ज्वारी हे पिक ग्रॅमिनी या वंशातील असून, त्याचे शास्त्रीय नाव ‘सोरगम बायकोलार’ असे आहे. ज्वारीच्या कणसाचा आकार, दाटपणा व दाण्याचा आकार यावरून ज्वारीचे पाच प्रकार आढळतात. ते म्हणजे बायकोलार, गुनीया, कोडॅटम, काफिर आणि ड्युरा. ज्वारीची प्रथम उत्पत्ती इथियोपिया या आफ्रिकन देशात झाली आहे. जगामध्ये अमेरिका, नायजेरिया, मेक्सिको, भारत, सुदान, अर्जेंटिना, चीन, इथोयोपिया, ऑस्ट्रेलिया, बक्रीना, फॅस्को आणि ब्राझील हे ज्वारीचे प्रमुख उत्पादक देश आहेत. जागतिक स्तरावर ज्वारी हे गहू, मका, भात व बार्ली यांच्यानंतर पाचव्या क्रमांकाचे प्रमुख अन्नधान्य पीक आहे. भारत हा जगातील ज्वारी उत्पादक देशातील चौथ्या क्रमांकाचा देश असून एकूण उत्पादनाच्या 18 टक्के वाटा भारताचा आहे. महाराष्ट्रा खालोखाल कर्नाटक, राजस्थान, मध्य प्रदेश व आंध्रप्रदेश या राज्यांचा क्रमांक लागतो. परंतु, उत्पादकतेचा विचार करता मध्य प्रदेश त्या पाठोपाठ आंध्रप्रदेश, कर्नाटक या राज्यांचा क्रमांक लागतो.
ज्वारीची भाकरी गोडसर चवीची, चांगल्या टिकवण क्षमतेची, आकर्षक, पांढऱ्या रंगाची आहे. या भाकरीतील प्रथिनांचे प्रमाण अधिक असून, पिष्टमय घटक, शर्करा आणि खनिजद्रव्ये अधिकतम आढळतात. ज्वारीच्या दाण्यातील गुणप्रत अनेक भौतिक, रासायनिक व प्रक्रिया तंत्रज्ञानाच्या बाबीवरती अवलंबून असते. आपल्याकडे प्रामुख्याने ज्वारीचा उपयोग ज्वारीची भाकरी म्हणूनच मोठ्या प्रमाणात करतात; तथापि काही वाणांचा उपयोग इतर अनेक खाद्यपदार्थांसाठी केला जातो. आहारदृष्ट्या ज्वारीच्या दाण्यांत ओलावा (आर्द्रता) आठ ते दहा टक्के, प्रथिने 9.4 ते 10.4 टक्के, तंतुमय घटक 1.2 ते 1.6 टक्के, खनिजद्रव्ये 1.0 ते 1.6 टक्के, उष्मांक 349 किलो कॅलरीज, कॅल्शिअम 29 मिलिग्रॅम, किरोटीन (प्रो-व्हिटॅमिन ए) 47, थायमिन 37 मिलिग्रॅम प्रति 100 ग्रॅममध्ये आढळतात. ज्वारीमध्ये लायसीन व मिथिलोअमाईन ही आवश्यक अमिनो ऍसिड्स मर्यादित प्रमाणात आढळतात. पांढऱ्या ज्वारीमध्ये टॅनिन नावाचा ऍण्टी न्यूट्रिशनल (अपायकारी) घटक आढळत नाही, तो लालसर ज्वारीत भरपूर प्रमाणात असतो.
हेही वाचा:गुणकारी कुळीथ / हुलगा
ज्वारीच्या भाकरीचे आहारातील महत्व:
आपल्या रोजच्या आहारात असणारे वेगवेगळे अन्नघटक आपल्या रोजच्या पोषणात महत्त्वाची भूमिका बजावत असतात. त्याबद्दल आपण बारकाईने माहिती करून घेणे गरजेचे आहे. आपल्या जेवणामध्ये प्रामुख्याने पुरी, चपाती, नान, पराठ्याचा समावेश असतो. यांच्यामुळे आहारातील ज्वारीच प्रमाण फारच कमी झाल आहे. आधुनिक काळात डायट प्लॅनमध्येही ज्वारीचा समावेश नसतो. त्यातल्या त्यात शहरी भागात तर ज्वारीची मागणीपण कमी झाली आहे, मात्र ग्रामीण भागात आजही ज्वारीचा बऱ्याच प्रमाणात वापर केला जातो. त्यामुळेच कदाचित शहरातील लोकांपेक्षा ग्रामीण भागातील लोकांच्या आरोग्यविषयक तक्रारी कमी असतात. ज्वारीची भाकरी ही पचण्यास अतिशय सोपी आणि आरोग्याच्यादृष्टीने अतिशय गुणकारी ठरते. त्यामुळे रोज नाही पण आठवड्यातून किमान दोन-तीन वेळा तरी ज्वारीच्या भाकरीचा आहारात समावेश करावा. रजोवृद्धीच्या काळात ज्वारीची भाकरी आणि ज्वारीपासून बनवलेले पदार्थ खाल्ल्यास हार्मोन्सचे असंतुलन होण्याची समस्या निर्माण होत नाही. ज्वारीचे पदार्थ खाल्ल्याने ब्रेस्ट कॅन्सर नियंत्रणात राहतो, असे अभ्यासावरून सिद्ध झाले आहे. ज्वारीच्या भाकरीचे अनेक गुणधर्म आहेत, ज्यामुळे आपणास नक्कीच फायदा होणार आहे. त्यामुळे शक्यतो ज्वारीचा आहारात समावेश करुन घ्याच.
ज्वारीच्या भाकरीचे आरोग्यदायी फायदे:
ज्वारीमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असल्याने शरीरास पटकन ऊर्जा मिळते. कमी खाऊनही पोट भरल्याची जाणीव होते. ज्वारीमध्ये असणाऱ्या अमिनो ऍसिड्समधून शरीरास मुबलक प्रोटीन्स मिळतात. तसेच फायबर्स असल्याने सहज पचन होते. बद्धकोष्ठतेचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाण्याची सवय लावून घ्यावी. त्यामुळे मूळव्याधाचा त्रास होत नाही. तसेच ज्यांना किडनी स्टोनचा त्रास टाळायचा असेल त्यांनी नक्कीच ज्वारीची भाकरी आहारात आणावी. ज्वारीतील पोषणतत्त्वामुळे किडनी स्टोनला दूर ठेवता येते. ज्वारीमध्ये असणाऱ्या निऍसिनमुळे रक्तातील कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. तसेच ज्वारीमधील फायटो केमिकल्समुळे हृद्यरोग टाळता येतात. ज्वारीमधल्या पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि मिनरल्समुळे ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते. भाकरीत लोह मोठ्या प्रमाणात असते. ऍनिमियाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाल्ल्यास त्यांना फायदा होतो. लाल पेशींची वाढ होण्यास मदत होते. या आरोग्यदायी ज्वारीचे फायदे खालीलप्रमाणे आहेत.
हेही वाचा:ड्रॅगन फ्रुटचे आरोग्यदायी फायदे
- ब्लडप्रेशर व हृदयासंबंधित आजार
सध्याब्लडप्रेशर आणि हृदयासंबंधित आजारांच्या समस्या वाढल्या आहेत. या दोन्हीवर मात करायची असेल तर आहारात ज्वारीचे सेवन गरजेचे आहे. ज्वारीमध्ये पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि मिनरल्समुळे ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते. - महिलांमध्ये मासिक पाळी आणिगर्भाशयाच्या समस्या
वाढत्या प्रदुषणामुळे आणि दगदगीच्या आयुष्यामुळे महिलांमध्ये मासिक पाळी आणि गर्भाशयाच्या समस्या भरपूर प्रमाणात वाढल्या आहेत. या संदर्भातील समस्यांमुळे जेवणात ज्वारीचं सेवन खुप महत्वाचं ठरते. - पोटांच्या सामाशांवर उपयुक्त ठरते
- ज्वारीत मुबलक प्रमाणात तंतुमय पदार्थ असतात त्यामुळे त्याने पोट साफ होण्यास मदत होते. ज्या व्यक्तींना एसिडिटीचा त्रास आहे त्यांनी चपातीच्या ऐवजी आहारात ज्वारीची भाकरी समाविष्ट करावी. ज्वारीच्या सेवनाने मुळव्याधीचा त्रास देखील कमी होण्यास मदत होते.
- एनिमियाचा त्रास कमी होतो
ज्वारीत भाकरीत लोह मोठ्या प्रमाणात असते. एनिमियाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाल्ल्यास त्यांना फायदा होतो. - लठ्ठपणा कमी होते
सध्या लठ्ठपणाचे प्रमाण वाढले आहे. लठ्ठपणामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते. त्यामुळे जेवणात ज्वारीचे सेवन केल्यास लठ्ठपणा (अतिरिक्त चरबी) कमी होण्यास मदत होते. - मधुमेहाच्या रुग्णांसाठी उपयुक्त ठरते
ज्वारी शरीरातीलइन्शूलिनची पातळी प्रमाणात ठेवण्यास मदत करते त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी ज्वारीची भाकरी अत्यंत गुणकारी ठरते. - किडनी स्टोनचा त्रास कमी होते
ज्वारीत असणारी पोषक तत्व किडनीस्टोनला आळा घालतात, त्यामुळे किडनी स्टोनचा त्रास होणाऱ्या व्यक्तीने ज्वारीची भाकरी किंवा इतर स्वरूपातील ज्वारीचे पदार्थांचा आहारात नक्की समावेश करावा. - कोलेस्टेरॉलची पातळी कमी करते
ज्वारीचे सेवन रक्तवाहिन्यांतील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी उपयुक्त असते. त्यामुळे तुम्ही ज्वारीची भाकरी खात नसाल तर आहारात ज्वारीच्या भाकरीचा नक्की समावेश करा.
श्री. देसाई जी. बी, डॉ. सावते ए. आर आणि डॉ. क्षीरसागर आर. बी.
(अन्न अभियांत्रिकी विभाग, अन्न तंत्र महाविद्यालय व.ना.म.कृ.वि. परभणी)
9891842525
Published on: 18 April 2019, 04:05 IST