिपक्यांवर निळसर हिरव्या रंगाची बुरशी वाढलेली दिसते.
नियंत्रण- बागेत स्वच्छता राखावी. बोरॅक्स किंवा मिठाच्या द्रावणाची फळांवर प्रक्रिया करावी.
बड नेक्रोसिस- या रोगामुळे आवळ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. आवळ्याच्या फळांवर काळपट रंगाचे डाग पडतात. त्यामुळे अशा डाग पडलेल्या आवळ्यांना बाजारात कमी किंमत मिळते.
नियंत्रण- नेक्रोसिस या रोगाच्या नियंत्रणासाठी ४० ग्रॅम बोरॅक्स पावडर १० लीटर पाण्यात मिसळून पिकावर फवारणी करावी.
काढणी व उत्पादन-
आवळ्याच्या रोपांची लागवड केल्यापासून ६-७ व्या वर्षी फळे मिळण्यास सुरूवात होते. आवळ्याच्या झाडाची डिसेंबर-जानेवारीमध्ये पानगळ होते आणि मार्च-एप्रिल महिन्यात फुलोरा येतो. हिवाळ्यात ऑक्टोबर-नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंत फळांची तोडणी करता येते. फळे सुरूवातीला हिरवट दिसतात, पण पक्व झाल्यावर हिरवट पिवळी किंवा विटकरी रंगाची दिसतात. पक्व फळे टणक असतात. फळे आकडीने किंवा बांबूने हलवून काढावी लागतात. चांगली वाढ झालेल्या कलमी आवळ्यापासून दरवर्षी १५०-२०० किलो फळे मिळतात.
लेखक
श्री सुचित लाकडे
विषय विशेषज्ञ(उद्यानविद्या)
कृषी विज्ञान केंद्र साकोली जि. भंडारा
८३२९७३७९७८
Published on: 24 June 2020, 05:20 IST