Rain Update : नववर्षाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. नववर्षाच्या पहिल्याच आठवड्यात हवामान खात्याने पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे रब्बीच्या पिकांवर आता अवकाळीचे संकट घोंगावत आहे. तसंच तापमानात घट होण्याचा देखील अंदाज व्यक्त केल्याने गारठा वाढण्याची शक्यता आहे.
खरीप हंगाम चांगला आला नाही, त्यामुळे शेतकऱ्यांची आशा रब्बी हंगामावर होती. परंतु नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पावसाचा फटका शेतीला बसला. त्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यातून काही बचावलेली पिके आता शेतकऱ्यांच्या हातात येतील अशी आशा शेतकऱ्यांना आहे. मात्र जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आलेत.
राज्यातील वातावरणात बदल झाल्याने विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पुढील दोन दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्रातील १७ तसेच विदर्भातील अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात अशा एकूण २२ जिल्ह्यात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यताही हवामान खात्याने दिली आहे.
उत्तर भारतात थंडीची लाट कायम असल्याने त्याचा परिणाम राज्यातील वातवारणावर झाला आहे. यामुळे वातावरणात बदल झाल्याने देशाच्या काही भागासह राज्यात पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. राज्यातील वातावरणात बदल होत असल्याने कुठं ढगाळ हवामान तर कुठं थंडीचा कडाका जाणवत आहे.
उत्तर भारतात थंडीचा जोर कायम
उत्तर भारतात थंडीच्या लाटेचा जोर कायम आहे. दिल्लीत रविवारी सकाळी ५ अंश सेल्सियस तापमान पाहायला मिळालं. पहाटेपासून सूर्यकिरणे पाहायला मिळाली नाही. दिल्लीत रविवार मोसमातील थंड दिवस होता. वाढलेल्या थंडीमुळे नागरिकांना हुडहुडी भरली आहे. रविवारी भर दिवसा दिल्लीत अनेक ठिकाणी नागरिकांनी शेकोट्यांचा आधार घेतलेला दिसून आला.
दरम्यान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तामिळनाडू आणि केरळमध्ये आज आणि उद्या पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसंच सध्या देशातील बहुतेक भागात थंडीचा जोर कायम आहे. तसंच रात्रीच्या वेळी धुके वाढल्याने नागरिकांना प्रवासात अडचणीत येत आहेत. पंजाब आणि हरियाणामध्ये येत्या दोन दिवसात थंडीचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
Published on: 01 January 2024, 11:00 IST