शेतामध्ये वेगळ्या प्रकारचे गवत उगवते. परंतु यामध्ये जर आपण गाजर गवताचा विचार केला तर शेतकऱ्यांसाठी खूप मोठी समस्या निर्माण करणारे हे गवत आहे. महाराष्ट्रातील काही भागांमध्ये याला कॉंग्रेस गवत असेदेखील म्हटले जाते. आपल्याला माहित आहेच कि काही जणांना या गवताच्या संपर्कात आल्यावर त्वचेवर अॅलर्जी, पुरळ उठणे इत्यादी समस्या उद्भवतात. अगदी जनावरांनी जरी हे गवत खाल्ले तरी दुधाला कडूपणा येतो.
शेतामध्ये, शेताच्या बांधाला अशा बऱ्याच ठिकाणी हे गवत उगवते. या गवताचा नायनाट करण्यासाठी शेतकरी खूप वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना करतात मात्र दिवसेंदिवस या गवताचे प्रमाण वाढतच आहे.
परंतु आता शेतकरी बंधुंनी याबाबत काळजी करण्याची गरज असून या लेखात आपण गाजर गवताचा नायनाट करण्यासाठी उपयुक्त मित्र कीटकाची माहिती घेऊ.
गाजर गवताचा नायनाट करण्यासाठी उपयुक्त मित्रकीटक
मित्र कीटकांमध्ये मेक्सिकन भुंगा हा खूप महत्वपूर्ण असून गाजर गवताचा नायनाट करण्यासाठी हा उपयुक्त ठरतो. हा भुंगा मळकट पांढरा रंगाचा असून त्यावर काळसर रंगाच्या रेषा असतात.
याच्या अळ्या गाजर गवताच्या वरील भागातील पाने खातात व भुंगे कोषावस्थेत मातीत गेलेले असतात ते जमिनीतून निघून गाजर गवताच्या पानावर स्वतःची उपजीविका करतात.
विशेष म्हणजे पावसाळ्यामध्ये हे भुंगे गाजर गवत नष्ट करतात व नोव्हेंबर महिन्यामध्ये हे जमिनीत जाऊन बसतात. पुन्हा जूनमध्ये पावसाळा सुरू झाल्यानंतर जमिनीतून निघून गाजर गवताचा नायनाट करण्यास सुरुवात करतात. गाजर गवताच्या बंदोबस्तासाठी हेक्टरी 500 भुंगे सोडावेत. तसेच तरोटा ही वनस्पती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे.
ही वनस्पती सुद्धा गाजर गवताला नियंत्रित करु शकते त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात तरोटाच्या बिया गोळा कराव्यात व या बियांची एप्रिल व मे महिन्यात गाजर गवताच्या परिसरात धूळफेक करावी. या उपायाने देखील गाजर गवतावर नियंत्रण मिळवता येणे शक्य आहे.
नक्की वाचा:Management: 'सॉईल सोलरायझशन' हा पीक उत्पादन वाढीतील आहे पहिला टप्पा,वाचा डिटेल्स
Published on: 28 September 2022, 12:49 IST