शेतकऱ्यांनी आता विविध पिकांच्या लागवडीकडे कल वळवला असून बरेच शेतकरी फुलशेतीत स्वतःचे नशीब अजमावून पाहत आहे. तसेच आपल्याकडे बर्याच प्रकारच्या विविध प्रकारच्या फुलांची लागवड केली जाते. परंतु त्यातील निशिगंध ज्याला गुलछडी असे देखील म्हणतात.फुलशेती मध्ये निशिगंधाची लागवड खूप लाभदायी ठरू शकते.
भारतातील उष्ण आणि आल्हाददायक जे हिवाळी हवामान आहे, ते या पिकाला खूप मानवते. जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर नाशिक, सोलापूर, नगर तसेच पुणे आणि औरंगाबाद जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर निशिगंध फुलाची उत्पादन घेतले जाते.
एकदा लागवड केली ते तीन ते चार वर्षापर्यंत फुलांचे उत्पादन मिळते.एवढेच नाही तर अगदी बारा महिने या फुलांचे उत्पादन मिळत असल्याने मोठ्या प्रमाणात नफा मिळतो.
निशिगंध लागवडीसाठी आवश्यक हवामान
या पिकास उष्ण आणि दमट हवामान तसेच 25 ते 30 अंश सेल्सिअस तापमान आणि 50 ते 55 आद्रता असलेल्या परिसरात निशिगंधाचे वाढ चांगली होते. तसेच निकोप आणि भरघोस वाढीसाठी स्वच्छ सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. 42 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त आणि 10 अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमान या पिकास अपायकारक ठरते.
लागणारी जमीन
निशिगंधाचे पिकासाठी कोणत्याही प्रकारची जमीन चालते. अगदी तुमच्याकडे क्षारयुक्त जमीन असेल त्याच्यात सुद्धा तुम्ही निशिगंधा लागवड करू शकता. जमीन फक्त पाण्याचा निचरा होणारी आणि भरपूर सेंद्रिय पदार्थ समाविष्ट असलेली असावी.
जर तुम्हाला निशिगंधा फुलांचे दर्जेदार उत्पादन हवे असेल तर जांभ्या दगडाच्या वाळूमिश्रित आणि सामू साडेसहा ते सात असलेल्या जमिनीत याची लागवड करणे योग्य ठरते. जर जमीन हलकी असेल तर निशिगंधाचे फुलदांडे आणि फुले लहान राहतात. तसेच काळी जमीन असली तर मर आणि मुळकुज याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो.
निशिगंधाच्या प्रकारानुसार जाती
जर तुम्ही निशिगंधाच्या जातींचा विचार केला तर फुलांच्या प्रकारानुसार सिंगल, डबल, सेमी डबल आणि व्हेरीगेटेड असे चार प्रकार पडतात.
निशिगंधाची लागवड
सरी वरंबा किंवा सपाट वाफे पद्धतीने निशिगंधाची लागवड करावी.तसेच जमीन पाण्याचा चांगला निचरा होणारी हलकी असेल तर सपाट वाफे पद्धत निवडावी आणि जमीन मध्यम आणि पाण्याचा कमी निचरा होणारी असेल तर सरी-वरंबा पद्धतीचा वापर करावा.
वाफे तयार करताना जमिनीचा उतार लक्षात घेऊन वाफे तयार करावेत. सर सरी-वरंब्यावर लागवड करायची असेल तर 60 सेंटिमीटर अंतरावर सऱ्या काढून प्रत्येक वरंब्याच्या दोन्ही बाजूस 20 ते 30 सेंटिमीटर अंतरावर कंदाची लागवड करावी.
जर सपाट वाफ्यात लागवड करायची असेल तर दोन ओळीत 20 ते 30 सेंटिमीटर आणि दोन कंदामध्ये पंधरा ते पंचवीस सेंटिमीटर अंतर ठेवावे जमिनीमध्ये कंद पाच ते सहा सेंटीमीटर पुरावा एका ठिकाणी एकच कंद लावा व पाणी लगेच द्यावे. एक हेक्टर लागवड करायची असेल तर 60 ते 70 हजार कंद पुरेसे होतात.
खत व्यवस्थापन
लागवड करन्याआधी तुमच्याकडे शेणखत नसेल लागवडीसाठी निवडलेल्या जमिनीत तागासारखे हिरवळीचे पीक घ्यावे. पीक जमिनीत गाडावे आणि चांगले कुजल्यानंतर त्या जमिनीत निशिगंध लागवड करावी.
जास्त उत्पादनासाठी हेक्टरी 100 किलो नत्र, 200 किलो स्फुरद आणि 200 किलो पालाश यांची मात्रा योग्य ठरते. नत्राची मात्रा तीन हप्त्यांत विभागून द्यावी व स्फुरद आणि पालाश लागवडीच्या वेळी द्यावे.
पाणी व्यवस्थापन
लागवडीनंतर पहिले पाणी लगेच द्यावे व दुसरे पाणी पाच ते सात दिवसाच्या अंतराने दिले तरी चालते. पावसाचा अंदाज घेऊन 10 ते 12 दिवसांनी पाणी व्यवस्थापन करावे. परंतु जेव्हा फुलांचे दांडे येण्यास सुरुवात होते तेव्हा नियमितपणे पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. अन्यथा फुलांच्या उत्पादनावर वाईट परिणाम होऊ शकतो.
Published on: 28 July 2022, 01:48 IST