उस पीक वाढीच्या अवस्थेत असताना कांडी कूज, पोक्का बोईंग तसेच पानावरील तपकीरी ठिपके, तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव दिसतो आहे. रोगांची लक्षणे तपासून उपाययोजना कराव्यात. सध्या आडसाळी ऊस लागवडीचा हंगाम सुरू आहे, तसेच पूर्वहंगामी सुरू आणि खोडवा पीक जोमदार वाढीच्या अवस्थेमध्ये आहे. कमी जास्त प्रमाणात पडणारा पाऊस आणि आर्द्रता यामुळे काही भागात रोगांचा प्रादुर्भाव दिसतो आहे. या रोगांची लक्षणे ओळखून उपाययोजना कराव्यात.
पोक्का बोईंग रोग
बुरशीजन्य पोक्का बोईंग रोग प्यूजॉरियाम मोनोलीफॉरमी या बुरशीमुळे होतो. मुख्यत हा रोग वायुजन्य मार्गाने संक्रमित होतो त्याचबरोबर दुय्यम संसर्ग ऊसाचे कांडे, सिंचनाचे पाणी, तुरळक पाऊस आणि माती याद्वारे होतो. यजमान पिकांमध्ये केळी, मका, कापूस, आंबा, ऊस आणि इतर महत्वाची पीकांवरती या बुरशीचा वावर दिसतो. रोगजनक कोणत्याही जखमाद्वारे यजमान उतीमध्ये प्रवेश करते.
रोगाची लक्षणे-
-
ऊसाची लागवड जर का मार्च-एप्रिल महिन्यात केली तर या रोगाची लक्षणे आढळू शकतात.
-
सुरूवातीस बुरशीची लागण शेंड्यातून येणाऱ्या तिसऱ्या वा चौथ्या कोवळ्या पानावर दिसून येते. पानांच्या नियमित आकारामध्ये बदल होताना दिसतो.
-
पानाच्या खालच्या भागात सुरूवातीस फिक्कट हिरवट, पिवळसर, पांढरट पट्टे अथवा ठिपके दिसतात अशा पानांचा आकार बदलतो, लांबी कमी होते. खोडाकडील भाग अरुंद होऊन पाने एकमेकांत गुंफली जातात किंवा वेणीसारखी गुंडाळली जातात.
-
प्रादुर्भावग्रस्त जुन्या पानावर पिवळसर पट्ट्याच्या जागेवर वर्तुळाकार, लांब अरुंद वेगवेगळ्या आकारांचे लालसर ते तपकिरी ठिपके अथवा रेषा दिसतात. रोगाची तीव्रता वाढल्यास शेंडे कूज व काडी कापाची लक्षणे दिसतात.
रोगाचे नियंत्रण-
-
रोगग्रस्थ दिसलेले रोप पहिल्यांदा रानातून उपटून जाळून किंवा पुरून टाकले पाहिजे.
-
बेणे प्रक्रियेसाठी ट्रायकोडर्मा ५ ग्राम प्रती लिटरच्या हिशोबाने एक ताससाठी बेण तयार द्रावणात बुडवून ठेवावे व त्यानंतर लागण करावी.
-
कॉपर ऑक्सी क्लोराइड २ ग्राम प्रती लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
-
क्सापोनाजोल (कंटॉप) २५० मिली १५० लीटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करून घ्यावी.
दोन-तीन फवारण्या १५ दिवसाच्या फरकाने घ्याव्यात.
बोरॉन आणि कॅल्शियम नायट्रेड हे दोनी एकत्र ड्रीप द्वारे द्यावे, १ किलोग्रॅम बोरॉन आणि ५ किलो कॅल्शियम नायट्रेड असे सलग १० दिवसातून २ वेळा तरी सोडावे.
तांबेरा
बुरशी - पक्सीनियाा मेलॅनाँसेफाला
काय असतात तांबेरा रोगाचे लक्षण
-
उसाच्या पानावर तांबेरा हा रोग पुनक्सिनिया मिल्यानोसेफिला व पुक्सिनिया कुहिनीय या दोन बुरशींमुळे होतो. ही बुरशी फक्त ऊस पिकावर उपजीविका करते.
-
आधी बुरशीचा प्रादुर्भाव पानांच्या दोन्ही बाजूस होऊन पानावर लहान, लांबट आकारांचे पिवळे ठिपके दिसतात.
-
कालांतराने ठिपके लालसर तपकिरी होतात. ठिपक्यांचा भोवती फिकट पिवळसर हिरवी कडा तयार होते.
-
पानांच्या खालच्या बाजूस ठिपक्यांच्या जागेवर उंचवटे तयार होतात. असे ठिपके फुटून नारंगी किंवा तांबूस तपकिरी रंगाचे बिजाणू बाहेर पडतात. हवेद्वारे हे बिजाणू विखुरले जाऊन रोगाचा मोठ्या प्रमाणात दुय्यम प्रसार होतो.
-
रोगग्रस्त ठिपक्यांतील पेशी मरुन पाने करपतात. प्रकाश संश्लेषण क्रियेत येऊन उत्पादन घटते. साखर निर्मितीवर सुद्धा परिणाम होतो.
रोग वाढीस अनुकूल बाबी
-
सकाळचे धुके, दव व थंड वातावरण.
-
बळी पडणाऱ्या जातींची मोठ्या प्रमाणात लागवड
-
नत्र खतांचा आडसाली उसाच्या जोमदार वाढीच्या अवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात वापरणे.
व्यवस्थापन
-
ऊस पिकाचे सर्वक्षण करुन, रोगांची लक्षणे, तीव्रता व पिकाची अवस्था पाहून उपाययोजना कराव्यात.
-
प्रतिबंधक शिफारशीत बुरशीनाशकाची फवारणी करावी.
-
निरोगी बेणे मळ्यातील रोगमुक्त बेणे लागवडीसाठी वापरावे.
-
रोगप्रतिकारक्षम जातीची (को ८६०३२) लागवड करावी.
-
लागवडीसाठी रुंद सरी किंवा पट्टा पद्धतीचा अवलंब केल्यास उसामध्ये सूर्य प्रकाश व हवेचे प्रमाण वाढून रोगांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते.
- नत्राची मात्रा शिफारशीनुसार द्यावी. जास्त वापर झाल्यास रोगांचा प्रादुर्भाव वाढतो.
नियंत्रण
-
जास्त प्रादुर्भाव दिसून आल्यानंतर(फवारणी प्रति लिटर पाणी)
-
मॅन्कोझेब ३ ग्रॅम अथवा टेब्युकोनॅझोल १ मि.ली.
-
गरजेनुसार १० ते १५ दिवसांच्या अंतराने स्टिकरचा वापर करुन २-३ वेळा फवारणी करावी.
लाल कूज
बुरशी - कोलेटोट्रोकम फलकॅटम
लक्षणे -
पानांच्या मध्य शिरेवर गर्द लाल रंगाचे ठिपके दिसतात. कालांतराने हे ठिपके वाढत जाऊन रक्तासारखे लाल होतात. पानाच्या कडा गडद होऊन मधला भाग वळतो. पान ठिपक्याजवळ चिरते.
शेंड्याकडील तिसऱ्या व चवथ्या पानावर प्रादुर्भाव होतो. नंतर पूर्ण शेंडा वाळून मोडून पडतो.
उपाय
रोगाचे प्रमाण कमी असताना असल्यास रोगग्रस्त ऊस उपटन टाकावा.
कॉपर ऑक्सिक्लोराईड ५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून ओलावा असताना रोगग्रस्त भागामध्ये आळवणी करावी.
पानावरील तपकीरी ठिपके
बुरशी - सरक्रोस्पो लॉन्जिपस
लक्षणे
लहान उसापेक्षा ७ ते ८ महिने वयाच्या उसामध्ये जास्त प्रादुर्भाव दिसतो.
पानाच्या वरील बाजूस तपकीरी पिंगट ठिपके दिसतात. जुन्या पानांचा दोन्ही बाजूवर अंडाकृती, लालसर ते तपकीरी पिंगट ठिपके दिसतात. ठिपक्याभोवती पिवळसर वलय दिसते. प्रादुर्भाव वाढल्यास पानांवरील ठिपके एकमेकांत मिसळून मोठे होतात.
ठिपक्यामधील पेशी मरतात, प्रकाशसंश्लेषण क्रिया खंडी होते. प्रकाशसंश्लेषण क्रिया मंदावल्यामुळे कांड्याची लांबी जाडी कमी होते.
फवारणी
प्रति लिटर पाणी
कार्बेन्डाझिम १ ग्रॅम किंवा
प्रोपिकोनॅझॉल १ मिली किंवा
मँकोझेब १ ग्रॅम
Published on: 07 August 2021, 04:52 IST