जर भाजीपाला पिकांच्या दृष्टिकोनातून विचार केला तर वांगी आणि मिरची या पिकानंतर भेंडीची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. भेंडी या भाजीपाला पिकाच्या माध्यमातून शेतकरी बंधू अगदी कमीत कमी वेळेत खूप चांगला पैसा कमवू शकतात. परंतु त्यासाठी भेंडी या भाजीपाला पिकाला व्यवस्थित पद्धतीने खत व्यवस्थापन करणे गरजेचे असते. जर या पिकाचा विचार केला तर काही रोगांचा प्रादुर्भाव देखील मोठ्या प्रमाणावर होतो.
तसेच किडींचा प्रादुर्भाव देखील तेवढाच होत असल्याकारणाने अगदी सुरुवातीपासून तंतोतंत व्यवस्थापन केले तर खूप चांगला पैसा भेंडी पिकाच्या माध्यमातून शेतकरी बंधूंना मिळू शकतो.त्या दृष्टिकोनातून या लेखांमध्ये आपण भेंडी पिकाला आवश्यक खत व्यवस्थापन आणि कीड व रोग व्यवस्थापनासाठीचे महत्वपूर्ण उपाय समजून घेऊ.
भेंडी पिकासाठी किड व रोग व्यवस्थापनासाठीचे उपाय
भेंडी पिकावर तुडतुडे, पांढरी माशी तसेच मावा सारख्या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो. जर रोगांच्या प्रादुर्भावाचा विचार केला तर हळद्या म्हणजेच येल्लो व्हेन मोझॅक हा एक गंभीर बुरशीजन्य रोग असून यामुळे भेंडी पिकाचे खूप नुकसान होते.
त्यासाठी भेंडी पीक उगवल्यानंतर त्याच्यासोबत थायमेट किंवा फ्युरॉडॉन 10 जी बुंद्याजवळ टाकून घ्यावे. असे केल्यामुळे पुढील 30 ते 40 दिवसांपर्यंत भेंडी पिकावर कुठल्याही प्रकारचे किडींचा प्रादुर्भाव होत नाही. दुसरा उपाय म्हणजे थायमेथॉक्साम पंचवीस टक्के डब्ल्यूजी पाच ग्रॅम पंधरा लिटर पाण्यात मिसळून दर पंधरा दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या करावे.
भेंडी पिकावरील दुसरी महत्वाची कीड म्हणजे फळ पोखरणारी आळी होय. या अळीच्या नियंत्रणासाठी इकॅलक्स वीस मिली फवारणी करणे गरजेचे आहे.
भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पांढरी माशी या रस शोषक किडीच्या नियंत्रणासाठी होस्टेथिओन वीस मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करणे गरजेचे असते.
परंतु भेंडी तोडणी सुरू झाल्यावर मात्र कडूनिंबापासून बनवलेली निमार्क नींबपावडर या कीटकनाशकाची फवारणी करावी. भेंडी लागवड केल्यानंतर 48 ते 52 दिवसात पहिली तोडणी सुरू झाली की प्रत्येक तोडणीमध्ये एक दिवसाचा गॅप देऊन तोडणी करणे गरजेचे असते.
भेंडी पिकासाठी खतांचे व्यवस्थापन
भेंडी पिकाला भरखते,वरखते यांचे योग्य मात्रा दिल्यास उत्पादनात वाढ होते सेंद्रिय खतांचा भरपूर वापर केल्यास खूप चांगले उत्पादन मिळते व भेंडीची प्रत देखील उत्तम असते.
रासायनिक खतांच्या वापर करताना प्रतिहेक्टरी 100 किलो नत्र आणि 50 - 50 किलो प्रत्येकी स्फुरद व पालाश देण्याची शिफारस यामध्ये आहे. भेंडी पिकाला नत्र खताची मात्रा जास्त देऊ नये. जर नत्रयुक्त खतांची मात्रा जास्त झाली तर भेंडीवर मावा, तुडतुडे तसेच पांढरी माशी सारख्या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणावर वाढतो.
Published on: 06 November 2022, 08:56 IST