बरेच शेतकरी भाजीपाला लागवड मोठ्या प्रमाणात करतात. भाजीपाला पिकांची वैशिष्ट्य म्हणजे कमी वेळेत शेतकऱ्यांना चांगला नफा देण्याची क्षमता या पिकांमध्ये असते.आता भाजीपाला पिकांमध्ये वेलवर्गीय पिके,काही फळभाज्या असतात तर काही शेंगवर्गीय भाजीपाला असतो. जर प्रामुख्याने आपण शेंगवर्गीय भाजीपाल्याचा विचार केला तर शेंगवर्गीय भाजीपाल्याला बाजारपेठेत चांगली मागणी असल्यामुळे उत्तम दर तर मिळतोच परंतु त्यासोबतच कमी वेळेत चांगला पैसा हातात येतो. त्यामुळे या लेखात आपण काही शेंगवर्गीय भाजीपाल्याची थोडक्यात माहिती घेऊ.
कमी वेळ चांगला नफा देणारे शेंगवर्गीय भाजीपाला
1- श्रावण घेवडा- आपण श्रावण घेवड्याच्या लागवडीसाठी लागणाऱ्या जमिनीचा विचार केला तर हलकी ते मध्यम पोयट्याची जमीन यासाठी उत्तम ठरते.पूर्व मशागत चांगल्या पद्धतीने करून प्रति हेक्टरी 25 टन शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीमध्ये चांगले मिसळून घ्यावे.
उन्हाळी लागवड करायची असेल तर 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी पर्यंत करावी. लागवडीपासून अर्का कोमल सारख्या जातीच्या श्रावण घेवड्याची तोडणी 45 दिवसांपासून सुरू होते. काढणी करताना कोवळ्या शेंगाची काढणी करावी.
2- वाल- वाल लागवड करायची असेल तर हलकी ते भारी व पाण्याचा उत्तम निचरा होईल अशी जमिनीची निवड करावी. उन्हाळी लागवड करायची असेल तर जानेवारी फेब्रुवारीमध्ये पूर्ण करावी.
काढणी करताना कोवळ्या शेंगांची काढणी करावी व वाळलेल्या शेंगांचे दाणे काढून त्यांचा वापर भाजीसाठी करता येतो. जर आपण प्रति हेक्टरी उत्पादन याचा विचार केला तर यामधील बुटक्या जातीचे उत्पादन हे पाच ते सात टन पर्यंत येते व उंच जातीमध्ये शेंगांचे प्रति हेक्टरी दहा टनांपर्यंत उत्पादन मिळते.
3- चवळी- चवळी लागवड करायची असेल तर जमिनीची निवड करताना जमीन हलकी ते मध्यम भारी करावी.चांगल्या पद्धतीची पूर्वमशागत करून प्रति हेक्टरी 25 टन शेणखत मिसळून द्यावे. उन्हाळी हंगामात जानेवारी फेब्रुवारी महिन्यात लागवड करावी.
लागवडीसाठी सरी वरंब्याचा वापर केला तर उत्तम ठरते.जर आपण चवळी उत्पादनाचा प्रति हेक्टरी विचार केला तर पाच ते सात टन उत्पादन मिळते.
4- गवार- तसे पाहायला गेले तर सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये गवारची लागवड उत्तम ठरते. परंतु पोयट्याची व पाण्याचा निचरा होणारी जमीन असेल तर चांगले उत्पादन मिळते.
उन्हाळी हंगामात 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी दरम्यान लागवड करावी. जर आपण येणाऱ्या उत्पादनाचा विचार केला तर जातीपरत्वे सहा ते सात आठवड्यात गवारच्या शेंगा काढणीला येतात. शेंगांचे काढणी करताना त्या कोवळ्या असतात तेव्हाच करावी. जर आपण मिळणाऱ्या उत्पादनाचा विचार केला तर प्रति हेक्टरी चार ते सहा टन उत्पादन मिळणे अपेक्षित असते.
नक्की वाचा:महाराष्ट्रातील मातीतल्या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता आणि व्यवस्थापन
Published on: 23 August 2022, 04:08 IST