Agripedia

कपाशीवरील गुलाबी बोंड अळी अलीकडील काही काळात शेतकऱ्यासाठी कपाशीवरील एक महत्त्वाची नुकसानदायक कीड म्हणून समोर आली आहे. परंतु या किडीच्या प्रतिबंधासाठी व व्यवस्थापनासाठी खालील निर्देशित एकात्मिक व्यवस्थापन सूत्रांचा वापर केल्यास या किडीचे प्रभावी व्यवस्थापन मिळण्यास मदत होते.

Updated on 07 August, 2021 10:28 AM IST

कपाशीवरील गुलाबी बोंड अळी अलीकडील काही काळात शेतकऱ्यासाठी कपाशीवरील एक महत्त्वाची नुकसानदायक कीड म्हणून समोर आली आहे. परंतु या किडीच्या प्रतिबंधासाठी व व्यवस्थापनासाठी खालील निर्देशित एकात्मिक व्यवस्थापन सूत्रांचा वापर केल्यास या किडीचे प्रभावी व्यवस्थापन मिळण्यास मदत होते. कपाशीवरील गुलाबी बोंड अळी प्रतिबंध करण्याकरिता कोणत्याही परिस्थितीत फरदड कापूस घेणे टाळावे. म्हणजे कोणत्याही परिस्थितीत डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात मागील कपाशीचे पीक संपूर्ण कापूस वेचणी करून कपाशी मुक्त झालेले असेल याची दक्षता घ्यावी.

फरदड कपाशीला सिंचन केल्याने पाते फुले व बोंडे लागण्यात अनियमितता येऊन गुलाबी बोंड अळीला सतत खाद्य उपलब्ध होते, त्यामुळे फरदड घेणे टाळावे. गुलाबी बोंड अळीला खाद्य प्राप्त न झाल्यामुळे जीवनचक्रात बाधा निर्माण होते व पुढील हंगामात गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव कमी आढळतो. त्यामुळे कपाशीची फरदड घेणे टाळा.

पुढील हंगामात गुलाबी बोंड अळीचे प्रतिबंध करण्यासाठी कापूस संकलन केंद्र व जिनिंग फॅक्टरीमध्ये 15 ते 20 कामगंध सापळे गुलाबी बोंड अळीच्या गोळी सह Gossilure सह डिसेंबर ते जुलैपर्यंत लावल्यास गुलाबी बोंड अळीचे पतंगाचा मोठ्या प्रमाणात नायनाट करता येतो आणि पुढील हंगामात गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव कमी आढळून येतो. मागील हंगाम संपल्याबरोबर जमिनीची खोल नांगरणी करावी म्हणजे शत्रु किडीच्या पतंगाचे जमिनीतील कोश उन्हाने किंवा पक्षाचे भक्ष होऊन नष्ट होतील.

हेही वाचा : असे करा कपाशीवरील तुडतुडे या रसशोषक किडीचे नियंत्रण

कोणत्याही परिस्थितीत पूर्व मान्सून कपाशीची लागवड टाळावी व जूनचा तिसरा आठवडा ते जुलैचा पहिला आठवडा या दरम्यान कपाशी लागवड करावी म्हणजे गुलाबी बोंड अळीच्या जीवनचक्रात बाधा निर्माण करून खंड पडता येतो व बऱ्याच प्रमाणात गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव कमी करता येतोबीटी कपाशीची लागवड करताना साधारणपणे 150 ते 160 दिवसात म्हणजे लवकर किंवा मध्यम अवधीत परिपक्व होणाऱ्या वानाची व तुलनात्मक दृष्ट्या कीड रोग प्रतिकारक वाणाची निवड करावी. बीटी कपाशीची लागवड करताना नॉन बीटी कपाशीच्या बियाण्याच्या चार ओळी रेफ्युजी किंवा शरणागत पट्टा म्हणून बीटी कपाशीच्या चारही बाजूने बॉर्डरवर लावाव्यात.

आर.आय.बी.बीटी कपाशीचे बियाणे असेल तर मात्र बॉर्डर ने रेफ्युजी लावण्याची गरज नाही. कपाशीच्या सभोवती मका,चवळी,झेंडू व एरंडी या मिश्र सापळा पिकांची एक ओळ लावावी. कपाशीच्या पिकामध्ये चार ओळीनंतर मका चवळी या पिकाची एक ओळ व बांधावर एरंडी लावली म्हणजे परभक्षी व परोपजीवी कीटकाचे संवर्धनात मदत होते. 

बीटी कपाशी लागवड करण्यापूर्वी माती परीक्षण करून घ्या, आणि माती परीक्षणाच्या आधारावरच कपाशीच्या पिकात खताचे व्यवस्थापन करा विशेषता बीटी कपाशीत अतिरिक्त नत्राचा वापर टाळा. विशेषत: 60 दिवसानंतर अतिरिक्त नत्राचा वापर बीटी कपाशीत केल्यास सर्व प्रकारच्या बोंड अळ्याना ते एक प्रकारचे निमंत्रण ठरू शकते म्हणून माती परीक्षणाच्या आधारावर शिफारशीप्रमाणे संतुलित खते द्या.

हेही वाचा : असे करा कपाशीवरील दहीया रोगाचे एकात्मिक व्यवस्थापन

पहिल्या तीन महिन्यात रस शोषणाऱ्या किडीच्या व्यवस्थापनासाठी वनस्पतिजन्य कीटकनाशके जैविक कीटकनाशके सापळा पिके पिवळे चिकट सापळे इत्यादीचा सूट सुट्टीत वापर करून सुरुवातीच्या तीन महिन्यात मोनोक्रोटोफास Acephate Imidachlopride यासारख्या किटकनाशकाचा चा वापर टाळा. कारण यासारख्या कीटकनाशकाच्या अतिरेकी वापरामुळे कापसाची कायिक वाढ जास्त प्रमाणात होते. पिकाचा परिपक्वता कालावधी वाढतो व फूल लावण्यासंदर्भात कालावधी मागेपुढे होऊ शकतो, त्यामुळे गुलाबी बोंड अळीला पोषक स्थिती निर्माण होऊ शकते. रस शोषणाऱ्या किडी करता वर निर्देशित अरासायनिक घटकांबरोबर आर्थिक नुकसानीच्या पातळीच्या आधारावर रासायनिक कीटकनाशके वापरणे गरजेचे असल्यास लेबल क्‍लेम शिफारशीप्रमाणे तज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच रस शोषणाऱ्या किडीसाठी कीटकनाशके वापरावी.

कपाशीला पात्या लागण्यास सुरुवात झाल्याबरोबर सनियंत्रणाकरिता एकरी दोन ते तीन तर मोठ्या प्रमाणात गुलाबी बोंड अळीचे पतंग सापळ्यात अडकून नाश करण्याकरता एकरी 8 ते 10 कामगंध सापळे गुलाबी बोंड अळीच्या गोळी सह पिकाच्या उंचीच्या साधारणता एक ते दीड फूट उंचीवर लावावीत. या कामगंध सापळामध्ये 8 ते 10 गुलाबी बोंड अळीचे नर पतंग सतत दोन ते तीन दिवस अशी सरासरी आढळून आल्यास गुलाबी बोंड अळीने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली आहे, असा त्याचा संकेत आहे. याव्यतिरिक्त मोठ्या प्रमाणात एकरी 8 ते 10 कामगंध सापळे लावले असल्यास यात अडकलेले गुलाबी बोंड अळीचे नर पतंग पकडून नष्ट करावेत आणि त्यामुळे पुढील प्रजननास बाधा निर्माण होऊन गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते.

कपाशी पिकात न उमललेल्या गुलाबाची कळी अशा रूपात डोम कळी आढळून आल्यास अशा डोम कळ्या तोडून आतील अळीसह त्यांचा नाश करावा. फुले व बोंड धरण्याच्या अवस्थेत 5 टक्के निंबोळी अर्काची किंवा लेबल क्लेम शिफारशीप्रमाणे बाजारातील निमयुक्त कीटकनाशकाची किंवा बिव्हेरिया बॅसियाना 1.15 टक्केया किडींना रोग करणाऱ्या बुरशीजन्य कीटकनाशकाची 50 ग्राम अधिक 10 लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. ही फवारणी करताना वातावरणात 75 टक्के आद्रता असल्यास ती प्रभावी ठरते.

कपाशीला पात्या लागल्यानंतर उपलब्धतेनुसार दर 10 दिवसाच्या अंतराने Trichogramma bactri या मित्रकीटकांची अंडी 1.5 लाख अंडी प्रति हेक्टर या दराने म्हणजे 20000 अंड्याचे एक ट्रायको कार्ड असे एकूण तीन ट्रायको कार्ड प्रती एकर या प्रमाणात सात ते आठ वेळा कपाशीच्या शेतात लावावे. यासाठी गरजेनुसार तज्ञांचा सल्ला घ्यावा. या ट्रायको कार्ड वापरल्यामुळे गुलाबी बोंड अळीचे अंडी अवस्थेत व्यवस्थापन करता येते.

गुलाबी बोंड आळी करता सर्वेक्षण आर्थिक नुकसानीची पातळी:

 कपाशीच्या शेतात पात्या फुले अवस्थेत किमान दर आठवड्याने शेतांचे प्रतिनिधित्व करतील अशी 20 झाडे निवडून त्यावरील एकूण प्रादुर्भावग्रस्त फुले पात्या बोंडे मोजून 5 ते 10 टक्के प्रादुर्भावाचे प्रमाण वाढल्यास तसेच बोंड अवस्थेत 20 हिरवी बोंडे तोडून त्यात 5 ते 10 टक्के बोंडे किंवा 20 पैकी दोन बोंडात गुलाबी बोंड आळी आढळून आल्यास आर्थिक नुकसानीची संकेत पातळी समजून रासायनिक कीटकनाशकाचा वापर लेबल क्‍लेम शिफारशीप्रमाणे तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करावा.

गुलाबी बोंड अळीचे आर्थिक नुकसानीची पातळी लक्षात घेऊन गुलाबी बोंड अळीकरिता क्लोरोपायरीफॉस 20% प्रवाही 25 मिली किंवा Thiodocarb 75 टक्के डब्ल्यू पी 20 ग्रॅम अधिक दहा लिटर पाणी या प्रमाणात घेऊन कोणत्याही एका कीटकनाशकाची फवारणी करावी. फवारणी करताना लेबल क्लेम शिफारशीची शहनिशा करून लेबल क्‍लेम शिफारशीप्रमाणे करावा तसेच पायरेथ्राईड वर्गातील कीटकनाशकाची फवारणी कपाशीचे पीक 70 ते 75 दिवसाचे झाल्यानंतर एक किंवा दोन वेळेसच करावी. रसायने फवारताना अनेक रसायनाचे एकत्र मिश्रण, करणे टाळावे तसेच सुरक्षा किटचा वापर करावा. रसायने वापरण्यापूर्वी आवश्यकतेनुसार प्रत्यक्ष तज्ञांचा सल्ला घेऊन लेबल क्‍लेम शिफारशीप्रमाणे वापरावी व प्रमाण पाळावे तसेच अनेक रसायनाचे एकत्र मिश्रण करून फवारणी टाळावी.

लेखक-

राजेश डवरे कीटक शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र करडा वाशिम.

प्रतिनिधि गोपाल उगले

English Summary: Some important tips for prevention and management of pink bond larvae on cotton
Published on: 07 August 2021, 10:24 IST