जमिनीची सुपीकता व उत्पादकता जोपासण्यासाठी फक्त सेंद्रिय खते वापरणे हा एकमेव उपाय नाही. तसेच रासायनिक खताचा त्याग करून आणि सेंद्रिय खते वापरून अशी सेंद्रिय शेती फायदेशीर होणार नाही. त्याचप्रमाणे दोन्ही खते अन्नद्रव्याच्या प्रमाणत दिली तरी अन्नद्रव्याची उपलब्धता आणि उत्पादन परिणामकारकता सारखी नसते. याविषयी माहिती या लेखात वाचावयास मिळणार आहे.
हल्ली सेंद्रिय शेती व रासायनिक शेती याविषयी बरेच वाद-विवाद होत आहेत. जमिनीची सुपिकता व उत्पादकता जोपासण्यासाठी फक्त सेंद्रिय खते वापरणे हा एकमेव उपाय नाही. हल्ली शेतकरी सेंद्रिय शेतीचा पुरस्कार करू लागला आहे. सेंद्रिय शेती म्हणजे फक्त सेंद्रिय पदार्थांचा वापर. रासायनिक खताचा त्याग करून आणि सेंद्रिय खते वापरून अशी सेंद्रिय शेती फायदेशीर होणार नाही.
रासायनिक खते जेव्हापासून शेतीस वापरण्यास सुरुवात झाली तेव्हा पिक परिस्थिती पाहून शेतकर्यांची मानसिकता रासायनिक खते वापरल्यास इतर खते वापरावयाची गरज नाही अशी होत गेली. अमर्याद पाणी व केवळ रासायनिक खताच्या वापरामुळे शेतजमीन कडक व कसहीन झाली त्यामुळे जमिनीतील उपयुक्त जिवाणूंची संख्या कमी-कमी होत गेली. पाण्याच्या अति वापरामुळे मुळाभोवती वाढणार्या उपयुक्त जिवाणूंची संख्या कमी-कमी होत गेली त्याबरोबरच पिकाचे पोषण घटत गेले. जमिनीतील रोगकारक सूक्ष्म जिवाणूंनी पिकावर प्रभाव दाखवण्यास सुरुवात केली. आधी एक-दोन पोते रासायनिक खते टाकली, की पीक जोमदार दिसायचे पण नंतर 2 ते 4 त्यानंतर 4 ते 8 पोते देवून सुद्धा अपेक्षित उत्पादनात वाढ झाली नाही असे दिसून आले.
हेही वाचा : योग्य विक्री व्यवस्थापनामुळे सीमाताई जाधव ठरल्या विविध पुरस्कारांचे मानकरी
निसर्गाचा लहरीपणा, रोग व किडीची समस्या, महागडी संकरित बियाणे, रासायनिक खते व किडनाशके, शेत मालास मिळणारा बाजारभाव व वाढलेला उत्पादन खर्च या सर्व समस्यांनी शेती उद्योग समस्याग्रस्त झाला आहे. यावर उपाय करण्यासाठी शेतकरी बांधवांनी उपलब्ध माहिती व तंत्रज्ञान यांचे आधारे नियोजनबद्ध शेती करावी. शेतीवर होणारा प्रचंड खर्च कसा कमी करता येईल याचा आराखडा करून अंमलबजावणी करावी. पीक उत्पादन वाढीसाठी सिंचनाचा वापर, संकरित वाणाची लागवड, रासायनिक खते व किडनाशकाचा वापर इ. गोष्टीमुळे शेतीचे उत्पादन वाढले. परंतु गेल्या दशकापासून उत्पादन घटत चालले आहे. कारण पाण्याचा अमर्याद वापर, सेंद्रिय खताचा होत चाललेला तुटवडा त्यामुळे जमिनीचे गुणधर्म बिघडून जमिनीची सुपिकता कमी कमी होत आहे.
वनस्पतीच्या वाढीसाठी पिक पोषक द्रव्याचा पुरवठा जमिनीद्वारे होतो. या पुरवठ्याचे प्रमाण अनेक बाबींवर अवलंबून असते. पिकाच्या गरजेप्रमाणे पाहिजे त्या प्रमाणात पाहिजे त्यावेळी आणि पिकास शोषता येईल अशा अवस्थेत पिक पोषक द्रव्यांचा पुरवठा करण्याच्या जमिनीच्या क्षमतेस जमिनीची सुपिकता असे म्हणतात.
जमिनीची सुपिकता व पिक उत्पादन :-
पिकाचे उत्पादन हे जमिनीच्या सुपिकतेवर अवलंबून असते व जमिनीची सुपिकता जमिनीच्या भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्मावर अवलंबून असते. पिक पोषक द्रव्याच्या पुरवठ्याबरोबर जमिनीच्या गुणधर्माची जोपासना करणेही महत्त्वाचे आहे. यासाठी सेंद्रिय खते जास्त परिणामकारक ठरतात. जमिनीची सुपिकता व पिक उत्पादन वाढवण्यासाठी खतांचा वापर करणे आवश्यक असते. परंतु हल्ली खत कोणत्या प्रकारची वापरावीत यात मत भिन्नता आहे. एक गट सेंद्रिय खते वापरण्याचा आग्रह धरतो तर दुसरा रासायनिक खतांचा तिसरा गट दोन्हीही प्रकारचे खत वापर करण्यावर भर देणारा आहे. वनस्पतीला खते सेंद्रिय स्वरूपात दिली किंवा निरेद्रिय स्वरूपात वनस्पती मात्र त्यातील अन्नद्रव्ये निरेद्रिय स्वरूपातच शोषतात ही वस्तुस्थिती लक्षात घेतली पाहिजे. त्यामुळे पिक पोषकद्रव्य रासायनिक खतातून उपलब्ध झाले किंवा सेंद्रिय पदार्थांतून या बाबीचा भेदभाव वनस्पती करीत नाहीत.
पिकास अन्नद्रव्याचा पुरवठा :-
पिकास अन्नद्रव्याचा पुरवठा व जमिनीची सुपिकता अबाधित राखण्यासाठी सेंद्रिय खतासोबत गरजेप्रमाणे संतुलित प्रमाणात रासायनिक खताचा वापर एकात्मिक पद्धतीने करावा. कोणत्याही खताचा असंतुलित वापर पिकास व जमिनीच्या आरोग्यास हानिकारक ठरतो ही बाब समजून घेतली पाहिजे.
पिकाच्या संकरित वाणाची भूक :-
पिकाच्या संकरित वाणाची भूक भागवण्यासाठी प्रचंड प्रमाणात फक्त सेंद्रिय खते वापरणे व्यावहारिकदृष्ट्या शक्य होणार नाही कारण याबाबीस अनेक मर्यादा येतात. उदा. सेंद्रिय पदार्थाची असलेली उपलब्धता, तयार होण्यासाठी लागणारा वेळ, त्यात असलेले अन्नद्रव्याचे प्रमाण, वाहतुकीचा खर्च या सर्व बाबीचा विचार केल्यास फक्त सेंद्रिय खते वापरून उत्पादनाचे लक्ष गाठणे शक्य होईल का? उदा. एक किलो नत्रासाठी 2.17 किलो युरिया हे रासायनिक खत द्यावे लागते, तेवढेच एक किलो नत्र शेणखतातून देण्यासाठी 200 किलो शेणखत द्यावे लागेल (शेणखतात नत्राचे प्रमाण 0.5 टक्के असते.)
पिकास सेंद्रिय व रासायनिक खताचा वापर :-
पिकास सेंद्रिय व रासायनिक खताचा वापर सारख्या प्रमाणात केल्यास पिकाच्या वाढीवर व उत्पादनावर होणारा त्याचा परिणाम सारखाच आढळून येत नाही. दोन्हीही खते अन्नद्रव्याच्या प्रमाणानुसार दिली तरी अन्नद्रव्याची उपलब्धता आणि उत्पादन परिणामकारकता सारखी नसते. केवळ रासायनिक खत वापरल्यामुळे जमिनीचे गुणधर्म, सुपिकता आणि उत्पादकता याविषयी काही अडचणी निर्माण झाल्या आहेत. तसेच केवळ सेंद्रिय खत वापरल्यामुळे अशाच प्रकारच्या अडचणी निर्माण होणार नाहीत असे ठामपणे सांगता येणार नाही.
तर या खताचे विघटन करण्यासाठी लागणार्या सूक्ष्म जैवघटकांना जमिनीतील अन्नद्रव्ये काही प्रमाणात स्वत:च्या वाढीसाठी लागतील. सेंद्रिय घटकातील अन्नद्रव्याचे विघटन होण्यास वेळ लागतो. त्यामुळे सुरुवातीच्या काळात पिकास अन्नद्रव्याची कमतरता जानवू शकते व त्याचा उत्पादनावर परिणाम होईल.सेंद्रिय शेतीत रासायनिक खतांचा उपयोग करू नये हे सांगणे उचित ठरणार नाही. कारण पिकाची अन्नद्रव्याची गरज आणि जमिनीतून होणारा अन्नद्रव्यांचा पुरवठा यात तफावत असल्यास ही तफावत त्वरित भरून काढण्यासाठी रासायनिक खताचा वापर करणे गरेजेचे आहे.
उच्च उत्पादनाचे लक्ष गाठण्यासाठी पिकाची अन्नद्रव्याची गरज :-
अन्नद्रव्याची गरज भागविण्यासाठी सेंद्रिय खताबरोबर रासायनिक खताचा वापर एकात्मिक पद्धतीने करणे गरजेचे आहे. त्यामुळे जमिनीची सुपिकता सुधारण्यास व उत्पादनातील सातत्या टिकवण्यास मदत होईल. म्हणून केवळ सेंद्रिय खतेच वापरा अथवा केवळ रासायनिक खतेच वापरा असा अट्टाहास न धरता दोन्हीही प्रकारच्या खताचा एकात्मिक पद्धतीने वापर करावा. सेंद्रिय खताच्या वापरामुळे रासायनिक खताचा वापर परिणामकारक ठरतो. त्यामुळे जमिनीची सुपिकता आणि उत्पादनक्षमता चिरंतर टिकवून ठेवण्यास मदत होते.
जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे व ह्यूमसचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी व त्यांची वाढ करण्यासाठी सेंद्रिय पदार्थांचा वापर फार महत्त्वाचा आहे. सेंद्रिय खताच्या वापरामुळे जमिनीचे भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म सुधारण्यासाठी उपयोग होतो. जमिनीतील अन्नद्रव्याचे प्रमाण व उपलब्धता वाढते. रासायनिक खतातील अन्नद्रव्याची उपलब्धता वाढविण्यासाठी सेंद्रिय खताचा उपयोग होतो. जमिनीतील जिवाणूंची संख्या व क्रियाशीलता सेंद्रिय खतामुळे वाढते. सेंद्रिय खताद्वारे सर्व प्रकारची आवश्यक अन्नद्रव्य पिकास पुरविली जातात. हा पुरवठा कमी प्रमाणात व हळूवार होतो. परंतु दीर्घकाळ राहतो म्हणून पिकाची अन्नद्रव्याची गरज भागविण्यासाठी रासायनिक खते आणि जमिनीचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी सेंद्रिय खते महत्त्वाची ठरतात.जमिनीतून पिकांनी केलेले निरेंद्रिय स्वरूपातील अन्नद्रव्याचे शोषण पिके सेंद्रिय स्वरूपात साठवून ठेवतात म्हणून पिकाचे अवशेष उदा. पालापाचोळा, उसाची पाचट इत्यादीचा पुनश्च वापर केल्यास जमिनीच्या पोषणद्रव्यात वाढ होते.
सेंद्रिय पदार्थांचे विघटन :-
जमिनीतील टाकलेल्या सेंद्रिय पदार्थांचे विघटन होणे गरजेचे असते. कारण त्यांच्यामध्ये कर्बाचे प्रमाण भरपूर असून त्यातील अन्नद्रव्ये सेंद्रिय घटकाशी संयुग स्वरूपात असतात. अशा सेंद्रिय स्वरूपातील अन्नद्रव्यांचे रूपांतर पिकांना शोषता येईल अशा निरेंद्रिय घटकामध्ये जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या सेंद्रिय स्वरूपातील अन्नद्रव्याचा उपयोग पिकासाठी होत नाही. ही क्रिया जमिनीमध्ये विविध जिवाणूकडून होत असते त्यासाठी जमिनीत योग्य प्रमाणात ओलावा, तापमान व हवा असणे आवश्यक असते. ही विघटनाची क्रिया जमिनीत फार मंद गतीने चालू असते म्हणून सेंद्रिय पदार्थ प्रत्यक्षपणे शेतात न टाकता त्याचे कंपोस्ट खत तयार करून ती वापरावी.
एकात्मिक सेंद्रिय-रासायनिक शेती :-
-
- जमिनीत दरवर्षी 25 ते 30 बैलगाड्या प्रति हेक्टर शेणखत मिसळणे.
-
- जमिनीतील अन्नद्रव्याचे संतुलन ठेवण्यासाठी माती परिक्षणानुसार रासायनिक खताचा वापर करावा.
-
- जमिनीचे भौतिक गुणधर्म सुधारण्यासाठी हिरवळीच्या पिकाचा उपयोग करावा.
-
- गांडूळखत, जोरखत, भरखत यांचा वापर करावा.
-
- नत्र व अविद्राव्य स्वरूपातील अन्नद्रव्य उपलब्ध करून देण्यासाठी जैविक खताचा वापर करावा.
-
- आच्छादनाचा वापर करून जमिनीतील ओलावा व तणाचे नियंत्रण करावे.
-
- एकात्मिक पद्धतीने किड व रोगाचे नियंत्रण करावे.
जमिनीतील तणे, काडीकचरा, पिकाचे अवशेष कुजवणे, उपयुक्त जिवाणूंचा वापर करणे, गांडूळखताचा वापर इत्यादी जैविक घटकांद्वारे जमीन जिवंत ठेवावी. शेतातील जिवाणूचे संवर्धन तुम्ही करा तुमच्या शेतीचे व पिकाचे संवर्धन जिवाणू करतील. पिकाच्या अन्नद्रव्याची अर्धी गरज सेंद्रिय खतातून व त्यासोबत जैविक खते वापरून अपेक्षित उत्पादन पातळी गाठता येते. तसेच पर्यावरणाचे संतुलन राहते व जमिनीची उत्पादनक्षम दीर्घकाळ टिकते. वरील प्रमाणे सर्व बाबीचा अवलंब केल्यास एकात्मिक सेंद्रिय-रासायनिक शेतीची संकल्पना साध्य होईल.
लेखक :-
प्रा. सावन गो. राठी
सहायक प्राध्यापक (मृदा व कृषि रसायन शास्त्र विभाग)
श्री. संत शंकर महाराज कृषि महाविद्यालय, पिंपळखुटा, ता. धामणगाव रेल्वे, जि. अमरावती
इ.मेल. :- sawanrathi499@gmail.com
Published on: 22 March 2021, 07:29 IST