शेळी हा अतिशय उपयुक्त असणारा प्राणी मानवाने सर्वप्रथम हाताळला आहे. भारतातील शेतकऱ्यांना आवश्यक सहाय्यभूत उद्योगांपैकी शेळीपालन हा सर्वात जास्त नफा असलेला तसेच जास्त जबाबदारी नसलेला उद्योग आहे.
मधमाशीपालन, गोपालन कुक्कुटपालन या सहाय्यभूत उद्योगांमध्ये सहज, जादा जबाबदारी नसलेला आणि सर्वात जास्त नफा देणारा शेळीपालन उद्योग हा सध्या व्यावसायिक स्वरुपात आणणे सहज शक्य असूनही हा प्राणी दुर्लक्षित राहिला आहे. शेळीपालन हा आर्थिक दृष्ट्या कमी गुंतवणुकीचा व्यवसाय आहे. जातीवंत शेळ्यांची कमी वेळात जास्त वजन वाढ होते तसेच शेळ्यांच्या मांसाला बाजारात चांगली मागणी आहे. मादी शेळी १३ ते १४ महिन्यात दोनदा विते व दोन ते तीन करंडांना जन्म देत असते. शेळी ही वास्तविक गरिबांची बँक आहे.
हेही वाचा : शेळ्यांमध्ये बुरशीजन्य आजार का होतात? वाचा काय आहेत कारणे
शेळी किंवा करंडे कोणत्याही वयात कधीही विकू शकतो. शेळीपालनासाठी थोडेसे चिकित्सक नेहमी असावे लागणार आहे. ज्या शेळ्या तुम्हाला तिप्पट नफा मिळवून देणार आहेत त्यासाठी नेहमी चिकित्सक दृष्टीने विचार करीत राहिले पाहिजे. शेळ्यांना पौष्टिक आहार, रोगप्रतिबंधक व्यवस्थापन ठेवल्यास, त्यांना सहसा रोग होत नाहीत. शेळ्यांचे चांगल्या प्रतिने व्यवस्थापन केल्यास ८ ते १० महिन्यात शेळ्या गाभण राहू शकतात. त्यांना पौष्टिक आहार दिल्यास दर १३ ते १४ महिन्यात दोन वेते होतात. हे सगळे फायदे बंदिस्त शेळीपालनातून आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने मिळविता येतात बंदिस्त पद्धतीसाठी आवश्यक असलेल्या गोष्टी म्हणजे
1) शेळीला अधिक कोकरे झाली पाहिजेत
२) पिल्लांची वाढ अधिक वेगाने झाली पाहिजे
३) शेळ्यांची पचनशक्ती अधिक असली पाहिजे
या सर्व गोष्टी असणाऱ्या भारतीय वंशावळीच्या जसे की, उदा. उस्मानाबादी बोकडाचा किंवा आफ्रिकेतील बोअर जातीच्या बोकडाचा संकरासाठी वापर केला पाहिजे. आता अशा चांगले गुणधर्म असणाऱ्या जातीवंत बोकडाचे वीर्य संकलन करुन कृत्रिम रेतनाची सोय उपलब्ध आहे. ते वीर्य खरेदी करुन आपण द्रवनपत्र पात्रामध्ये साचवून ठेवू शकतो. ज्यावेळी माजाचे एकत्रिकरण करुन आपण कृत्रिम रेतनाने शेळ्या फळवू त्यावेळी निश्चित गर्भधारणेचे प्रमाण वाढलेले असेल. माचज एकत्रिकरणाचे फायदे म्हणजे- प्रत्येक शेळीवर वेगवेगळे लक्ष देण्याची गरज नाही किंवा सतत त्यांच्या माजावर लक्ष ठेवण्याची गरज पडत नाही. शेळ्यांमध्ये माजाचे एकत्रिकरण काहगी विशिष्ट प्रकारचे औषधे वापरुन किंवा बोकडाचा वापर करुन केल्या जाते.
हेही वाचा : गोट बँक; बकरी न्या अन् ४० महिन्यात चार करडंयासह परत करा
कृत्रिम रेतनाचे फायदे
-
नैसर्गिकरित्या जर आपण शेळ्या फळवल्या तर एका बोकडापासून एकच शेळी फळवली जाते आणि जर आपण कृत्रिम रेतनाद्वारे फळवली तर एका बोकडापासून १०-१२ शेळ्या फळवता येतात.
-
एकत्रित माज नियंत्रण करुन कृत्रिम रेतानाने शेळ्या फळवल्या तर गर्भधारणेचे प्रमाण वाढते आणि एकाच वेळी विक्रीसाठी बोकड तयार करता येतात.
-
कृत्रिम रेतन हे तंत्र वापरुन सुधारित जातीच्या बोकडाच्या वीर्याचा मोठ्या प्रमाणावर वापर करता येतो.विशेषत ज्या पशुपालकांना आपल्या जनावरांमध्ये संकरीकरणाद्वारे सुधारणा घडवून आणण्यासाठी सुधारित जातीचे नर पाळण्याची कुवत नसते. त्यांच्यासाठी कृत्रिम रेतन तंत्र हे एक वरदना आहे.
-
एखादा बोकड नैसर्गिक संकरासाठी वापरल्यास त्याच्यापासून वर्षाला ४० ते ५० वर्षाला करडांची पैदास होत असेल, तर त्याच नरापासून वर्षाला तीन हजार वीर्यमात्रा उपलब्ध होतात.
-
त्या वीर्यमात्रा वापरुन कृत्रिम रेतनाद्वारे फलिताचे प्रमाण जरी ३० ते ३५ टक्के मिळाले तरी त्यापासून अंदाजे एक हजार सुधारित संकरित करडांची पैदास होऊ शकते.
एकाच बोकडाचा सारख्या संकर झाल्यामुळे खेडेगावातील शेळ्यांचा दर्जा खालावत जात आहे व निपजणारी करडे उत्पादन क्षमतेच्या दृष्टीने फारच निकृष्ट असल्याचेही जाणवते. याचे आणखी एक कारण म्हणजे कोणी पाळलेला बोकड एखादा चांगला व जोमाने वाढणारा बोकड असला तर तो लवकर कत्तलीसाठी योग्य होतो व आर्थिक कारणास्तव अशा बोकडांची कत्तल होते. त्यामुळे पैदाशीसाठी उपलब्ध असलेला बोकड चांगल्या दर्जाचा नसतो. म्हणूनच कृत्रिम रेतनाद्वारे इनब्रीडिंग टाळण्यासाठी वीर्य उपलब्ध करणाऱ्या केंद्रांनी पुरेशा संख्येमध्ये एकमेकांशी नातेसंबंध नसलेले नर ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.
- कृत्रिम रेतन करण्यासाठी शक्य तो ज्या जातीच्या नराची वजनवाढ झपाट्याने होते त्या जातीच्या नराची वीर्य कांडी वापरावी.
- कृत्रिम रेतनामुळे सशक्त करडे जन्माला येतात, त्यामुळे मरतुकीचे प्रमाण कमी राहते.
- नैसर्गिक संकरासाठी एकाच नराचा अनेक माद्यांशी संपर्क येतो.
- यामधून नराकडून मादीला व मादीकडून नराला प्रजनन संस्थेच्या सांसर्गिक रोगांचा संसर्ग होण्याची शक्यता असते. कृत्रिम रेतनाद्वारे हे टाळता येते.
जेव्हा शेळ्यांचा माजाचा हंगाम नसतो, त्या वेळेस नैसर्गिक संकरासाठी नर अनुत्सुक असतो आणि त्याच्या वीर्याची प्रतदेखील खालावते. अशावेळेस गोठविलेले वीर्य व कृत्रिम रेतन उपयुक्त ठरते. शेळ्यांमधील जनुकीय सुधारणा आणि शेळ्यांची उत्पादन क्षमता वाढविण्याच्चा दृष्टीने शेळ्यांमधील कृत्रिम रेतन कार्य विस्तारित करण्याचा हेतू आहे. भारतामध्ये ओरिसा, तामिळनाडू, कर्नाटक व मध्य प्रदेश या राज्यांनी त्यांच्याकडील पशुवैद्यांना शेळ्यांमधील कृत्रिम रेतनाचे प्रशिक्षण दिलेले आहे व ह्या राज्यांनी त्यांच्या भागात बोअरच्या गोठविलेल्या वीर्यमात्रा नेऊन त्यांचा वापर केलेला आहे.
महाराष्ट्र हे प्रगतीशील राज्य आहे आणि नवीन उपक्रमांचे प्रणेते आहे. कृत्रिम रेतनाद्वारे शेळी सुधारणामध्ये सुद्धा महाराष्ट्र अग्रेसर होऊ शकेल. यामुळे विकासापासून वंचित राहिलेल्या आणि द्रारिद्यरेषेखालील भूमीहीन गरीब स्त्रियांना व शेतमजुरांना लाभ मिळून त्यांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावू शकणार आहे. म्हणून ग्रामीण भागात सुबत्ता वाढविण्यास मदत करणाऱ्या शेळ्यांमधील कृत्रिम रेतन ह्या नवीन संकल्पनेचा विचार करु.
लेखक
डॉ. मंजुषा पाटील
चिकित्सालय निबंधक
स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था अकोला
डॉ. सुजाता सावंत
डॉ.पंकज हासे
सहाय्यक प्राध्यपक
स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था , अकोला
फोन -९८९०२४८४९४
Published on: 26 February 2021, 06:15 IST