कांदा आहे महाराष्ट्रातील प्रमुख पीक असून कांद्याची लागवड महाराष्ट्रातील बऱ्याच भागांमध्ये केली जाते. विशेष करून नाशिक जिल्हा हा द्राक्ष सोबत कांदा पीक लागवडीत देखील अव्वल आहे.
परंतु कांदा पिकाबाबत सगळ्यांना माहिती असलेली गोष्ट म्हणजे भावातील अनियमितता ही होय. कांद्याच्या भावात कायम चढ-उतार चालू असते. कांदा कधी कधी शेतकऱ्यांना हसवतो तर कधी कधी रडवतो. सध्या परिस्थितीचा विचार केला तर पाच ते सहा रुपये किलो दराने कांदा विकला जात आहे.
या भावात शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही. त्यामुळे जेव्हा मार्केटमध्ये कांद्याचे बाजार भाव कोसळतात तेव्हा बरेच शेतकरी कांदा साठवणुकीवर भर देतात. चाळीत कांदा साठवला जातो. परंतु कांद्याची साठवणूक करण्याअगोदर काही गोष्टींची काळजी घेणे खूप महत्त्वाचे असते. जेणेकरून चाळीत साठवलेला कांदा दीर्घकाळ टिकेल. यासंबंधी या लेखात माहिती घेऊ.
कांदा साठवण्यापूर्वी लक्षात ठेवायच्या बाबी
1- काढणी केल्यानंतर पाती सोबत कांदा सुकविणे- यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण कांदा काढतो, त्यावेळी त्याला लागलीच न खांडता अगोदर त्याला तीन ते चार दिवस पातिसोबत वाळवणे खूप महत्त्वाचे असते.
यामुळे होते असे की, साठवणुकीत कांद्याला सुप्तपणा देणारे जे जीवनसत्व असतात ते जीवनसत्व हळूहळू पाती च्या माध्यमातून कांद्यामध्ये उतरत असतात. त्यामुळे कांदा जमिनीतुन काढल्यानंतर पात सुकेल तोपर्यंत शेतात वाळवणे गरजेचे असते.
परंतु जेव्हा कांदा जमिनीतून काढला जातो तेव्हा त्याला सुकवितांना कांद्याचा ढीग करू नये. जमिनीवर एकसारखे पसरवून त्यांना सुकवावे. या मध्ये सुद्धा एक महत्त्वाची गोष्टीची काळजी घ्यावी ती म्हणजे पहिला कांदा दुसर्या कांद्याच्या पातीने झाकला जाईल याची काटेकोरपणे दक्षता घ्यावी.
2- कांद्याचे मान ठेवून कांदा पात कापणे- कांदा शेतात तीन ते चार दिवस वाळल्यानंतर त्याची पात चांगली सुकली की, कांद्याच्या मानेला पिळ देऊन एक ते दीड इंच मान ठेवून कांदापात कापावी. त्यामुळे साठवणुकीत कांद्याचे तोंड पूर्णपणे बंद राहते व त्यामुळे कांद्यामध्ये सूक्ष्म जिवाणूंचा शिरकाव होत नाही व कांदा सडत नाही.
यामुळे कांद्याचे बाष्पीभवन होऊन कांद्याच्या तोंडातून मोड येणे किंवा वजनात घट होण्यासारखे नुकसान टाळता येतात. जर असे केले नाही तर कांदे साठवणुकीसाठी टिकत नाहीत व मोठे नुकसान शेतकऱ्यांनाहोण्याची शक्यता असते.
3- साठवण्या अगोदर तीन आठवडे झाडाच्या सावलीत वाळवणे- साठवणे अगोदर कांदा तीन आठवडे चांगला सावलीत वाळवावा. त्यामुळे कांद्यामध्ये साठलेली उष्णता हळूहळू बाहेर पडते व कांद्याच्या बाहेरील सालीमध्ये असलेले पाणी पूर्णपणे सुकते व त्याचे पापुद्रात रूपांतर होते.
हे कांद्याचे पापुद्रे साठवणुकीत कांद्याचे नुकसानीपासून संरक्षण करते. कांद्यातील जास्तीचे पाणी व उष्णता निघून गेल्यामुळे कांदा सडत नाही कांद्याचे बाहेर पापुद्रा तयार झाल्यामुळे वातावरणातील आद्रता व रोग आणि किडींपासून कांद्याचा बचाव होतो. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे बाष्पीभवन रोखले गेल्यामुळे साठवणुकीत कांद्याचे वजनात घट येत नाही.
तसेच कांद्याच्या श्वसनाची क्रिया कमी झाल्यामुळे कांदा सुप्तावस्थेत जातो. या तीन तंत्रांचा अवलंब केला तर चार ते सहा महिन्यांपर्यंत कांदा चांगला टिकू शकतो.
महत्वाच्या बातम्या
नक्की वाचा:मोदी सरकार 'जन समर्थ' हे कॉमन पोर्टल सुरू करणार,अनेक सरकारी योजना एकाच ठिकाणी उपलब्ध
Published on: 30 May 2022, 10:06 IST