वाल या भाजी पिकाची लागवड आपण खरीप हंगामामध्ये करून भरपूर नफा मिळवू शकतो. वाल या पिकाचे 'वाल' हे नाव गुजराती भाषेत जास्त प्रचलित आहे. प्राचीन काळापासून भारतात, बहुतेक ग्रामीण भागात या पिकाची लागवड केली जाते. या पिकाचे अनेक स्थानिक वाण देशभर उपलब्ध आहेत. वाल हे पीक द्विदल वर्गातील असून या पिकामुळे जमिनीतील नत्राचा साठा वाढतो. हे पीक कोरडवाहू असून कमी पाण्यावर येणारे आहे. ज्वारीच्या शेतात पिकाच्या ओळीत मिश्रपीक म्हणूनही हे पीक घेतात.'वाल' हे पीक ग्रामीण भागात शेतात, शेताच्या बांधावर किंवा परसबागेतील कुंपणावर लावलेले दिसते. वाल हे पीक शेंगवर्गीय असल्यामुळे जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी आणि पिकाची फेरपालट करण्यासाठी महत्त्वाचे पीक आहे. पूर्वी हे पीक दुर्लक्षित समजले जात होते. या पिकाच्या शेंगांची भाजी, दाण्यांची उसळ, डाळ यासाठी उपयोग होतो. प्रोटीन्सच्या भरपूर प्रमाणामुळे या पिकाची पोषकताही चांगली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस या पिकाला महत्त्व येत चालले आहे. परंतु या वेलीवर अनेक रोगांचा प्रादुर्भाव होत असतो. याविषयी आपण खबरदारी घेतली पाहिजे.
महत्त्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रण -
१) भुरी: हा बुरशीजन्य रोग असून या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास झाडाच्या खोडावर, पानांवर आणि शेंगावर पांढऱ्या रंगाचे डाग दिसतात. रोगाची लागण मोठ्या प्रमाणावर झाल्यास पाने गळून पडतात. झाडांना शेंगा धरत नाहीत.
२) रोपाची मर : हा बुरशीजन्य रोग असून बियांमार्फत या रोगाचा प्रसार होतो. बुरशीची लागण झालेली रोपे सडतात व जमिनीवर कोलमडतात.
३) पानावरील ठिपके : हा बुरशीजन्य रोग असून या रोगामुळे पानांवर ठिपके पडतात. ठिपक्यांच्या मध्यभागी राखाडी रंगाचा भाग असून ठिपक्याच्या कडा लाल रंगाच्या असतात. ठिपके हळूहळू संपूर्ण पानावर पसरतात.
४) पानावरील मोझेक : हा विषाणुजन्य रोग असून त्यामुळे पानावर पिवळसर रंगाचे ठिपके दिसतात.
रोगांवर प्रतिबंधक उपाय म्हणून बुरशीनाशकांची चार वेळ फवारणी करावी.
कीड : मावा, तुडतुडे आणि शेंगा पोखरणारी अळी
नियंत्रण : फवारणी प्रति लिटर
डायमेथोएट- १.५ मि.लि. किंवा
इमिडाक्लोप्रिड -०.५ मि.लि.
रोग : भुरी, पानावरील ठिपके.
फवारणी प्रतिलिटर विद्राव्य गंधक ३ ग्रॅम.
हेही वाचा:अश्वगंधा औषधी वनस्पती ; पांढऱ्या केसांच्या समस्यावर आहे उपयोगी
लागवडीचा हंगाम -
या पिकाची लागवड जातीनुसार खरीप हंगामामध्ये आणि रब्बी हंगामात करतात.
विविध प्रकार आणि उन्नत वाण : वालाच्या जातीचे दोन प्रकार असतात :
अ) झुडपासारख्या वाढणाऱ्या बुटक्या जाती .
आ) वेलीसारख्या वाढणाऱ्या उभट जात
यातील एक प्रकार हंगामी तर दुसरा प्रकार बारामाही आहे. हंगामी पिकामध्ये बुटक्या जातींचा समावेश होतो. या जातींना आधार देण्याची आवश्यकता नसते. बारामाही प्रकारात वेलींसारख्या वाढणाऱ्या जातींचा समावेश होतो. या जातींना आधार द्यावा लागतो. बुटक्या जातींची लागवड विदर्भात केली जाते.
काढणी आणि उत्पादन -
वालाच्या जातींच्या कालावधीनुसार वालाच्या शेंगा काढणीस तयार होतात. शेंगा पूर्ण वाढलेल्या परंतु कोवळ्या असतानाचा काढतात. शेंगांमधील दाणे निब्बर होऊ देऊ नयेत. शेंगाची तोडणी ६ ते ८ दिवसांच्या अंतराने करावी. वालाच्या बुटक्या जातीच्या शेंगांचे उत्पादन दर एकरी २ ते ३ टन मिळते. तर उंच वेलीसारख्या जातींमध्ये शेंगाचे उत्पादन दर एकरी ४ टनांपर्यंत मिळते.
वळण आणि आधार देणे -
उंच वाढणाऱ्या वेलींना आधाराची गरज असते. या पिकाला आधार दिल्यावर निश्चितच उत्पन्नात वाढ होते. त्यासाठी सीरच्या दोन्ही टोकाला ७ ते ८ फुट उंचीचे लाकडी डांब रोवून त्याला १० गेजच्या तारेने बाहेरील बाजूस ताण द्यावा. दोन्ही दांबांना १२ किंवा १४ गेजची तार ओढावी. तार जमिनीपासून ६ ते ६।। फुट उंच असावी. प्रत्येक वेलाजवळ १ फुट उंचीची काडी टिपरी रोवून तिला सुतळी बांधून सुतळीचे दुसरे टोक वर तारेला बांधावे. वेल दीड ते दोन फुट उंचीचे झाल्यावर बगलफुट काढून ते वेल सुतळीवर वरच्या दिशेने चढवावेत. वेल तारेपर्यंत जाईपर्यंत बगल फुट काढावी. पाने काढू नये. नंतर फुटवे काढणे बंद करून फुटे दोन्ही बाजूस पसरावेत. त्यानंतर प्रत्येक कांदी दीड ते दोन फुट अंतरावर कापावी म्हणजे फुलांचे घोस मोठ्या प्रमाणात लागतात. असा ताटी पद्धतीने आधार दिल्यास व दर महिन्यास वेलींची छाटणी केल्यास या पिकांपासून वर्षभर उत्पादन मिळते.
लेखक -
डॉ. डी . एस . फड
अनुवंश व रोप पैदासशास्त्र विभाग
डॉ. पं. दे. कृ. वि. अकोला.
डॉ . आर.वी. झंझाड
अनुवंश व रोप पैदासशास्त्र विभाग
डॉ. पं. दे. कृ. वि. अकोला.
असलम शेख, MSC ( Agri)
Published on: 30 June 2020, 03:49 IST