मुंबई- गेल्या दीड वर्षापासून कोरोनाच्या (corona) संसर्गाला आळा घालण्यासाठी सार्वजनिक वावरावर निर्बंध आहेत. न्यायालयांपासून शाळांपर्यंत सर्व ठिकाणी वावरासाठी बंधने आहेत. गेल्या दीड वर्षापासून बहुतांश ठिकाणी शाळांच्या घंटा वाजल्याच नाहीत. त्यामुळे ऑनलाईन (online education) शिक्षणावर सर्वत्र भर दिला जात आहे. मात्र, ग्रामीण भारतातील ६० टक्के विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. ऑनलाईन शिक्षणाची गंगा बांधापर्यंत पोहचलीच नसल्याचे स्पष्ट होत आहे.
मोबाईल स्क्रीन विरुद्ध खडू-फळा:
एकीकडे कोरोना विरुद्धचा संघर्ष सुरू असताना पालक, विद्यार्थ्यांचा ऑनलाईन शिक्षणासाठी संघर्ष सुरू आहे. अद्यापही सर्वच विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाच्या संधी उपलब्ध होऊ शकल्या नाहीत. एका अहवालानुसार, भारतातील जवळपास ३० कोटी विद्यार्थ्यांच्या शिक्षण प्रक्रियेत खंड निर्माण झाला आहे. शिक्षणापासून वंचित ठरलेल्यांमध्ये ग्रामीण विद्यार्थ्यांचा सर्वाधिक सहभाग आहे.
ना वीज, ना इंटरनेट:
प्रयोगशील शिक्षणासाठी कार्यरत असलेल्या अझीम प्रेमजी फाऊंडेशन (Azim premji foundation) यांनी केलेल्या सर्वेक्षणात भारतातील ६० टक्के शालेय विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहत असल्याचा निष्कर्ष समोर आला आहे. इंटरनेटचा वापर, ऑनलाईन शिक्षणाला अनुकूल मोबाईलची कमतरता, वीजेची अनुपलब्धता, पालकांची आर्थिक स्थिती यासारख्या घटकांमुळे ऑनलाईन शिक्षणातील दरी रुंदावत आहेत.
हेही वाचा : दहावीचा निकाल जाहीर, निकालाची टक्केवारी 99.95
‘स्मार्ट’ शिक्षण केव्हा?
ऑनलाईन शिक्षणासाठी स्मार्टफोन्स असणे महत्वाचे आहेत. मात्र, अनेक कुटुंबाकडे स्मार्टफोन्सची उपलब्धता नाही. अल्प उत्पन्न गटातील विद्यार्थ्यांना यामध्ये सर्वाधिक फटका बसल्याचे चित्र आहे. तसेच कुटुंबात एकच फोन असल्यास मुलीऐवजी मुलाला मोबाईल देण्यास प्राधान्य दिले जात असल्याचे अहवालात नमूद केले आहे. मोबाईल डाटा सशुल्क आहे. त्यासाठी पालकांनाही आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. स्मार्टफोन्स उपलब्ध असलेल्या शहरी व निमशहरी ठिकाणी देखील इंटरनेटची गतीच्या समस्या उभी राहिली आहे.
शिक्षकही हवेत टेक्नोसॅव्ही(Technosavy teacher):
खडू-फळा ते मोबाईल स्क्रीन असा शिक्षणाचा प्रवास कोरोनाकाळात दिसून आला आहे. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणासाठी तंत्रनिपुणता, संवाद कौशल्य, टेक्नॉलॉजीचा प्रभावी वापर अत्यंत महत्वाच्या आहेत. मात्र, अनेक शिक्षक डिजिटल शिक्षणासाठी प्रशिक्षित नसल्याचे दिसून येते. वर्गाप्रमाणे ऑनलाईन शिक्षणात विद्यार्थ्यांशी भावनात्मक जुळवणूक करण्यात शिक्षक कमी पडत असल्याचे सार्वत्रिक चित्र आहे.
Published on: 07 August 2021, 09:02 IST