1. बातम्या

Jowar Sowing : हुरड्यासाठी ज्वारीचे कोणते वाण असावे आणि लागवड कशी करावी?

साधारणपणे मकर संक्रांतीपासून हुरडा निघण्यास सुरुवात होते.राज्यांत हुरडा सिझन ४५ ते ६० दिवस चालतो. हुरडा चवीस सरस, गोड, मऊ, भाजलेल्या हिरव्या दाण्याचा हुरडा पर्यटकांना आकर्षित करत आहे.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
variety of sorghum update

variety of sorghum update

डॉ.आदिनाथ ताकटे

कोरडवाहू पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्वारी या पिकाची लागवड राज्यांत दिवसेंदिवस घटत चालली आहे.पीक काढणीसाठी मजुरीचा वाढता खर्च आणि पक्षांपासून संरक्षण ही महत्वाची कारण असली तरी गेल्या पाच वर्षापासून सात्यत्याने परतीचा पाऊस मोठया प्रमाणात पडल्यामुळे शेतकरी द्राक्ष, ऊस ,भाजीपाला या पिकांकडे वळले आहेत.राज्यांत कृषि पर्यटन व्यवसाय मोठया प्रमाणात वाढत चालल्याने पर्यटनामध्ये हुरडा पार्टीचे प्रस्थ वाढत चालले आहे आणि त्यामुळे हुरडयाला राज्यांत आणि राज्याबाहेर मोठया प्रमाणात मागणी असल्याने राज्यांत ज्वारी हुरडा लागवड क्षेत्रात मोठया प्रमाणात वाढ होताना दिसत आहे.

साधारणपणे मकर संक्रांतीपासून हुरडा निघण्यास सुरुवात होते.राज्यांत हुरडा सिझन ४५ ते ६० दिवस चालतो. हुरडा चवीस सरस, गोड, मऊ, भाजलेल्या हिरव्या दाण्याचा हुरडा पर्यटकांना आकर्षित करत आहे. हिरव्या दाण्याचा हुरडा अतिशय स्वादिष्ट लागतो, कारण त्यावेळेला या दान्यामध्ये मुक्त अमिनो आम्ले, साखर, विद्राव्य प्रथिने, जीवनसत्वे यांचे प्रमाण अधिक असून पिष्टमय पदार्थांचे प्रमाण कमी असते,त्यामुळे असे दाणे गोवऱ्यांच्या आचेवर भाजले असता दाण्यातील विविध रासायनिक घटकांची विशिष्ट रासायनिक प्रक्रिया होउन कॅरमलायझेशनमुळे दाण्यास एक प्रकारची स्वादिष्ट चव प्रप्त होते.अशामध्ये लिंबू,मीठ,साखर ,तिखट मसाला यासारखे पदार्थ वापरून त्यांची चव द्विगुणीत करता येते. खास हुरडयासाठी गोडसर रसाळ आणि भरपूर दाणे असणारे वाण राज्यातील कृषि विद्यापीठांनी निर्माण केले आहेत .

ज्वारी हुरडा महत्व:
*तंतुमय पदार्थांने संतृप्त
*लोह ,झिंक ,कॅल्शियम,फॉस्फरस यांनी समृद्ध 

हुरडयाचे सुधारीत वाण
महात्मा फुले कृषि विदयापीठ ,राहुरी यांनी विकसित केलेले वाण
फुले मधुर (आर एस एस जी व्ही -४६)
*प्रसारण वर्ष २०१४
*उत्कृष्ट प्रतिचा व चवदार हुरडा
*या वाणाचे खोड मध्यम,गोड ,रसरशीत
*हा वाण उंच व पालेदार
*हुरडा अवस्था येण्यास ९३ ते ९८ दिवस लागतात
*हुरडा अवस्थेत दाणे सहज सुटण्याचे प्रमाण हे ९५ टक्के पेक्षा जास्त
*खोडमाशी किडीस ,खडखड्या रोगास प्रतिकारक
*अवर्षणास प्रतिकारक
*हुरडयाचे उत्पादन ३०-३५ क़्वि./हे.
*कडब्याचे उत्पादन ६५ ते ७० क्विंटल/ हेक्टरी

फुले उत्तरा :
*प्रसारण वर्ष २००५
*स्थानिक वाणांतून निवड पद्धतीने विकसित
*हुरड्याची अवस्था येण्यास ९०-१०० दिवस
*भोंडातून दाणे सहज बाहेर पडतात
*सरासरी ७०-९० ग्रॅम इतका हुरडा मिळतो.
*हुरडा चवीस सरस अत्यंत गोड,
*ताटेही गोड असल्याने जनावरे कडबा चवीने खातात.
*कणीस गोलाकार,मध्यम घट्ट
*मध्यम उंचीचा,पाने पालेदार
*खोड मध्यम ,गोड रसरशीत
*खोडमाशी व खडखड्या रोगास प्रतिकारक्षम
*हुरडा उत्पादन २०-२५ क्विंटल प्रती हेक्टरी
*कडब्याचे उत्पादन- ५५ते ६० क्विंटल प्रती हेक्टरी

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विदयापीठ ,परभणी
एसजीएस ८-४
*हुरडा रुचकर आणि गोड
*हुरडयाची प्रत उत्तम
*कणसातून दाणे सहजरीत्या वेगळे होतात
*इतर हुरडयाच्या वाणापेक्षा याचा दाना टपोरा
*हुरडा उत्पादन १५-१६ क्विंटल प्रती हेक्टरी
कडब्याचे उत्पादन ७०-७५ क्विंटल प्रती हेक्टरी

परभणी वसंत (पीव्हीआरएसजी १०१)
*प्रसारण वर्ष २०२१
*खाण्यास चवदार,गोड,मऊ
*कणसातून दाणे सहजरीत्या वेगळे होतात
*हुरड्याची अवस्था येण्यास ९५ दिवस
*खोडमाशी ,खोड कीड व खडखड्या रोगास सहनशील
*दाण्याची आणि कडब्याची प्रत उत्तम
*हुरडा उत्पादन ३४ क्विंटल प्रती हेक्टरी
*कडब्याचे उत्पादन १३३-१३५ क्विंटल प्रती हेक्टरी
*मराठवाडा विभागासाठी शिफारस

पंजाबराव देशमुख कृषि विदयापीठ ,अकोला
ट्रॉम्बे अकोला सुरुची (टी ए के पी एस -५)
*प्रसारण वर्ष २०२२
*मळनीस अतिशय सुलभ
*हुरडयाची प्रत उत्तम,चवदार
*हुरडा तयार होण्याचा कालावधी ९१ दिवस
*हुरडयाचे उत्पादन ४३ क्विंटल
*हिरवा चारा उत्पादन ११० क्विंटल
*महाराष्ट्रासाठी प्रसारित

खरीप हंगामातील हुरडा वाण
पी डीके.व्ही कार्तिकी ( वाणी १०३)
*हुरडा चवदार आणि गोड
*हुरडा ८२-८४ दिवसांत तयार
*मीज माशीच्या प्रादुर्भावाला बळी पडत नाही
*हुरडा उत्पन्न ४२ - ४३ क्विंटल प्रती हेक्टरी
*विदर्भासाठी प्रसारित

पी.के व्ही अश्विनी( वाणी ११/६) :
*८२ ते ८४ दिवसांत हुरडा तयार
*हुरडा मळणीस सुलभ
*हुरडा अधिक गोड व चवदार
*दाण्यात साखरेचे प्रमाण अधिक
*मीज माशी प्रतिकारक
*हुरडा उत्पादन ४२-४३ क्विंटल प्रती हेक्टरी

स्थानिक वाण: सुरती,गूळभेंडी ,कुची कुची,काळी दगडी ,वाणी,मालदांडी

हुरडा ज्वारी लागवड तंत्रज्ञान
जमीन - मध्यम ते भारी, पाण्याचा योग्य निचरा होणारी

पूर्व मशागत & मृद व जलसंधारण -
रब्बी हंगामात हुरडा वाणाची पेरणीकरण्यासाठी मशागत करावी. ज्वारी पेरणीपूर्वी जानिनीची नांगरटकेल्यास जमिनीत पाणी मुरण्यास मदत होते.त्याकरिता पावसाचे पाणी साठवून ठेवण्यासाठी जमिनीची बांध बंदिस्ती करावी. सारा यंत्राने वाफे पाडून त्यामध्ये बळीराम नांगराने बांधणी करावी.त्यमुळे पावसाचे पाणी पूर्णपणे वाफ्यात साचून जमिनीत मुरण्यास मदत होते.

पेरणीची योग्य वेळ - 
१५ सप्टेंबर  -१५ ऑक्टोबर
खोड माशीचा प्रादुर्भाव  टाळण्यासाठी  व भरपूर उत्पादन मिळण्यासाठी ऑक्टोबर चा पहिला पंधरवडात पेरणी करावी 
लवकर पेरणी केली तर ( १५ सप्टेंबरअगोदर) तर खोड माशीमुळे मोठ्या प्रमाणात पोंगे मर होते.उशिरा पेरणी केल्यास जमिनीचा ओलावा कमी झाल्यामुळे बियाण्याची उगवण कमी होते 
आर्थिक फायद्यासाठी टप्प्या टप्प्याने लागवड करावी.मात्र कीड व रोगांपासून संरक्षण करण्यासठी बीजप्रक्रिया अतिशय महत्वाची 
ऑगस्ट च्या पहिला आठवडा पासून १५ दिवसाच्या अंतराने, नोव्हेंबर च्या पहिला पंधरवड्यापर्यंत पेरणी शक्य 
पेरणी अंतर व हेक्टरी बियाणे : दोन ओळीतील अंतर ४५ से.मी. व दोन रोपातील अंतर १५ से.मी. ठेवावे . 
पेरणीकरिता हेक्टरी १० किलो बियाणे वापरावे.
हुरडा वाण :
खरीप लागवडी साठी वाण: 
पीडीकेव्ही कार्तिकी (वाणी १०३), पीकेव्ही अश्विनी( वाणी ११/६)
रब्बी लागवडीसाठी वाण : 
फुले मधुर, एसजीएस ८-४,परभणी वसंत , ट्रॉम्बे अकोला सुरुची
स्थानिक वाण: सुरती,गूळभेंडी ,कुची कुची,काळी दगडी ,वाणी,मालदांडी
बीज प्रक्रिया :
प्रति किलो बियाण्यास ४ ग्रॅम गंधक चोळावे.त्यानंतर २५ ग्रॅम प्रत्येकी अॅझोटोबॅकटर व पीएसबी या जैविक खतांची बीजप्रक्रिया करावी.
थायोमिथोकझॅम (७० टक्के) ३ ग्रॅम प्रती  किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया केल्यास खोड माशी मुळे होणारी पोंगेमर कमी होते. 
खत व्यवस्थापन :
मध्यम जमिनीत पेरणी करताना प्रति हेक्टरी ४० किलो नत्र व २० किलो स्फुरद म्हणजेच ८७ किलो (सर्वसाधारणपणे दोन गोण्या) युरिया व १२५ किलो (सर्वसाधारणपणे अडीच गोणी) एसएसपी दोन चाड्याच्या  पाभरीने दयावे.
भारी जमिनीत  पेरणी करतेवेळी प्रति हेक्टरी  ६० किलो नत्र व ३० किलो स्फुरद म्हणजेच १३० किलो युरिया(सर्वसाधारणपणे अडीच गोणी)  व १८७ किलो एसएसपी (सर्वसाधारणपणे पावणे चार  गोणी) दयावे.
बागायती ज्वारीसाठी, मध्यम व खोल जमिनीसाठी जमिनीकरिता प्रति हेक्टरी ८० किलो नत्र, ४० किलो स्फुरद व ४० किलो पालाश म्हणजेच १७४ किलो युरिया(सर्वसाधारणपणे साडेतीन गोणी),२५० किलो एसएसपी(सर्वसाधारणपणे पाच गोणी) व ६७ किलो एमओपी(सर्वसाधारणपणे सव्वा गोणी) याप्रमाणे खते द्यावीत.
बागायती ज्वारीच्या पेरणीच्या वेळी संपूर्ण स्फुरद,पालाश व अर्धे नत्र द्यावे. उर्वरित नत्र पेरणीनंतर ३० दिवसांनी पहिली खुरपणी झाल्यावर साधारणपणे  दयावे.
भारी जमिनीत प्रति हेक्टरी १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ५० किलो पालाश दयावे.त्याकरिता २१७ किलो युरिया(सर्वसाधारणपणे सव्वाचार गोण्या),३०८ किलो एसएसपी(सर्वसाधारणपणे सहा गोणी) व ८४ किलो एमओपी (सर्वसाधारणपणे पावणे दोन गोणी) दयावे
पेरणी करतेवेळी संपूर्ण स्फुरद,पालाश व अर्धे नत्र द्यावे.उर्वरित नत्र साधारणपणे पेरणीनंतर एक महिन्यांनी  पहिली खुरपणी झाल्यावर दयावे.
कोरडवाहू रब्बी ज्वारीस पेरणीच्या वेळी ५०:२५:२५ नत्र:स्फुरद:पालाश प्रति हेक्टरी  दोन चाड्याच्या पाभरीने दयावे.त्याकरिता साधारणपणे दोन गोणी युरिया, तीन गोण्या एसएसपी व एक गोणी एमओपी या प्रमाणे खतांची मात्रा द्यावी.
आंतर मशागत :
ज्वारीची उगवण झाल्यावर १० ते १२ दिवसांनी विरळणी करावी.पिकाच्या सुरवातीच्या ३५ ते ४० दिवसात पीक ताणविरहित ठेवावे.
पेरणीनंतर आवश्यकतेनुसार १ ते २ वेळा खुरपणी करावी आणि तीन वेळा कोळपणी करावी.
पहिली कोळपणी पेरणीनंतर तीन आठवड्यानी फटीच्या कोळप्याने करावी.
दुसरी कोळपणी पेरणीनंतर पाच आठवड्यानी पासच्या कोळप्याने करावी.त्यामुळे रोपांना मातीचा  आधार मिळतो  व 
तिसरी कोळपणी आठ आठवड्यानी दातेरी कोळप्याने करावी.त्यामुळे जमिनीच्या भेगा बुजवण्यास मदत होऊन जमिनीतील ओल्याव्याचे बाष्पीभवन न होता जमिनीतील ओलावा टिकून राहण्यास मदत होते
पाणी व्यवस्थापन :
कोरडवाहू ज्वारीस संरक्षित पाण्याची सोय असल्यास पीक गर्भावस्थेत असतांना पेरणीनंतर २८ ते ३०दिवसांनी किंवा पीक पोटरीत असतांना ५० ते ५५ दिवसांनी दयावे.
दोन पाणी देणे शक्य असल्यास वरील दोन्ही नाजूक अवस्थेत ज्वारीला पाणी दयावे.
बागायती ज्वारीस  मध्यम जमिनीत तिसरे पाणी फुलोऱ्यात असतांना पेरणीनंतर ७० ते ७५ दिवसांनी  दयावे.
पेरणी नंतरचे व्यवस्था पणामुळेउत्पादनात २० टक्के भरीव वाढ होते.
काढणी :
काढणी अंगठा व बोटाच्या मध्ये ज्वारीचा दाणा दाबून पाहिल्यास दुधासारखा द्रव किंचित बाहेर येते. दाणे मऊसर लागतात. झाड फुलोऱ्यात आल्यानंतर १५ ते २५ दिवसांत ही अवस्था येते. या टप्प्यावर दाण्यामध्ये स्टार्च वेगाने साचत असते.
या अवस्थेत एकूण धान्य वजनाच्या ५० टक्के एवढे असते. पुढे हुरड्याच्या अवस्थेत दाण्यामध्ये ते प्रमाण ६५ ते ६८ टक्के एवढे असते. 
हुरडा अवस्थेमधील कणसे आणल्यानंतर कणसे खुडून ती हाताने चोळावेत. हाताने चोळल्यानंतर त्यामधील दाणे सहज वेगळे होऊ शकतात. 
साठवणूक हुरडा ४ अंश सेल्सिअस तापमानात साठवल्यास ३० दिवसांपर्यंत चांगला राहू शकतो. 
सारंगपूर ,नरसापूर हुरड यासाठी प्रसिद्ध 
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील सारंगपूर व नरसापूर ही गावे हुरडा उत्पादना साठी प्रसिद्ध आहे. कमी पाण्यात हलक्या जमिनीत हमखास उत्पादन देणारा सुरती व   गूळभेंडी हुरडा ही या भागाची विशेष ओळख आहे. या पंचक्रोशीत सुमारे १००० हून अधिक एकरावर हुरडयाचे पीक घेतले जाते.गंगापूर तालुक्यातील या पट्ट्यात पिकणारा हुरडा राज्याच्या सर्व भागात विक्रीसाठी पोहोच केला जातो. हुरडा सीजन नुसार १५० ते ३५० रुपये प्रती किलो दर्जेनुसार आहे. यातून कोटीची उलाढाल  डिसेंबर ते फेब्रुवारी या ४५ ते ५० दिवसांत होते.
लेखक - डॉ.आदिनाथ ताकटे,मृद शास्रज्ञ एकात्मिक शेती पद्धती महात्मा फुले कृषि विदयापीठ ,राहुरी, मो.९४०४०३२३८९  
English Summary: Which variety of sorghum should be used for hurda and how should it be planted Published on: 09 October 2023, 04:50 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters