मक्याची लागवड प्रामुख्याने खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामात केली जाते. रब्बी हंगामात देखील मोठ्या प्रमाणात मका लागवड केली जाते. जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर नासिक,जळगाव आणि धुळे जिल्ह्यामध्ये बहुतांशी मका लागवड मोठ्या प्रमाणात होते. परंतु जर आपण पाहिले तर मागील एक ते दोन वर्षापासून मका लागवड फार कमी प्रमाणात होताना दिसत आहे.
खरे पाहायला गेले तर मागच्या काही वर्षांपासून मक्याला जो काही बाजार भाव होता तो खूपच कमी मिळाला, हे एक प्रमुख कारण यामागे असू शकते.
परंतु जर येणारे भविष्य काळाचा विचार केला तर मक्याचा औद्योगिक दृष्टिकोनातून होणारा उपयोग पाहता मक्याला खूप उज्ज्वल भविष्य काळ राहील, हे मात्र निश्चित. या लेखात आपण मक्याचा वापर कोण कोणत्या ठिकाणी आणि कशा पद्धतीने केला जातो? याबद्दल माहिती घेऊ.
मक्याच्या विविध ठिकाणी होणारा वापर
1- मका अंकुर- हा एक खूप महत्त्वपूर्ण पदार्थ असून यामध्ये तेलाचे जवळचा 14 टक्के प्रमाण असते. मका अंकुराचा वापर पशुखाद्यासाठी केला जातो. मका अंकुर तेलात मुक्त फॅटी ऍसिड निर्माण होऊ नये यासाठी त्यामध्ये पाण्याचे प्रमाण दोन ते तीन टक्के असावे लागते.
2- मक्याचे पीठ- त्याचा वापर कप केक, मफिन्स, मका पाव इत्यादी तयार करण्यासाठी केला जातो. तसेच हे पीठ ग्लुटेन विरहित असल्यामुळे त्याचा तात्काळ पाव बनवण्यासाठी उपयोग होतो. मक्याच्या पिठाचा उपयोग बेकिंग उद्योग, पास्ता आणि सॉस बनवण्यासाठी देखील केला जातो.
3- मक्याच्या कोंडा- मक्याच्या कोंड्यांमध्ये न विरघळणारे तंतू असल्यामुळे ते पचनक्रिया मध्ये महत्त्वाचा रोल निभावतात व त्यामुळे रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण देखील कमी होते. या कोंड्याचा वापर पशुखाद्य, कोंबड्या व पाळीव प्राणी तसेच इथेनॉल उत्पादनात मोठ्या प्रमाणात केला जातो.
4- ग्लूटेन- यामध्ये प्रथिने व खनिजे या पदार्थांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्यामुळे याचा वापर पशुखाद्य आणि बेकरी उद्योगात मोठ्या प्रमाणात होतो. तसेच पाव तयार करताना त्याचा पोत सुधारण्यासाठी काही प्रमाणात मका ग्लुटेनचा वापर करतात.
5- स्टार्च- मका स्टार्च एक तृणधान्य असून त्यामध्ये प्रथिने व खनिज द्रव्यांचे प्रमाण कमी असते. मका स्टार्चच्या अतिशुद्धतेमुळे त्याचा उपयोग अनेक औद्योगिक ठिकाणी केला जातो. मक्यामध्ये 66% स्टार्चचे प्रमाण असल्यामुळे ते अनेक प्रक्रियेच्या माध्यमातून वेगळे केले जाते. त्यामध्ये त्यांना भिजवणे, दळणे आणि वाळवणे इत्यादी पद्धतींचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.
यावरील विशिष्ट प्रक्रियांमुळे मक्याच्या दाण्याची वरील टरफले निघून ग्लुटेन मऊ होते. याचा उपयोग कागद, कापड, अन्नप्रक्रिया आणि औषध उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणावर होतो.
6- कॉर्न फ्लेक्स- मका पोहे एक लोकप्रिय नाश्त्याचा पदार्थ असून त्यापासून चिवडा देखील तयार केला जातो. त्यासाठी योग्य आद्रता, पाण्याचे प्रमाण व उष्णता या बाबींचे संतुलन ठेवून स्टीलच्या रोलर मिल मधून उच्च दाब प्रक्रिया द्वारे पोहे तयार केले जाते.
Published on: 11 August 2022, 04:11 IST