1. कृषी व्यवसाय

मुरघास निर्मिती तंत्र; जाणून घ्या सविस्तर माहिती

चारा साठवण्याच्या इतर काही पद्धतीमध्ये मुरघास हि एक महत्वाची पद्धत आहे , त्याच कारण अस कि पारंपारिक पद्धतीमध्ये चारा वाळऊन साठवला जातो. परंतु याद्वारे साठवलेल्या चाऱ्यातील पोषक द्रव्यांचा ऱ्हास मोठ्या प्रमाणावर झालेला दिसून येतो. मात्र मुरघास पद्धतीने साठवलेल्या चाऱ्यातील ऱ्हास अगदी कमी प्रमाणात होतो तसेच हा चारा जनावरे अगदी चवीने खातात.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
Silage production techniques

Silage production techniques

डॉ.तानाजी वळकुंडे, डॉ.विशाल वैरागर
मुरघास खरे तर हि एक आंबवण्याची प्रक्रीया  आहे . मुरघास म्हणजे हवा विरहीत जागेत किंनविकरण करून साठवलेला हिरवा चारा  किंवा अगदी सोप्या भाषेत सांगावयाचे झाले तर हिरव्या चाऱ्याचा फारसा कस कमी न होऊ देता हवाबंद स्थितीत साठऊन ठेवण्याच्या पद्धतीस मुरघास असे म्हटले जाते.

मुरघास पद्धतीनेच चारा का साठवावा ?

चारा साठवण्याच्या इतर काही पद्धतीमध्ये मुरघास हि  एक महत्वाची पद्धत आहे , त्याच कारण अस कि  पारंपारिक पद्धतीमध्ये चारा वाळऊन  साठवला जातो. परंतु याद्वारे साठवलेल्या चाऱ्यातील पोषक द्रव्यांचा ऱ्हास मोठ्या प्रमाणावर झालेला दिसून येतो.  मात्र मुरघास पद्धतीने साठवलेल्या  चाऱ्यातील ऱ्हास अगदी कमी प्रमाणात होतो तसेच हा चारा जनावरे अगदी चवीने खातात.

मुरघास पासूनचे फायदे :

आपली बरीचशी चारा पिके पावसावर येणारी असतात आणि आपल्याकडे बाराही महिने हिरवा चारा मिळण्यासाठी बागायतीची कमतरता आहे. त्यामुळे हिरव्या चाऱ्याचा तुटवडा उन्हाळ्यात भासतो. म्हनून हिरव्या चाऱ्यासारखा गुणवत्ता असणारा चारा म्हणजे मुरघास असल्याने दुभत्या जनावराना उत्पादन सातत्य राखण्यासाठी तो उपयोगी ठरतो. याचे फायदे सांगायचे झाले तर याद्वारे हिरवा चारा चांगल्या अवस्थेत दीर्घकाळ टिकूऊन ठेवता येतो. गवतासारख्यानिकृष्ठ वनस्पतीपासुनही चांगल्या प्रकारे मुरघास करता येतो. जास्त प्रक्षेत्रावरील पिक कमी जागेत साठून ठेवता येते, चारा पिक लवकर कापणी होत असल्यामुळे शेत दुसऱ्या पिकाकरीता मोकळे होते.

मुरघास करण्यासाठी साधारणपणे पिके निवड:

चांगल्या प्रकारचा मुरघास तयार करण्यासाठी एकदल चारा पिके द्विदल चारा पिकापेक्षा अतिशय योग्य आहेत. कारण ज्या पिकांमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते त्या पिकांपासून अतिशय उत्कृष्ट मुरघास तयार होतो. यामुळे तृणधान्य पिके योग्य समजली जातात. त्यामध्ये मका आणि ज्वारी या पिकापासून उत्कृष्टमुरघास तयार होतो. याशिवाय बाजरी, संकरीत नेपियर,ओट याएकदलवर्गीय पिकापासून चांगला मुरघास तयार करता येतो. द्विदल चारा पिकापासुनही मुरघास तयार करता येतो पण त्यासाठी या पिकासोबत ५० टक्के एकदलवर्गीय पिक साठवावे लागते तसेच गुळाचा योग्य वापर आवश्यक असतो. योग्य मुरघास तयार करण्यासाठी चारा पिके ५० टक्के फुलोरा अवस्थेत असताना कापणी करावी लागते.

पिक निवडल्यावर मुरघास तयार करण्याची पद्धती

मुरघास तयार करताना जमिनीत खड्डा करून किंवा जमिनीवर सायलो बंकरचे बांधकाम करून घ्यावे लागते. सध्या प्लास्टिक बॅगचा वापर करून सुद्धा मुरघास तयार करता येतो. जमिनीमध्ये खड्डा करावयाचा असल्यास त्याचा आकार हा त्या ठिकाणची स्थानिक परिस्थिती, जमिनीतील पाण्याची पातळी आणि जनावरांची संख्या यावर अवलंबून असतो. खड्डा शक्यतो उंच जागेवर असला पाहिजे, म्हणजे पावसाचे पाणी त्यात झिरपणार नाही . खड्ड्याच्या भिंती सिमेंटने प्लास्टर करून हवाबंद कराव्यात किवा हे शक्य नसल्यास २०० मायक्रोन प्लास्टिक पेपर खड्ड्यात अंथरावा.त्यानंतर चार्याचे पिक फुलोऱ्यात आल्यावर कापणी करावी आणि चार ५ ते ६ तास सुकू द्यावा, म्हणजे त्यातील ओलाव्याचे प्रमाण ८० टक्के वरून ६० ते ६५ टक्के पर्यंत कमी होईल. त्यानंतर कुट्टी मशिनच्या सहायाने सुकवलेल्या चार्याची, एक इंच आकाराचे तुकडे होतील अश्या पद्धतीने कुट्टी क्कारून घ्यावी. त्यानंतर प्रती टन चाऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी १ किलो युरिया ,२ किलो गुळ, १ किलो मिनरल मिक्चर , १ किलो मीठ आणि १ लिटर ताक यांचे वेगवेगळे मिश्रण तयार करून त्याचे एकत्रित १० ते १५ लिटरचे द्रावण तयार करावे . त्यानंतर खड्यात कुट्टी भरण्यास सुरुवात करावी . चार ते सहा इंचाचा थर देऊन झाल्यावर त्यावर तयार केलेले मिश्रण शिपडावे. त्यानंतर थर चोपनीने किंवा धुमसणे चोपून चांगला दाबून घ्यावा , अश्या पद्धतीने थरावरथर देऊन खड्डा भरून घ्यावा म्हणजे त्यात हवा राहणार नाही. खड्डा जमिनीच्या वर १ ते १.५ फुट भरून प्लास्टिक कागदाने काळजीपूर्वक झाकून घ्यावा . त्यावर वाळलेले गवत, उसाचे पाचट, गव्हाचे काड टाकून त्यावर मातीचा थर देऊन खड्डा हवाबंद करावा. मुरघास तयार होण्यास ४५ ते ६० दिवस लागतात .

मुरघास चांगला तयार झाल्याचे गुणधर्म:

मुरघासाची प्रत कशी आहे हे आपण त्याचा वास, रंग आणि सामू यावरून ठवता येते. जर मुरघासास आंबट गोड दह्यासारखा वास येत असेल आणि रंग पिवळसर , फिक्कट हिरवा असल्यास उत्तम प्रकारचा मुरघास तयार झाला आहे असे समजावे. याशिवाय जर मुरघासाचा सामू ३.८ ते ४.२ दरम्यान असेल तर उत्तम प्रकारचा मुरघास तयार झाला आहे असे समजावे. पण मुरघासाचा वास कुजल्यासारखा आणि रंग काळसर झाला असेल तर मुरघास खराब झाला आहे असे समजून तो जनावरांना खाऊ घालू नये. उत्तम मुरघास तयार झाल्यानंतर ६ महिने ते एक वर्ष्यापर्यंत जनावरांना खाऊ घालता येतो.

जनावरांना मुरघास देण्याचे प्रमाण :

पूर्ण वाढ झालेल्या दुभत्या जनावरास रोज १५ किलोपर्यंत मुरघास खाऊ घालावा. बैलांना ७ ते ८ किलो प्रती दिन, तसेच एक वर्षापेक्षा कमी वयाच्या वासरांना अर्धा किलो , शेळ्या मेंड्यांना दर रोज एक किलो मुरघास खाऊ घालावा.

लेखक - डॉ.तानाजी वळकुंडे, विषय विशेषज्ञ, पशु विज्ञान व दुग्ध शास्त्र, कृषी विज्ञान केंद्र , मोहोळ
डॉ.विशाल वैरागर, विषय विशेषज्ञ, कृषि विस्तार, कृषी विज्ञान केंद्र , मोहोळ

English Summary: Silage production techniques Know the detailed information Published on: 26 March 2024, 01:55 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters