पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असून सरकारच्या सर्व योजनापैकी एक यशस्वी योजना आहे. आपल्याला माहित आहेच की, या योजनेच्या माध्यमातून शेतकरी बंधूंना वार्षिक सहा हजार रुपयाची आर्थिक मदत तीन टप्प्यात विभागून करण्यात येते.
आतापर्यंत या योजनेचे 11 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट वर्ग करण्यात आले असून आता बऱ्याच दिवसापासून पीएम किसान योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना बाराव्या हप्त्याची प्रतीक्षा होती.
परंतु आता ही प्रतीक्षा संपत येत असून पीएम किसान योजनेच्या बाराव्या हप्त्यासंदर्भात एक महत्वाची बातमी समोर आली आहे. जर आपण मीडिया रिपोर्टमध्ये केलेल्या दाव्याचा विचार केला तर या योजनेचा बारावा हप्ता हा 17 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील 10 कोटीपेक्षा अधिक शेतकऱ्यांना हस्तांतरित करणार आहेत.
या हप्त्यापोटी जवळजवळ पंचवीस हजार कोटी रुपयांपेक्षा जास्तीचा निधी केंद्रशासन पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करणार आहे. 17 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुसा कॅम्पस मध्ये कृषी स्टार्टअप कॉनक्लिव आणि किसान संमेलनाचे उद्घाटन करणार आहेत व या वेळी शेतकऱ्यांना बारावा हप्ता देखील पाठवला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
महाराष्ट्रातील एवढ्या शेतकऱ्यांना मिळेल लाभ
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या पात्र लाभार्थ्यांचा जर आपण महाराष्ट्रातील विचार केला तर महाराष्ट्रामध्ये एक कोटी पाच लाख शेतकरी बांधवांना या योजनेचा फायदा मिळत असल्याचे एका रिपोर्टमध्ये सांगितले गेले होते.
बाराव्या हप्त्याला उशीर का लागला?
आपल्याला माहित आहेच कि, या योजनेचा लाभ अनेक अपात्र शेतकऱ्यांनी देखील घेतला असून या योजनेमध्ये पारदर्शकता यावी यासाठी अनेक बदल करण्यात आले आहेत.
मात्र शेतकऱ्यांना देखील आता केवायसी बंधनकारक करण्यात आले आहे त्यामुळे केवायसी करण्यासाठी अनेक प्रकारचे अडथळे येत असल्यामुळे देखील हा बारावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर उशिरा जमा होत आहे.
परंतु आता ही प्रतिक्षा संपली असून 17 ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा बारावा हप्ता दिला जाणार असल्याचा दावा अनेक मीडिया रिपोर्टमध्ये केला गेला आहे.
Published on: 13 October 2022, 07:04 IST