1. यशोगाथा

Success Story : सांगोल्याच्या तरुणान फुलवलं फळपिकांचं नंदनवन

Dragon Fruit : ड्रॅगन फ्रूट लागवडीसाठी मुख्यत्त्वे जून ते जानेवारी पर्यंत पोषक वातावरण राहते. उन्हाळ्यामध्ये लागवडीचा निर्णय शक्यतो टाळणे योग्य राहते. याची लागवड मध्यम किंवा हलक्या प्रतीच्या जमिनीमध्ये करू शकतो. पण हे कमी पाण्यावर येणारे पिक असल्यामुळे पावसाळ्यात पाणी निचरा होणारी जमीन अधिक फायदेशीर ठरते.

Success Story

Success Story

Success Story : दुष्काळग्रस्त तालुका म्हणून सांगोल्याची एक ओळख आहे. याच भागात एका तरूण शेतकऱ्याने आपली वडिलोपार्जित शेतीत काम करून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ते शेतकरी म्हणजे महेश असबे. महेश हे आपल्या आजोबांपासून चालत आलेला परंपरागत शेती व्यवसाय पुढे नेण्याचे काम करत आहेत. पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे प्रामुख्याने डाळिंब, बोर, सीताफळ, द्राक्षे, ड्रॅगन फ्रूट इत्यादी फळपिके ते त्यांच्या शेतात घेतात. महाराष्ट्रामध्ये त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. वाचनाची आवड व नाविन्यपूर्ण काम करण्याची इच्छा या जोरावर २००९ साली ग्रीन ॲपल बेर लागवडीचा महाराष्ट्रामध्ये सर्वात पहिला यशस्वी प्रयोग महेश यांनी केला.

शेतीविषयक अभ्यास करून शेतीची यशस्वी करण्यापर्यंतचा प्रवास

शेतीक्षेत्रातील नाविन्यपूर्ण कामाचा वारसा कायम ठेवण्यासाठी शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन शेतीला व्यावसायिक स्वरुप देण्यासाठी कृषी अभियांत्रिकी विभागामध्ये त्यांनी पदवी शिक्षण घेतले. शिक्षण घेत असतानाच शेतीक्षेत्रामध्ये प्रगतशील अशा इस्राईल देशामध्ये प्रशिक्षणासाठी निवड झाली व शेतीविषयक अभ्यास करण्यासाठी त्यांना संधी मिळाली. अतिशय कमी पाणीसाठा व अतिउष्ण प्रदेश अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा आशादायी शेती फुलवू शकतो हा विश्वास तेथे संपादन करून परत येवून शेतीमध्ये काम करण्यास सुरुवात केली.

नवनवीन प्रयोगांची प्रेरणा जपत २०१३-१४ साली ड्रॅगन फ्रूट या विदेशी फळाची त्यांनी लागवड केली. त्यांनी व्हाइट तसेच रेड अशा दोन्ही प्रजातींची लागवड केली. कमी पाण्याची गरज, कोरडे वातावरण, हलक्या प्रतीची जमीन, रोगराई कमी, द्राक्षे व डाळिंब पिकाच्या तुलनेत कमी औषध फवारणी, कोणत्याही नैसर्गिक आपत्तीला बळी न पडता प्रत्येक वषी हमखास व भरघोस उत्पादन अशा सर्व बाजूंनी फायदेशीर ठरेल असे पीक असल्यामुळे या फळपिकांची निवड केली. सध्या ५० एकर बागायती क्षेत्र असून विविध फलांची यशस्वी लागवड केली आहे.

शेतीमध्ये विविधता जोपासत अनेक देशी-विदेशी फळांची लागवड केली ज्यामध्ये प्रामुख्याने ड्रॅगन फ्रूट (व्हाइट,रेड,यल्लो) ग्रीन ॲपल बेर, काश्मिरी ॲपल बेर (ग्रीन), सीडलेस बेर, अवोकाड़ो, गोड चिंच, पोमेलो (आफ्रिकन संत्री), वॉटर ॲपल, सीताफळ, VNR पेरू, ब्लॅक पेरू, थाई पेरू, थाई लिंबू, चिकू, द्राक्षे, आंबा इत्यादी फळपिकांची यशस्वी लागवड करून अकोला गावामध्ये शेती क्षेत्रातील नंदनवन उभे केले. बदलत्या कालानुसार बदलती पिके निवडल्यामुळे हे प्रयोग यशस्वी झाले. रुक्मिणी फार्ममधे उभे असलेले नंदनवन पाहण्यासाठी महाराष्ट्रातीलच न्हवे तर इतर राज्यांतून हजारो शेतकरी बांधवांनी भेट दिली आहे.

रुक्मिणी फार्ममध्ये २० प्रजातींवर काम करण्याचा मानस

महेश म्हणतात की, ड्रॅगन फ्रूट लागवडीसाठी मुख्यत्त्वे जून ते जानेवारी पर्यंत पोषक वातावरण राहते. उन्हाळ्यामध्ये लागवडीचा निर्णय शक्यतो टाळणे योग्य राहते. याची लागवड मध्यम किंवा हलक्या प्रतीच्या जमिनीमध्ये करू शकतो. पण हे कमी पाण्यावर येणारे पिक असल्यामुळे पावसाळ्यात पाणी निचरा होणारी जमीन अधिक फायदेशीर ठरते. ड्रॅगन फ्रूटच्या बागेचे एकूण यश झाडाचा आकार, संरचना व वाढीनंतरचा घेर, सूर्यप्रकाशाचा प्रवेश, हेवेचे पुरेसे अभिसरण, पाण्याची उपलब्धता, जमिनीची खोली, जमिनीचा उतार या बाबींवर अवलंबून आहे. ड्रॅगन फ्रूटची ३ एकरापासून केलेली सुरुवात आजअखेरिस १८ एकरवर पोहचली आहे. त्यामध्ये जंबो रेड, रेड-रेड, सियाम रेड, व्हाईट ड्रॅगन, व्हिएतनामी रेड इत्यादी प्रजातींची लागवड केली आहे. आपण घेत असलेल्या प्रत्येक पिकात कुशल व ज्ञानी व्हावे यासाठी मी व्हिएतनाम, इस्राईल, थायलंड, आदी देशांचे अभ्यासदौरे केले आहेत. तसेच भारतीय ड्रॅगन फ्रूटला जगभरात पोहचविण्यासाठी दुबई, ओमान, इराण या देशांचे दौरे केले व बाजारपेठेचा अभ्यास केला. २०२० साली दुबईला ड्रॅगन फ्रूटची पहिली निर्यात केली. २०१९ साली महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम येल्लो ड्रॅगन फ्रूट या प्रजातीची यशस्वी लागवड केली. येत्या काळामध्ये रुक्मिणी फार्ममध्ये आणखी २० प्रजातींवर काम करण्याचा मानस आहे.

शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी रुक्मिणी नर्सरीची उभारणी

महेश पुढे सांगतात की, निसर्गातील बदलांचा कमी फटका, कमी पाणी, रोग व किडीचा कमी प्रादुर्भाव, तसेच एकरी मिळणारा अधिक नफा या कारणामुळे या फळपिकास पर्यायी पीक म्हणून अधिक पसंती मिळत आहे. लागवडीचा वाढता कल पाहता ड्रॅगन फ्रूटची योग्य लागवड पद्धत निवडणे, योग्य अंतर, छाटणी व्यवस्थापन यांसारख्या तांत्रिक बाबींवर विशेष भर देणे आवश्यक आहे व ते शेतकऱ्यांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे. म्हणून शेतकऱ्यांना ड्रॅगन फ्रूटच्या लागवडी संदर्भात असणाऱ्या अडचणी सोप्या व्हाव्यात म्हणून ७ एकरवर विविध लागवड पद्धतींचे डेमो प्लॉट उभे करण्यात आले आहेत.

प्रत्यक्ष प्लॉटवर भेट देऊन त्यांच्या शंकांचे निरसन केले जाते. ड्रॅगन फ्रूट पिकासाठी असणारी चर्चासत्रे, सहली, कार्यशाळा स्वतः आयोजित करायला सुरुवात केली व गावातील शेतकऱ्यांचेही जीवनमान उंचवण्यास मदत झाली. त्यातून प्रेरणा घेवून माझ्या मार्गदर्शनाखाली भारतभर आतापर्यंत ५०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी ड्रॅगन फ्रूटची यशस्वी लागवड केली आहे. रुक्मिणी फार्ममधील सर्व शेतीविषयक अनुभव व माहिती कमीतकमी कालावधी मध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रसार माध्यमांचा वापर अतिशय सोयीस्करपणे केला जात आहे.

रुक्मिणी फार्मच्या मीडिया अकाउंटच्या माध्यमातून ती माहिती पोहचविण्याचे काम करत आहे. त्यामध्ये सोशल मिडीयाचा अर्थातच फेसबुक, युट्युब, इन्स्टाग्राम, ट्विटर, लिंक्डइन याद्वारे माहिती दिली जाते आणि त्याला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद भेटत आहे. शेतकऱ्यांना खात्रीशीर रोपे पुरविणे या ध्यासातून आणि शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी रुक्मिणी नर्सरीची उभारणी केली.

युवा शेतकऱ्यांचा दृष्टीकोन बदलवण्याचा प्रयत्न

सध्याच्या प्रयोगशील विचारांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना तंत्र मार्गदर्शन त्यांच्या उत्पादनाची योग्य दरात खरेदी करणे, शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची बाजारपेठ मिळवून देणं यासाठी एक युवा शेतकरी म्हणून ते सदैव प्रयत्नात आहे. भेटीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन करून त्यांच्या शंकांचे निरसन करून त्यांच्यामध्ये नवी चेतना जागृत करून शेतीक्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याचा त्यांचा प्रयत्न सुरु असतो.

English Summary: Success Story A paradise of fruit crops blossomed by the youth of Sangola Dragon Fruit Published on: 30 January 2024, 11:19 IST

Like this article?

Hey! I am ऋषिकेश चंद्रकांत काळंगे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters