शिक्षणामध्ये विविध प्रकारचे कोर्सेस उपलब्ध असून नेमकी कोणत्या कोर्सची निवड करावी याबाबतीत पालक आणि विद्यार्थी कायमच गोंधळलेले दिसतात. दहावी आणि बारावी हे दोन वर्ष म्हणजे करीयरच्या बाबतीत टर्निंग पॉईंट असे म्हटले जाते. त्यामुळे दहावीनंतर काय? हा प्रश्न बऱ्याच जनांना पडतो. आता शेती म्हटले म्हणजे ग्रामीण भागाचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे.
अशा शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांनी जर कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला तर नक्कीच त्याचा फायदा त्यांच्या शेतीसाठी तर होईलच परंतु त्या संबंधित करिअरच्या देखील वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. हा कोर्स महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी सुरु केला आहे.
एकंदरीत या अभ्यासक्रमाचे स्वरूप
हा अभ्यासक्रम महात्मा फुले कृषी विद्यापीठ,राहुरी यांच्या मार्फत चालविला जातो. दहावी पास विद्यार्थ्यांना शेतीच्या संबंधित सर्व शिक्षण मिळण्यासाठी हा पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे.
तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्वयंरोजगार बाबत जागरूकता निर्माण व्हावी तसेच राज्य सरकारला देखील प्रशिक्षित कर्मचारी वर्ग उपलब्ध व्हावा या दृष्टिकोनातून हा अभ्यासक्रम चालवला जातो.
कृषी विद्यापीठाचे एकूण नऊ केंद्र आणि 76 कृषी प्रशिक्षण शाळांच्या मार्फत हा अभ्यासक्रम विद्यापीठ कार्यक्षेत्रात चालवला जातो. यामध्ये प्रत्येक केद्राची प्रवेशक्षमता ही 60 इतकी असते. जिल्ह्यानुसार गुणवत्ता यादी च्या माध्यमातून या अभ्यासक्रमाला प्रवेश दिला जातो.
कुठल्या अभ्यासक्रमाचा असतो समावेश?
हा अभ्यासक्रम दोन वर्षाचा असून पहिल्या वर्षाच्या अभ्यासक्रमात कृषी मुलतत्वे,प्रमुख पिकांचे उत्पादन तंत्रज्ञान तसेच विविध प्रकारची फळे व भाजीपाला यांचे उत्पादन व त्यासंबंधीचे तंत्रज्ञान,कृषी अवजारे व यंत्रे तसेच आधुनिक सिंचन पद्धती,पीकसंरक्षण,ग्रामीण भागाचे समाजशास्त्र व कृषी विस्तार व माहिती तंत्रज्ञान असा एकूण एक हजार 100 गुणांचा अभ्यासक्रम असतो.
यामध्ये 550 गुणांची परीक्षा आणि 550 गुण प्रॅक्टिकलला असतात.तसेच दुसऱ्या वर्षी सहकार पतपुरवठा व पणन,बिजोत्पादन तंत्रज्ञान तसेच विविध फळपिके व फळ भाज्यांचे रोपवाटिका व्यवस्थापन,फुलशेती व हरितगृह तंत्रज्ञान,पशुसंवर्धन
तसेच कुक्कुटपालन व रेशीम उद्योग,शेतीमाल प्रक्रिया व सेंद्रिय शेती कृषीआधारीत उद्योग यामध्ये प्रात्यक्षिक आणि लेखी असे एकूण 1 हजार 200 गुण असतात. दुसऱ्या वर्षी प्रॅक्टिकल परीक्षेला साडेआठशे आणि लेखी परीक्षेला साडेतीनशे गुण निश्चित असतात.
या अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया
कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रमाचे प्रवेश प्रक्रिया साधारणपणे जुलै ते सप्टेंबर या दरम्यान पार पडते. अभ्यासक्रमासाठी दहावी उत्तीर्ण होण्याची अट असून यासाठी शासकीय संस्थेत प्रवेश घेतल्यास दोन वर्षाची फि साधारणपणे 40 हजारांच्या जवळपास असते तर खासगी संस्थेचे शुल्क हे 60 हजार रुपयांपर्यंत असू शकते.
Published on: 26 August 2022, 04:23 IST