1. कृषीपीडिया

सेंद्रिय शेतीची करायची असल्यास अशी करा फायदा होईल

अधिक उत्पादन देणाऱ्या संकरित जाती, रासायनिक खतांचा विपूल वापर आणि पीक संरक्षणार्थ किटकनाशकांची वारंवार फवारणी

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
सेंद्रिय शेतीची करायची असल्यास अशी करा फायदा होईल

सेंद्रिय शेतीची करायची असल्यास अशी करा फायदा होईल

अधिक उत्पादन देणाऱ्या संकरित जाती, रासायनिक खतांचा विपूल वापर आणि पीक संरक्षणार्थ किटकनाशकांची वारंवार फवारणी या त्रिसुत्रीवर आधारीत प्रचलित शेती पद्धतीमुळे निर्माण झालेल्या आर्थीक, पर्यावरणीय तसेच आरोग्य विषयक प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी ज्या पर्यायी कृषि उत्पादन पद्धतीचा प्रसार हल्ली झपाटयाने होताना दिसून येतो आहे, ती कमी खर्चाची शाश्वत शेती अशा जवळपास समान गर्भित अर्थ असलेल्या नावाने ओळखलं जाऊ लागलं आहे.

सेंद्रिय शेतीची संकल्पना :

      सेंद्रिय शेती म्हणजे रासायनिक खताऐवजी सेंद्रिय पदार्थांचा वापर एवढा मर्यादित अर्थ नसून व्यापक दृष्टीने विचार केला तर या पद्धतीत कंपोस्ट खत, जनावरांचे मलमुत्र, हिरवळीचे खत इत्यादी स्थानिक संसाधनाचा वापर करण्यावर भर असतो. याबरोबरच नत्र स्थिरीकरण करणाऱ्या द्विदल वर्गीय पिकांचा पीकचक्रामध्ये अंतर्भाव करुन जिवाणू खतांचा, गांडूळ खताचा आवर्जून वापर करुन रासायनिक खतावरील अवलंबित्व कमी करुन दोन तीन हंगामानंतर संपूर्णपणे सेंद्रिय स्वरुपाचा निविष्ठांचा वापर करणे अभिप्रेत आहे. पिकांची अन्नद्रव्याची गरज भागविण्यासाठी एकदल व द्विदल पिकांचा मिश्रपद्धतीने तसेच चक्रीय फेरपालट करुन त्यानुसार पीक पद्धतीची आखणी करुन, पीक कापणीनंतर शिल्लक राहिलेला उपलब्ध पालापाचोळा आच्छादन म्हणून किंवा कंपोस्ट निर्मितीकरिता वापरला जातो. किडीचा व रोगांचा बंदोबस्त करण्यासाठी एकात्मिक कीड नियंत्रण तत्वाचा अवलंब केला जातो.

 एकंदरीत स्थानिक संसाधनाची वापर करणारी, कमी भांडवली खर्चाची, पर्यावरणीय मुलतत्वावर आधारलेली, सेंद्रिय पदार्थाचा सुयोग्य वापराने जमिनीची उत्पादनक्षमता वाढवून ती टिकवून धरण्यावर भर देणारी, जैविक विविधता जोपासणारी, शेतकरी कुटूंबाच्या पोषणविषयक व इतर मूलभूत गरजा पूर्ण करणारी निसर्ग पूरक स्वयंपूर्ण शेती पद्धती म्हणजेच सेंद्रिय शेती होय.

सेंद्रिय शेतीची सुरुवात कशी कराल ?

 सेंद्रिय शेतीमध्ये केवळ वार्षिक पिकांचाच विचार करुन चालत नाही, तर त्या बरोबरच विविध उपयोगी, बहुवार्षिक वृक्षपिकांचा व फळपिकांचा तसेच शेतीशी पूरक अशा इतर विविध उत्पादन साखळ्यांचा विचारही अभिप्रेत आहे. एका उत्पादन व्यवस्थेने टाकलेले पदार्थ दुसऱ्या व्यवस्थेकरीता वापरात आणले गेले पाहिजेत. या परस्परपूरक व्यवसायामध्ये पशुपालन, कुक्कुटपालन, मत्स्यपालन, मधुमक्षिकापालन, गांडुळ संवर्धन, आळिंबी उत्पादन इत्यादी व्यवसायांची निवड करुन स्थानिक परिस्थितीशी सुसंगत करणं आवश्यक आहे.

      सेंद्रिय शेतीमध्ये हिरवळीच्या खताच्या वापरास महत्वपूर्ण स्थान आहे. एकाच प्रकारच्या पिकापासून हिरवळीची खते तयार करण्यापेक्षा मिनपिकापासून हे खत निर्माण केले तर अधिक फायदेशीर ठरते. सेंद्रिय शेतीची उपरोक्त मुलतत्वे लक्षात ठेवून त्यानुसार आखणी केल्यास ४ ते ५ वर्षाच्या कालावधीत आदर्श असा सेंद्रिय फार्म अथवा सेंद्रिय शेती होऊ शकते.

सेंद्रिय शेती : सेंद्रिय शेतीची व्याख्या वसंकल्पना :

      ज्या शेती पद्धतीमध्ये रासायनिक प्रक्रियेने तयार केलेली संयुक्त खते, रोग आणि किटकनाशके, तणनाशके आणि उत्पादन वाढीचे इतर रासायनिक घटक इत्यादींचा वापर संपूर्णपणे वर्ज्य करुन, जमिनीचा जिवंतपणा हा केंद्रबिंदू असतो आणि जमिनीची सुपिकता, जडण घडण, पोषकता, टिकविली किंबहूना वाढविली जाते अशा शेती पद्धतीला सेंद्रिय शेती असे म्हणतात. सर्व साधारणपणे सेंद्रिय शेती पद्धतीत सेंद्रिय खताचा वापर, जनावरांचे मलमुत्र, पिकांचा फेरपालट, आंतरपीक पद्धतीचा वापर, हिरवळीचे खत, शेतातील काडीकचऱ्याचे कंपोस्ट खत, गांडूळ खत, उपयुक्त जिवाणू संवर्धनाचा वापर, सेंद्रिय व नैसर्गिक घटकांचा पीक संरक्षणासाठी वापर, रोग व कीड प्रतिबंधक प्रजातींचा आणि बियाणांचा वापर वगैरे प्रमुख बाबींचा जमिनीत सुपिकता आणि उत्पादकता कायम राखण्यासाठी अथवा वाढविण्यासाठी अंतर्भाव करण्यात येतो आणि पर्यायाने हेच सेंद्रिय शेतीची प्रमुख घटक आहेत. या शेती पद्धतीत वापण्यात येणाऱ्या निविष्ठांचा स्त्रोत हा देखील सेंद्रिय सणे बंधनकारक आहे. ही शेती पद्धती चराचर जीवसृष्टीवर परस्पराधारित आहे.

सेंद्रिय शेतीसाठी परीक्षण, निरीक्षण आणिप्रमाणीकरण :

  सेंद्रिय शेतीचा सर्वात महत्वपूर्ण घटक व केंद्रबिंदू म्हणजे प्रमाणीकरण. प्रमाणीकरण (सर्टिफिकेशन) ही ग्राहकाला उत्पादित प्रक्रिया केलेल्या सेंद्रिय शेतीमालाच्या गुणवत्तेची खात्री होय. शेतकऱ्यांचे उत्पादन हे सेंद्रियच आहे हे ठरविण्यासाठी शासनमान्य संस्थेच्या प्रमाणीकरणाचे लेबल कृषि मालाला मोहरबंद लावणे आवश्यक असते. त्याकरिता या संस्थांचे निरीक्षक आणि अधिकारी सेंद्रिय शेतीच्या प्लांटला वेळोवेळी भेट देतात. सेंद्रिय उत्पादनाची प्रमुख टप्प्याची कामे ही निरीक्षकाच्या अधिपत्याखाली केली जातात. सेंद्रिय प्रमाणके (ऑरगॅनिक स्टँडर्डस्) ही सेंद्रिय शेती उद्योगाची गुणवत्ता व दर्ज नियंत्रणाची परिमाणे आहेत. भारतात १ ऑक्टोबर २००१ पासून सेंद्रिय म्हणून निर्यात करण्यासाठी, परवानाप्राप्त सर्टिफिकेशन एजन्सीचे प्रमाणपत्र आवश्यक केले आहे. २६ जुलै २००२ ला इंडिया ऑरगॅनिक लोगो प्रमाणीत करण्यात आला आहे. देशाच्या वाणिज्य मंत्रालयाने नॅशनल प्रोग्राम फॉर ऑरगॅनिक, ७ मे २००३ ला जाहीर केला. सद्य: परिस्थितीत सहा एजन्सीजना प्रमाणिकरणा करता मान्यता दिली आहे. ऍ़ग्रीकल्चरल अँड प्रोसेसड् फूड प्रॉडक्टस् एक्सपोर्ट ऍ़थॉरिटी ही एक प्रमुख प्रमाणीकरण एजन्सी असून तिच्या अधिपत्याखाली खालील चार एजन्सीजना प्रमाणीकरणाचे अधिकार दिले आहेत.

सेंद्रिय शेती सुरु केल्यापासून शेतीमालाचे सेंद्रिय म्हणून प्रमाणीकरण होण्यापर्यंतच्या कालावधीत बदलाचा कालावधी म्हणतात. हा कालावधी १-३ वर्षे एवढा राहू शकतो. जमीन कृषि रासायनिक पदार्थापासून मुक्त करणे बंधनकारक असते. या बदलाच्या कालावधीत उत्पादन केलेला शेतीमाल प्रमाणीकरण एजन्सीच्या अंडर कनव्हर्जन लेबल अंतर्गत विकता येतो.

सेंद्रिय शेतीच्या तात्पुरत्या शिफारशी :

  सेंद्रिय शेतीमध्ये अन्नद्रव्याचे व्यवस्थापन यासंबंधी जे प्रयोग घेण्यात आले, त्या प्रयोगाच्या आधारे काही तात्पुरत्या स्वरुपाच्या शिफारशी करण्यात येत आहेत. यामध्ये ज्वारी, बाजरी, कापूस, तूर, सोयाबीन, मूग, उडीद या पिकासाठी तसेच ज्वारी व तूर, बाजरी व तूर, कापूस व सोयाबीन, सोयाबीन व तूर इत्यादी आंतरपीक पद्धतीसाठी लागू आहेत.

१. सेंद्रिय खते

शेणखत / कंपोस्ट : ५-८ टन/हे.

गांडूळ खत : ३-४ टन/हे.

निंबोळी पावडर : १-१.५ टन/हे.

तलावातील गाळ : ८-१० टन/हे.

ऊसाची मळी : ७-१० टन/हे.

तेलबियांच्या पेंडी : १-१.५ टन/हे

 

जिवाणू संवर्धन : शिफारस केल्याप्रमाणे

२. हिरवळीची खते :

 उभ्या पिकात जसे भात, रुंद ओळीवर पेरलेला अथवा टोकलेला कापूस, तूर इत्यादी पिकात बरु, धैंचा, चवळी यांचे हिरवळीचे पीक घ्यावे. हिरवळीचे पीक फुलोऱ्याच्या अवस्थेत बळीराम नांगराच्या साहाय्याने पिकांच्या दोन ओळीत गाडावे.

 ग्लिरीसीडीया या वनस्पतीची पाने व कोवळ्या फांद्या बारीक करुन सर्व पिकामध्ये पसरुन देऊन त्याची आच्छादन करावे. पीक २५-३० दिवसाचे असतांना याचा वापर करावा. हे हिरवळीचे खत अवघ्या एक आठवड्यात कुजून जाऊन पिकाला उपलब्ध होते. सर्वसाधारणपणे ६-८ टन हिरवा पाला / फांद्या हेक्टरी द्याव्यात.

ट्रायकोडर्मा एक प्रभावी जैविकबुरशीनाशक :

ट्रायकोडर्मा हे एक बुरशीचे मिश्रण असून जमिनीद्वारे पिकावर येणाऱ्या विविध रोगांचे प्रभावी नियंत्रण करते.विविध डाळवर्गीय व गळीत धान्यावर येणाऱ्या मर व तत्सम रोगाचे नियंत्रण करते.विविध फळबागा, भाजीपाला पिकावर, प्रामुख्याने रोपवाटिकेत येणाऱ्या मूळ व रोपे सडणे, रोपे कोलमडणे व मर इत्यादी रोगांचे नियंत्रण करते.ऊस व कापूस यासारख्या नगदी पिकांवर येणाऱ्या सड व मर या रोगांचे नियंत्रण करण्यासाठी हे अत्यंत उपयुक्त आहे.

जैविक बुरशीनाशक वापरण्यासंबंधीच्या सूचना व पद्धती :

बीजप्रक्रिया : २५ ग्रॅम जैविक बुरशीनाशक १० मि.ली. पाण्यात मिसळून १ किलो ग्रॅम बियाण्यास लावावे, बियाणे कोरडे करुन ताबडतोब पेरण्यासाठी वापरावे.

रोप प्रक्रिया : ५०० ग्रॅम जैविक बुरशीनाशक २५ लिटर पाण्यात मिसळून मिश्रण चांगले ढवळून घ्यावे. रोगांची मुळे मिश्रणात बुडवून लावणी करावी.

माती प्रक्रिया : १ कि.ग्रॅ. जैविक बुरशीनाशक २५ सि.ग्रॅ. कंपोस्टमध्ये मिसळून ते १ एकर जमिनीवर (प्राधान्याने पेरणीपूर्वी) टाकावे.

ट्रायकोडर्मा : जैविक बुरशीनाशक हे एक जिवंत बुरशीचे मिश्रण असल्यामुळे त्याची साठवण थंड व कोरड्या जागी करावी. त्यास सुर्यप्रकाश व उष्णता यापासून दूर ठेवावे. या जैविक बुरशीनाशकांचा वापर अंतिम दिनांकापूर्वी करावा.

ट्रायकोडर्मा हे जैविक बुरशीनाशक माऊफंग नावाने स्पॉन उत्पादन केंद्र, वनस्पती विकृती शास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे विक्रीसाठी उपलब्ध आहे.

English Summary: If you want to do organic farming, do it Published on: 22 April 2022, 07:36 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters