1. बातम्या

Fish News : गोड्या पाण्यातील लहान देशी मासे आणि त्यांचे महत्व

सामान्यतः शेती केलेल्या माशांपेक्षा काही लहान देशी मासे लोह, झिंक, कॅल्शियम, आयोडीन, सेलेनियम, जीवनसत्त्व अ, जीवनसत्त्व ब-12 यांसारख्या सूक्ष्म पोषक घटकांमध्ये अनेक पटींनी समृद्ध आहेत. हे सूक्ष्म पोषक घटक शरीराबाहेरील स्रोतातून मिळवणे आवश्यक असते. संशोधनातून असे समजले आहे की एक किलो लहान देशी माशांमधून मिळणारे सूक्ष्म पोषक घटक हे 50 किलो इतर मोठ्या माशांमधून मिळणाऱ्या घटकांबरोबर असतात. बहुतेकदा हे मासे संपूर्णपणे (डोके, हाडे, डोळे इत्यादी सह) वाळवून, खारवून, आंबवून खाल्ले जातात. ज्यामुळे पौष्टिक मूल्यवर्धन होऊन अन्न सुरक्षेमध्ये महत्त्वपूर्ण योगदान होते. तसेच हे मासे या पोषक मूल्यांमुळे पारंपरिक औषधे म्हणून देखील वापरली जातात.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
Fish News

Fish News

कृष्णा पाटील, ओमकार पाटील, जयंता सु. टिपले

लहान देशी मासे हे मूळ-स्थानिक मासे आहेत, जे साधारणपणे 25-30 से. मी पर्यंत वाढतात. भारतात साधारणपणे आढळणाऱ्या 765 गोड्या पाण्यातील मत्स्य प्रजातींपैकी सुमारे 450 प्रजाती लहान देशी मासे संवर्गात मोडतात. हे मासे प्रामुख्याने नद्या आणि उपनद्या, खाडी, लहान- मोठे जलाशय, तलाव, ओढे, नाले, पाणथळ प्रदेश इ. मध्ये आढळतात. भारताबरोबरच दक्षिण आशियाई देशांमध्ये ग्रामीण भागात लहान देशी मासे हे दैनंदिन अन्नात समाविष्ट आहेत. अप्रतिम चव आणि भरपूर पोषकमुल्ये, मुबलक उपलब्धता यामुळे स्थानिक ग्रामीण लोकांच्या प्रथम पसंतीस उतरतात.
पौष्टिक मूल्य व अन्न सुरक्षेतील योगदान : मुख्य प्रवाहातील कार्प्ससारख्या मोठ्या प्रजातींवर लक्ष केंद्रित मत्स्यशेतीमध्ये लहान देशी माशांच्या प्रजाती फार पूर्वीपासून दुर्लक्षित आहेत. तथापि, लहान देशी मासे उल्लेखनीय पौष्टिक फायदे देतात त्यामुळे ते नैसर्गिक 'सुपरफूड (उत्कृष्ट अन्न)' म्हणून प्रसिद्ध आहेत.

या प्रजाती प्रथिने, फॅटी ऍसिडस्, जीवनसत्त्वे आणि खनिजे समृध्द आहेत, ज्यामुळे ते त्यांच्या आरोग्य फायद्यांसाठी अत्यंत मूल्यवान आहेत. कार्प्स, तिलापिया, पंगस इ. यांसारख्या सामान्यतः शेती केलेल्या माशांपेक्षा काही लहान देशी मासे लोह, झिंक, कॅल्शियम, आयोडीन, सेलेनियम, जीवनसत्त्व अ, जीवनसत्त्व ब-12 यांसारख्या सूक्ष्म पोषक घटकांमध्ये अनेक पटींनी समृद्ध आहेत. हे सूक्ष्म पोषक घटक शरीराबाहेरील स्रोतातून मिळवणे आवश्यक असते. संशोधनातून असे समजले आहे की एक किलो लहान देशी माशांमधून मिळणारे सूक्ष्म पोषक घटक हे 50 किलो इतर मोठ्या माशांमधून मिळणाऱ्या घटकांबरोबर असतात. बहुतेकदा हे मासे संपूर्णपणे (डोके, हाडे, डोळे इत्यादी सह) वाळवून, खारवून, आंबवून खाल्ले जातात. ज्यामुळे पौष्टिक मूल्यवर्धन होऊन अन्न सुरक्षेमध्ये महत्त्वपूर्ण योगदान होते. तसेच हे मासे या पोषक मूल्यांमुळे पारंपरिक औषधे म्हणून देखील वापरली जातात.

संभाव्य मत्स्यसंवर्धन योग्य प्रजाती :

लहान देशी मासे हे प्रामुख्याने मासेमारीतून उपलब्ध होतात. मात्र यापैकी बऱ्याच प्रजाती संवर्धन योग्य असून त्यांना मोठी मागणी आहे त्यामुळे चांगला बाजार भावपण मिळतो. यामध्ये ॲम्बलीफॅरिंगडॉन मोला, लॅबेओ बाटा, पुंटियस टिक्टो, सिरीनस रेबा, नंदूस नंदुस, ग्लोसोगोबियस गियुरिस, चंदा नामा, सिरीनस सिरोसा इत्यादींचा समावेश होतो. तसेच मागुर, मरळ, सिंघी, टेंग्रा, चिताला, पाबदा इत्यादींचे नैसर्गिक मत्स्य बीज पकडून छोट्या प्रमाणावर संगोपन केले जात आहे. तसेच भारतातील उपलब्ध लहान माशांच्या प्रजाती पैकी जवळपास 40 प्रजाती या शोभिवंत मत्स्य पालनात महत्वपूर्ण आहेत.

संभाव्य धोके व सध्यास्थिति:

नैसर्गिक अधिवासाचे नुकसान, वाढते प्रदूषण, किटाकनाशके व कृत्रिम खतांचा अधिक वापर, छोट्या जाळयांचा वापर तसेच विदेशी माशांचा नैसर्गिक अधिवासात वाढता प्रसार व प्रभाव यामुळे हे लहान देशी मासे कमी होत असून बाजारात मर्यादित उपलब्धतेमुळे हे मासे अत्यंत महाग झाले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील कुटुंबांना परवडत नाहीत व अन्न सुरक्षिततेचे प्रश्न उद्भवू शकतात. म्हणून लहान देशी माशांचे संवर्धन ही काळाची गरज आहे.

काही प्रमुख गोड्या पाण्यातील लहान देशी मासे :

ऑस्टियोब्रामा कोटिओ (भोंगी)
सिस्टोमस सराना (सरपुनटी)
एम्ब्लीफेरींगोडॉन मोला (मोला)
चंदा नामा (काचकी)
पुंतियस चोला (खवली)
चन्ना स्त्रेटस (डोक)
हीटरोप्न्युस्तेस फॉसिलीस (सींघी)
लॅबेओ बाटा (तंबटी)
ग्लॉसोगोबियस गिऊरीस (खरपा)
चन्ना पंक्टाटस (मरळ)
क्लारियास बात्राचस (मागूर)

लेखक - कृष्णा पाटील, विद्यार्थी, मत्स्य महाविद्यालय, शिरगाव, रत्नागिरी. मो. न. ७८८७६०५९९५.
ओमकार पाटील, विद्यार्थी,
जयंता सु. टिपले, सहाय्यक प्राध्यापक (अतिथी व्याख्याता), जलीय प्राणी आरोग्य व्यवस्थापन विभाग, मो. न. ८७९३४७२९९४. मत्स्य विज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर. महाराष्ट्र

English Summary: Fish News Small indigenous freshwater fish and their importance Published on: 05 April 2024, 03:48 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters