1. बातम्या

कृषी पदवीधर हे आधुनिक शेतीचे उत्‍प्रेरक बनले पाहिजेत

देशाच्‍या आर्थिक विकासात कृषी व कृषी संलग्‍न क्षेत्राचे मोठे योगदान आहे, स्‍वातंत्र्यानंतर शेतकरी, कृषी शास्‍त्रज्ञ व धोरणकर्ते यांच्‍या परिश्रमातुन कृषी उत्‍पादनात वाढ होऊन देश अन्‍नधान्‍यात स्‍वयंपुर्ण झाला. गेल्‍या वर्षी देशात 277 दशलक्ष टन अन्‍नधान्‍याचे उत्‍पादन झाले असुन जगात भात, गहु, दुग्ध, फळे व भाजीपाला, अंडी आदीच्‍या उत्‍पादनात आपण अग्रेसर आहोत. सद्यस्थितीत भारतीय शेती समोर अनेक आव्‍हाने असुन यात जागतिक तापमानवाढ, सतत नैसर्गिक आपत्‍ती, जमिनीचा होणारा ऱ्हास, पाण्‍याचे दुर्भिक्ष, शेतमालाच्‍या भावातील अस्थिरता आदी प्रमुख समस्‍या आहेत.

KJ Staff
KJ Staff


देशाच्‍या आर्थिक विकासात कृषी व कृषी संलग्‍न क्षेत्राचे मोठे योगदान आहे, स्‍वातंत्र्यानंतर शेतकरी, कृषी शास्‍त्रज्ञ व धोरणकर्ते यांच्‍या परिश्रमातुन कृषी उत्‍पादनात वाढ होऊन देश अन्‍नधान्‍यात स्‍वयंपुर्ण झाला. गेल्‍या वर्षी देशात 277 दशलक्ष टन अन्‍नधान्‍याचे उत्‍पादन झाले असुन जगात भात, गहु, दुग्ध, फळे व भाजीपाला, अंडी आदीच्‍या उत्‍पादनात आपण अग्रेसर आहोत. सद्यस्थितीत भारतीय शेती समोर अनेक आव्‍हाने असुन यात जागतिक तापमानवाढ, सतत नैसर्गिक आपत्‍ती, जमिनीचा होणारा ऱ्हास, पाण्‍याचे दुर्भिक्ष, शेतमालाच्‍या भावातील अस्थिरता आदी प्रमुख समस्‍या आहेत.

कृषी विकासासाठी शेतमालास योग्‍य व शाश्‍वत भाव मिळणे आवश्‍यक असुन शेतीनिगडीत मुलभुत सुविधांचे बळकटीकरण, योग्‍य कृषी तंत्रज्ञान, शेतकऱ्यांच्या सामर्थ्‍य निर्मितीवर भर द्यावा लागेल. कृषी पदवीधर हे कृषी उद्योजक म्‍हणुन पुढे आले पाहिजेत. देशाच्‍या कृषि विकासात कृषि विद्यापीठातील पदवीधरांनी आपले योगदान देण्‍याची गरज असुन कृषी पदवीधर हे आधुनिक शेतीचे उत्‍प्रेरक बनले पाहिजे, असे प्रतिपादन नवी दिल्‍ली येथील भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक मा. डॉ. त्रिलोचन महापात्र यांनी केले. 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात दिनांक 26 डिसेंबर रोजी आयोजीत 22 वा दीक्षांत समारंभात दीक्षांत अभिभाषण करतांना ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्‍हणुन प्रमुख पाहुणे म्‍हणुन महाराष्‍ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्‍यक्ष श्री. संजय धोत्रे व राज्‍याचे कृषी, फलोत्‍पादन व दुग्‍धविकास व पणन राज्‍यमंत्री श्रीसदाभाऊ खोत उपस्थित होते तर अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू डॉ. अशोक ढवण हे होते. व्‍यासपीठावर कुलसचिव श्री. रणजित पाटीलशिक्षण संचालक डॉ. विलास पाटील, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य श्री. राहुल पाटील, श्री. लिंबाजी भोसले, श्री. अजय गव्‍हाणे, श्री. बालाजी देसाई, श्री. शरद हिवाळे, डॉ. आदिती सारडा, माजी कुलगुरू डॉ. एस एस कदम, डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु, डॉ. व्‍ही. के. पाटील, डॉ. के. पी. गोरे, संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. प्रदिप इंगोले, उपकुलसचिव डॉ. गजानन भालेराव आदींची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. त्रिलोचन महापात्र पुढे म्‍हणाले की, सन 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्‍पन्‍न दुप्‍पट करण्‍याचे भारत सरकारचे उदिष्‍ट असुन शेती उत्‍पादनक्षम पेक्षा अधिक उत्‍पन्‍नक्षम करण्‍याच्‍या धोरणावर शासनाचा भर आहे. याकरिता फायदेशीर व शाश्‍वत असा एकात्मिक शेती पध्‍दतीचा विकास करावा लागेल. कृषी संशोधनात रिमोट सेन्सिंग, जीआयएस, जैवतंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करावा लागेल. परभणी कृषी विद्यापीठाने मराठवाडयातील कोरडवाहु शेती विकासाकरिता उपयुक्‍त असे पिकांचे वाण व कृषी तंत्रज्ञानाची निर्मिती केली असुन हे तंत्रज्ञान जास्‍तीत जास्‍त शेतकऱ्यांपर्यंत पोहच‍ण्‍यासाठी सक्षम अशी विस्‍तार यंत्रणा निर्माण करावी लागेल. यासाठी कृषी पदवीधरांचे योगदान महत्‍वाचे ठरणार आहे, असे प्रतिपादन त्‍यांनी केले.



स्‍वागतपर भाषणात कुलगुरू डॉ. अशोक ढवण म्‍हणाले की, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने आजपर्यंत विविध पिकांच्‍या 141 वाण व 25 शेती औजारे विकसित केले असुन 850 पेक्षा जास्‍त कृषि तंत्रज्ञान शिफारसी दिल्‍या आहेत. मराठवाडयातील शेतकऱ्यांची अनेक दिवसापासुन मागणी असलेला कापसाचा नांदेड-44 हा वाण महा‍बीजच्‍या मदतीने बीटीमध्‍ये परावर्तीत करण्‍यात आला असुन येणाऱ्या खरिप हंगामात शेतकऱ्यांसाठी हा वाण उपलब्‍ध होणार आहे. तसेच हैद्राबाद येथील अर्ध शुष्‍क उष्‍णकटिंबधीय आंतरराष्‍ट्रीय संशोधन संस्‍थेच्‍या मदतीने लोह व झिंक चे अधिक प्रमाण असणारा देशातील पहिला खरिप ज्‍वारीचा परभणी शक्‍ती जैवसमृध्‍द वाण विद्यापीठाने विकसित केला असुन बाजरी पिकातील एएचबी-1200 व एएचबी-1269 हे जैवसमृध्‍द वाण निर्माण केले आहेत, यामुळे गर्भवती महिला व मुलींमधील कुपोषणावर मात करता येईल. भारतीय कृषी संशोधन परिषदेने नुकतेच विद्यापीठास अधिस्‍वीकृती दिली असुन यामुळे परिषदेकडुन प्राप्‍त होणाऱ्या निधीचा विद्यापीठातील शैक्षणिक सुविधांचे बळकटीकरण करून देशाच्‍या कृषी विकासासाठी अधिक सक्षम व कौशल्‍यपुर्ण मनुष्‍यबळ निर्मितीवर भर देण्‍यात येईल. देशातील विविध भागातील विद्यार्थ्‍यी व विद्यार्थ्‍यींनी करिता परभणी कृषि विद्यापीठ परिसर अधिक हरित, स्‍वच्‍छ व सुरक्षित करण्‍यास मानस असल्‍याचे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केला

सुत्रसंचालन डॉ. आशा आर्या व डॉ. दयानंद मोरे यांनी केले. समारंभास शहरातील प्रतिष्‍ठीत नागरीक, प्रगतशील शेतकरी, विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते. दीक्षांत समारंभात विविध अभ्‍यासक्रमासाठी विद्यापीठाने व दात्‍यांनी ठेवलेली सुवर्ण पदके (सुवर्ण मुलामित), रौप्‍य पदके व रोख पारितोषिके पात्र स्‍नातकांना प्रदान करून गौरविण्‍यात आले. समारंभात विविध विद्याशाखेतील एकुण 3,376 स्‍नातकांना विविध पदवी,पदव्‍युत्‍तर, आचार्य पदवीने माननीय कुलगुरू महोदयांद्वारे अनुग्रहीत करण्‍यात आले. यात आचार्य पदवीचे एकुण 61 स्‍नातक, पदव्‍युत्‍तर अभ्‍यासक्रमाचे एकुण 364 स्‍नातक व पदवी अभ्‍यासक्रमाचे एकुण 2,951 स्‍नातकांचा समावेश होता.

English Summary: Agricultural graduates should become catalysts of modern farming Published on: 28 December 2018, 08:36 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters