सर्वसाधारणपणे पिकास कर्ब, हायड्रोजन, प्रमाणवायु, नत्र, स्फुरद व पालाश या मुख्य अन्नद्रव्यांची, कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक या दुय्यम अन्नद्रव्यांची तर लोह, मंगल, जस्त, तांबे, बोरॉन मॉलिन्डेनम या सुक्ष्म अन्नद्रव्यांची आवश्यकता असते. यापैकी नत्र, स्फुरद, गंधक, लोह व जस्त या सारख्या अन्नद्रव्यांची कमतरता आढळून आलेली आहे.
खतांचा असमतोल वापर यापुढे याचपध्दतीने होत राहिला तर भविष्यात जमिनीचे आरोग्य बिघडणे आणि सुपिकता कमी होवून पिकांची उत्पादकता घटण्याबरोबरच निकृष्ट दर्जाची जमीन पुढील पिढीस हस्तांतरीत करण्याची नामुष्की आपणावर येण्याचा मोठा धोका आहे.
यासाठी शेतकऱ्यांनी स्वतःच्या जमिनीचे माती परिक्षण करुन घेणे आणि त्याच्या तपासणी अहवालानुसार येणाऱ्या शिफारशी प्रमाणे खतांचा वापर करणे व जमिनीचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. त्यामुळे पीक उत्पादनांत वाढ होऊन खताच्या वापरावर होणारा अवाजवी खर्च कमी होणार आहे.
मातीचा नमुना घेताना घ्यावयाची काळजी
१) मातीचा नमुना घेण्यासाठी वापरात येणारी अवजारे उदा. फावडे, कुदळ, घमेले, खुरपी इत्यादी स्वच्छ असावीत.
२) मातीचा नमुना पिके काढल्यानंतर परंतू नांगरणी पुर्वी घ्यावा. शक्यतो रब्बी पिकाच्या काढणीनंतर किंवा उन्हाळयात घेतल्यास पृथ : करण करुन परिक्षण अहवाला पेरणीपर्यंत उपलब्ध होतो.
३) उभ्या पिकांखालील मातीचा नमुना घ्यावयाचा असेल तर दोन ओळीमधील मातीचा नमुना घ्यावा. परंतु पिकास रसायनिक खत दिले असल्यास तीन महिन्याच्या आंत संबंधित जमिनीतून माती नमुना घेवू नये.
४) निरनिराळ्या जमिनीतील नमुना गोळा करताना वेगवेगळ्या मातीचे नमुने एकत्र मिसळू नयेत.
५) माती नमुना गोळा करताना किंवा प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविताना रासायनिक खतांच्या रिकाम्या पिशव्यांचा वापर करु नये.
६) शेतामधील खते साठविण्याची जागा, कचरा टाकण्याची जागा, जनावरे बसण्याची जागा, झाडाखालील जागा, विहिरीजवळ, पाण्याचे पाट व शेताचे बांध इत्यादी जागामधून किंवा जवळून मातीचे नमुने घेऊ नये.
शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ; आता खतांचे भाव गगनाला भिडले
मातीचा नमुना घेण्याची पध्दत
मातीचा नमुना हा त्या शेतातील प्रातिनिधीक स्वरूपाचा असणे आवश्यक आहे. एक हेक्टर क्षेत्रातील १५ सेंमी खोलीपर्यंतच्या मातीचे वजन अंदाजे २२,४०,००० किलो ग्रॅम असते. यातून काढावा लागणारा ५०० ग्रॅम मातीचा नमुना प्रतीनिधीक होण्यासाठी किती काळजीपूर्वक घ्यावा लागेल याची कल्पना येते. कारण यामधून केवळ काही ग्रॅम माती तपासणीसाठी वापरली जाते व तिच्या तपासणीच्या निष्कर्षावर आधारित खताच्या शिफारशी केल्या जातात. म्हणून मातीचा नमुना काळजीपुक काढावा.
मातीचा नमुना काढण्यासाठी शेतात गेल्यानंतर प्रथम शेतीची पाहणी करावी व जमिनीच्या प्रकारानुसार वनस्पती/पिकांचा रंग, वाढ भिन्न भिन्न असते, तसेच जमिनीच्या पृष्ठभागवरचा रंग देखील वेगवेगळा असतो. उतारवरील जमीन भुरकट रंगाची असते, सखल भागातील काळी असते म्हणूनच उतार रंग, पोत, खोली, व्यवस्थापन व पीक पध्दतीनुसार विभागणी करावी आणि प्रत्येक विभागातून स्वतंत्र्यरित्या वेगळा प्रातिनिधीक नमुना घ्यावा.
१) एक सारख्या जमिनीतून नमुना घेताना काडी कचरा, गवत, पिकांची धसकटे व मुळे काढून टाका.
२) जिथे पिकाची ओळीत पेरणी केली असेल अशा ठिकाणी दोन ओळीमधून नमुना घ्या.
३) नुकतेच खते टाकलेल्या जमिनी खोलगट भाग, पाणथळ जागा झाडाखालील जमीन, बांधजवळील जागा, शेणखताच्या ढिगाऱ्या जवळील जागा, शेतातील बांधकामा जवळील परिसर कंपोस्ट खताच्या जवळपासची जागा अशा ठिकाणातून मातीचा नमुना घेवू नका.
४) सपाट पृष्ठभाग असलेल्या जमिनीवर इंग्रजी V अक्षराप्रमाणे १५ ते २० सॅमीचा खड्डा घेऊन आतील माती बाहेर काढून टाका. खड्डयाच्या सर्व बाजुची २ सेमी जाडीची माती खुरप्याच्या सहाय्याने वरपासून ते खालपर्यंत खरडून हातावर काढा आणि प्लॅस्टीकच्या बादलीत टाका. अशारितीने एका प्रभागातन १० नमुने घेऊन त्याच बादलीत टाका.
५) सर्व माती एका स्वच्छ प्लॅस्टीकच्या कागदावर टाका, चांगली मिसळा, ओली असल्यास सावलीत वाळवा नंतर हया ढिगाचे चार समान भाग करा. समोरासमोरील दोन भाग काढून टाका. उरलेले दोन भाग एकत्र मिसळा व पुन्हा चार भाग करा. ही प्रक्रिया एक किलो ग्रॅम माती शिल्लक राही पर्यंत करा. समोरासमोरील २ व ४ भाग काढून २ टाका नंतर १ व ३ भग एकत्र मिसळा.
६) उरलेली अंदाजे एक किलो माती स्वच्छ पिशवीत भरा. पिशवीत माहिती पत्रक टाका व एक लेबल पिशवीला बांधा.
७) शक्य तितक्या लवकर नमुने प्रयोगशाळेत पाठवा सर्वसाधारणपणे नमुना काढणे व प्रयागशाळेत पाठविणे हयात दोन आठवडयापेक्षा अधिक काळ नसावा. अन्याथा माती पृथ : करण बदलण्याची शक्यता आहे.
८) फळबागेसाठी मातीचा नमुना वेगवेगळया थरामधून घ्यावा उदा. खड्डा खोदून पहिल्या एक फुटातील ३० सेमी पर्यंत, मुरुम नसल्यास ३० ते ६० सेमी थरातील दुसरा थर व खोल जमिनीत ६० ते ९ ० सेमी पर्यंत खोलीतील तिसऱ्या थरातील मातीचे नमुने स्वतंत्र घ्यावे व प्रयोग शाळेत पाठवावे.
९) जमीन क्षारयुक्त व क्षारयुक्त चोपण असल्यास पृष्ठभागवरील दोन सेमी मधील क्षार बाजूला करून नंतरच नमुना घ्यावा.
१०) सुक्ष्म अन्नद्रव्ये तपासणी करावयाची असल्यास लाकडी खुंटी अथवा लाकडी औंजाराने मातीचा नमुना घ्यावा कोणत्याही परिस्थितीत लोखंडी अथवा अन्य धातुंची अवजारे अथवा उपकरणे, माती नमुना घेण्यासाठी वापरु नका. नमुना स्वच्छ पिशवीत भरुन सुक्ष्म अन्नद्रव्यांसाठी माती नमुना घेताना जास्तीत जास्त काळजी घेण गरजेचे आहे. पिशवीवर सुक्ष्मअन्नद्रव्ये तपासणीसाठी नमुना अशी नोंद करावी.
Jackfruit : फणस प्रक्रिया आणि आरोग्यदायी फायदे
मातीचे नमुना कोठे व कसा पाठवावा
मातीचे नमुना घेतल्यानंतर खालील माहिती लिहून ती मातीचा नमुना असलेल्या पिशवीत टाकावी. मातीचा नमुना लवकरात लवकर जवळच्या शासकीय कृषी महाविद्यालये अथवा प्रमुख, मृदविज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्या माती परिक्षण प्रयोगशाळेत सशुल्क तपासण्यात येतील.
१ . शेतकऱ्याचे पूर्ण नाव
२. पुर्ण पत्ता
३ . गट नंबर/सर्व्हे नं.
४. बागायत / कोरडवाहु
५. ओलीताचे साधन
६. जमिनीचा निचरा
७. जमिनीचा प्रकार
८. जमिनीचा उतार
९. जमिनीची खोली
१०. नमुना घेतल्याची तारीख
११. मागील हंगामात घेतलेले पीक व त्याचे उत्पादन, वापरलेली खते व त्यांचे प्रमाण
१२. पुढील हंगामात घ्यावयाची पिके , त्यांची जात व अपेक्षित उत्पादन.
लेखक :
डॉ. अनिल दुरगुडे
मृदशास्त्रज्ञ, मृदविज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभाग,
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी.
मो.नं. ९४२०००७७३१
Published on: 20 April 2022, 12:46 IST