Animal Husbandry

सध्या कोरोना विषाणूजन्य आजाराबरोबर परतीच्या मान्सूनने मोठ्या प्रमाणावर खरीप पिकांची नासाडी झालेली आहे. अतिवृष्टीमुळे पिके वाहून गेली तसेच पिके पावसात भिजल्यामुळे तीही कुजुन गेली त्यासोबतच जनावरांना मिळणारा सकस चाऱ्याचा प्रश् सतावत आहे. पशुधन म्हटले कि, आहारामध्ये स्वच्छ पाणी, हिरवा तसेच वाळलेला चारा पशुखाद्य खनिज मिश्रने यांची अत्यंत गरज असते.

Updated on 30 October, 2020 1:01 PM IST


सध्या कोरोना विषाणूजन्य आजाराबरोबर परतीच्या मान्सूनने मोठ्या प्रमाणावर खरीप पिकांची नासाडी झालेली आहे. अतिवृष्टीमुळे पिके वाहून गेली तसेच पिके पावसात भिजल्यामुळे तीही कुजुन गेली त्यासोबतच जनावरांना मिळणारा सकस चाऱ्याचा प्रश् सतावत आहे. पशुधन म्हटले कि, आहारामध्ये स्वच्छ पाणी, हिरवा तसेच वाळलेला चारा पशुखाद्य खनिज मिश्रने यांची अत्यंत गरज असते. असंतुलित तसेच निकृष्ट दर्जाचा हिरवा चारा, तसेच पशुखाद्य जनावरांना खाऊ दिल्याने जनावरांच्या आरोग्यावर व दूध उत्पादनावर त्याचा खूप मोठा परिणाम दिसून येतो. अशावेळी पशुपालक जे मिळेल ते खाद्य जनावरांना प्रमाणापेक्षा जास्त पुरवितात त्यावेळी दुधाच्या प्रमाणात खर्चात खूप वाढ होऊन जनावरांच्या विविध तक्रारी निर्माण होतात तसेच संकरित जनावरे रोगाला लगेच बळी पडतात आणि खर्चाचा ताळमेळ बसत नाही. निकृष्ट प्रतीचा चारा जनावरांनी खाल्ल्यास जनावरे अशक्त तसेच कुपोषित बनतात.

काही पशुपालक नेहमी हिरवा चारा दुसरीकडून खरेदी करतात तेव्हा रोगमुक्त तसेच सकस चाऱ्याची हमी नसते. तेव्हा त्या बुरशीयुक्त चाऱ्याचे पशुधनावर व दुग्ध उत्पादनावर  होणारे परिणाम खूप घातक स्वरूपाचे असतात. त्यासाठी योग्यवेळीच पशुआहारातील चाऱ्याचे महत्व पशुपालकांनी जाणून घेऊन योग्य ती अंमलबजावणी करणे महत्वाचे असते.  आज आपण अशाच एका बुरशीविषयी जाणून घेणार आहोत.

अफ्लाटॉक्सीन (बुरशी) म्हणजे काय ?

भिजलेला, काळा, बुरशीयुक्त वाळला चारा, भिजलेले पशुखाद्य, निकृष्ट दर्जाची चारा प्रक्रिया व चाऱ्याची अयोग्य साठवणुक यामुळे पशुखाद्य व चारा यामध्ये अॅस्परजीलस प्रजातीच्या हानिकारक बुरशीची वाढ होते. या बुरशीपासून अफ्लाटॉक्सीन नावाचे खाद्यात विष तयार होते. हे विष खाद्यातून प्रथम जनावराच्या शरिरात जाते व नंतर दुधात येते. त्याचे अनेक गंभीर परिणाम उद्भवत असतात. यामुळे असे विषयुक्त दूध मानवी आरोग्यास धोकादायक ठरते, त्यामुळे दूध उत्पादकांनी याबाबत योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे.

 जनावरांच्या आहारात बुरशीयुक्त चारा येण्याची प्रमुख कारणे-

  • मुरघासातील व पाण्याचे प्रमाण लक्षात न घेतल्यास
  • बंकर तयार करताना त्याला १ फुटाचा उतार न दिल्यास.
  • मुरघासामध्ये टाकण्यात येणाऱ्या कल्चरचे प्रमाण कमी जास्त झाल्यास.
  • बंकरमध्ये मुरघास तयार करतांना पूर्णपणे हवा बंद न झाल्यास.
  • मुरघास पिशवीत, खड्डयात, किंवा बंकरमध्ये पाणी किंवा हवा शिरल्यास.
  • बॅगेतील मुरघास केल्यानंतर ५ दिवसांनी त्या बॅगेमधील हवा बाहेर न काढल्यास.
  • मुरघास तयार झाल्यानंतर जनावरांना खायला दिल्यानंतर बॅग चांगली बंद न केल्यास.
  • मुरघास तयार करतांना रोगयुक्त किंवा बुरशी लागलेली चारा पिके वापरल्यास.
  • हॉटेलमधील किंवा समारंभातील उरलेले तसेच बुरशी लागलेले अन्न खाऊ घातल्यास.
  • कारखान्यातून निघणारे टाकाऊ पदार्थ मोलासेस, बार्ली इत्यादी  जनावरांना खाऊ घातल्याने. 
  • पशुखाद्द्य तसेच भरड्यासाठी वापरण्यात येणाऱ्या धान्यास बुरशी लागलेली असल्यास.
  • पावसात भिजलेली सरकी पेंढ काही दिवसानंतर जनावरांना खाऊ घातल्यास.
  • पशुखाद्य किंवा पेंढ यांचा पाण्याशी संपर्क आल्यास किंवा खाद्य पावसात भिजल्यास.
  • पशुखाद्द्य, पेंढ किंवा धान्याची साठवणूक अति दमट ठिकाणी अधिक काळ केल्यास.
  • चारा पूर्णपणे वाळलेला नसताना रचून ठेवल्यास किंवा वाळलेला चारा पावसात भिजल्यास.
  • वाळलेला चारा उदा. ज्वारीचा, बाजरीचा कडबा, मका, कडवळ, गहू, तूर, हरभरा, सोयाबीनचा भुसा पावसात किंवा पाण्याने भिजल्यास.
  • हिरव्या चाऱ्यामध्ये रसशोषक कीटकांचा तसेच अळीचा प्रादुर्भाव जास्त असल्यास ते जनावरांच्या खाण्यात आल्यास.

 


बुरशीयुक्त खाद्द्याचे जनावराच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम -

  1. चाऱ्याचा कुबट वास आल्याने जनावर चारा कमी खाते त्यामुळे दूध उत्पादन कमी होते.
  2. गर्भाची वाढ पूर्ण वाढ होत नाही, परिणामी गर्भपात होतो.
  3. खुरांचे विकार जडतात यकृतास इजा होते,
  4. मुत्रपिंडावर दुष्परिणाम होतात
  5. वासरांची वाढ खुंटते.दुधातील फॅट व एसएनएफचे प्रमाण कमी होते.
  6. काससुजी होते त्यामुळे वैधकीय खर्च खूप जास्त होतो.
  7. जनावरांमध्ये माजाच्या तक्रारी निर्माण होतात परिणामी जनावर सांभाळण्याचा खर्च वाढतो.
  8. गायी अनियमित माजावर येतात तसेच त्या वारंवार उलटतात.
  9. रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन जनावरे वारंवार आजारी पडतात.
  10. जठर व आतड्यास इजा होऊन रक्तस्त्राव होतो.
  11. जनावराला सारखी हगवण लागल्याने जनावर अशक्त होते.
  12. बुरशीयुक्त चारा जास्त खाण्यात आल्याने शरीरावर तेज दिसत नाही.

हेही वाचा : जनावरांतील दुग्धज्वर: कोणत्या कारणांमुळे होतो मिल्क फिवर ; जाणून घ्या! उपचार अन् लक्षणे

अफ्लाटॉक्सीनचे मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम-

  1. लहान मुलांची वाढ होत नाही तसेच उलट्या होतात.
  2. अपचन होते तसेच पोटात सारख्या वेदना होतात.
  3. सारखा ताप येतो,कावीळ होते.
  4. अवयवांचे कर्करोग तसेच यकृताचे आजार जडतात.
  5. रोगप्रतिकारक शक्ती कमी होते परिणामी मृत्यू येऊ शकतो.
  6. भुक मंदावते त्यामुळे अशक्तपणा येतो. 
  7. फुफ्फुसाचा दाह होतो तसेच मूत्रपिंडाचे कार्य बंद होते.  

प्रतिबंधात्मक उपाययोजना -

  1. मुरघासासाठी चारा कापताना जमिनीपासून अर्धा फूट उंचीवरून कापावा.
  2. मुरघास तयार करतांना चाऱ्यातील पाण्याचे प्रमाण ६५ ते ७०% पेक्षा जास्त नसावे.
  3. मुरघास तयार करतांना तळाशी व सर्वात वर वाळलेली वैरण कुट्टी किंवा भुस्सा याचा थर द्यावा आणि व्यवस्थित दाबून हवा बंद करावा.
  4. बंकर, बॅग, तसेच खड्ड्यातील मुरघासात हवा व पाणी जाणार नाही याची काळजी घ्यावी.
  5. मुरघासाचा बंकर, बॅग,किंवा खड्डा उघडल्यास गरजेनुसार रोज मुरघासाचा थर काढून घ्यावा व पुन्हा तो हवा बंद करून ठेवावा.
  6. रोगयुक्त तसेच बुरशी लागलेल्या चारापिकांचा मुरघास करणे टाळावे.
  7. पशु खाद्यासाठी वापरण्यात येणाऱ्या धान्यास बुरशी लागलेली नसावी.
  8. पशुखाद्य खरेदी करताना उत्तम दर्जाचे तसेच पाण्याचे प्रमाण पाहून खरेदी करावे.
  9. पशुखाद्य तसेच धान्याची साठवणूक नेहमी कोरड्या व हवेशीर ठिकाणी करावी.
  10. पशुखाद्द्यास ओलावा किंवा पाणी लागणार नाही, याची खबरदारी घ्यावी.
  11. बुरशीयुक्त सरकी पेंड, पशुखाद्द्य, हिरवा चारा, किंवा मुरघास जनावरास देऊ नये. 
  12. चारा पिकांना बुरशी लागू नये, यासाठी आवश्यकतेनुसार जैविक बुरशीनाशके व कीटकनाशके यांची फवारणी करावी.
  13. वाळलेला चारा भिजणार नाही अशा रीतीने रचून व झाकून ठेवावा तसेच गरजेनुसार शेडची व्यवस्था करावी. 
  14. दुधाळ जनावरांच्या आहारात नेहमी चांगल्या प्रतीच्या टॉक्सीन बाईंडरचा वापर करावा. (२०मि. ग्रॅम./दिन) 
  15. असिडॉसीस (पोटफुगी) मात करण्यासाठी जनावरांच्या आहारात दररोज खाण्याचा सोड्याचा वापर करावा.(५०ग्रॅम./दिन).  

लेखक -

प्रा. नितीन रा. पिसाळ,

डेअरी प्रशिक्षक,स्किल इंडिया प्रोजेक्ट,

विद्या प्रतिष्ठान कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, बारामती.

मो.नं- 8007313597; ई-मेल-nitinpisal2312@gmail.com


English Summary: Aflatoxin has adverse effects on human health, including livestock, find out! Causes of fungal fodder
Published on: 30 October 2020, 01:00 IST