उन्हाळ्यामध्ये भरपूर सूर्यप्रकाश उपलब्ध असतो. सूर्यप्रकाशाचा पुरेपूर फायदा धान पिकांमध्ये वापरले जाणारे जैविक खत निळे-हिरवे शेवाळ तयार करण्याकरता होणे आवश्यक आहे.
जर आपण आजच्या परिस्थितीचा विचार केला तर रासायनिक खतांवर अवलंबून न राहता जैविक खताकडे वळणे गरजेचे आहे. निळे हिरवे शेवाळ घरच्या घरी तयार करून त्याचा वापर येणाऱ्या खरीप हंगामामध्ये धान पिकाकरिता करून इतर खर्चात बचत करता येणे शक्य आहे. या शेवाळाचा वापर धान शेतीत केल्यामुळे जमिनीची सुपीकता सुद्धा वाढते. तसेच जमिनीचे गुणधर्म सुधारून त्याचा एकत्रित परिणाम धानाचे उत्पादन वाढीवर होतो.
निळे हिरवे शेवाळ(Blue Green Algae) म्हणजे काय?
हे सूक्ष्मदर्शीय, एक पेशीय तंतुमय शरीर रचना असलेले गोड्या पाण्यातील स्वयंपोषी पाणवनस्पती आहे. काही निळे-हिरवे शेवाळ पाण्यात राहून हवेतील मुक्त नत्र हेटरोसिस्ट या विशिष्ट शरीररचने द्वारे जमिनीत स्थिर करतात. निळे-हिरवे शेवाळाच्या वाढीसाठी व नत्र स्थिरीकरण यासाठी योग्य परिस्थिती उपलब्ध झाली असल्यास 30 किलो नत्र प्रति वर्ष प्रति हेक्टर स्थिर करू शकतो.
निळे-हिरवे शेवाळ खत तयार करण्याची पद्धत
अगोदर निळे-हिरवे शेवाळ प्रक्षेत्रावर तयार करून शेतकऱ्यांना दिले जायचे परंतु आता ते उपलब्ध होत नाही त्यामुळे निळे शेवाळ घरच्याघरी तयार करणे गरजेचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ते स्वस्त उपलब्ध तर होतेच परंतु त्याचा लाभ देखील मिळतो. त्यामुळे त्याला घरच्याघरी तयार करणे खूप गरजेचे आहे.
निळे-हिरवे शेवाळ खत तयार करण्याची कृती
भरपूर सूर्यप्रकाश असलेल्या ठिकाणी सिमेंट किंवा लोखंडी पत्र्याचे पसरट टाके वापरता येतात. शेतामध्ये एक मीटर रुंद व दोन मीटर लांब आणि 25 सेंटीमीटर खोल वाफे तयार करावेत. त्यावर जाड पॉलिथिन कापड पसरवून त्यात चाळलेली माती दहा किलो, सिंगल सुपर फास्फेट 200 ग्राम, युरिया दहा ते 20 ग्रॅम आणि सोडियम मोलिबडेट दोन ग्रॅम मिसळून पसरावे. नंतर वाफ्यात 10 ते 15 सेंटिमीटर पातळ पाणी भरून ढवळावे. आठ ते दहा तासाने पाणी संथ होऊन तळाशी बसल्यानंतर पाण्यावर 250 ग्रॅमशेवाळाचे मातृसंवर्धन पसरावे. त्या नंतर पाणी ढवळू नये. आवश्यकतेनुसार पाणी देऊन पातळी कायम राखावी. भरपूर सूर्यप्रकाशात दहा ते बारा दिवसातच पाण्यावर शेवाळ तरंगताना दिसेल. भरपूर वाढ झाल्यानंतर पाणी तसेच कमी होऊ द्यावे आणि सुकल्यानंतर शेवाळा च्या पापड्या जमा कराव्यात व नंतर वाफ्यात पुन्हा पाणी भरून 250 ग्रॅम शेवाळ्याची भुकटी पसरावी. अशा पद्धतीने एका वाफ्यातून दोन ते तीन वेळा शेवाळाची वाढ केल्यास प्रत्येक वेळेस दीड ते दोन किलो प्रमाणे आठ ते दहा किलो शेवाळ मिळेल. त्यानंतर वाफ्यातील संपूर्ण माती शेवाळा सोबत खरडून मिसळून घ्यावी. पाण्यामध्ये डास व यांची उत्पत्ती होऊ नये यासाठी मॅलॅथिऑन 1 मिली किंवा कार्बोफ्युरॉन तीन टक्के दाणेदार 25 ग्रॅम वाफ्यात टाकावे.
हे तयार झालेले शेवाळ खत धानाची रोवणी झाल्यानंतर मुख्य शेतात वापरता येते. शेतात तयार करायला सोपे व स्वस्त आहे. उन्हाळी हंगामात मिळणाऱ्या सूर्यप्रकाशाचा भरपूर लाभ घेता येतो.
महत्वाच्या बातम्या
नक्की वाचा:दुर्मिळ माहिती:पानवेलच्या 'या' जातींची लागवड करा आणि मिळवा 9 ते 15 वर्षांपर्यंत पैसा
Published on: 07 May 2022, 03:34 IST