Maharashtra Weather Update : राज्यात मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. यासोबत वातावरणात देखील सातत्याने बदल होत आहे. याचदरम्यान राज्यात पु्न्हा दोन दिवस पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. तर दुसरीकडे राज्यातील बहुतांश भागांमध्ये तापमान ३७ अंशांच्याही पलिकडे पोहोचलं आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील २४ तास मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आकाश निरभ्र राहणार आहे. शहर आणि उपनगरांमध्ये उष्णतेची लाट ते तीव्र उष्णतेची लाट येण्याची दाट शक्यता आहे. यासोबच कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ४० अंश सेल्सियस आणि २६ अंश सेल्सियसच्या आसपास असेल.
मुंबईसोबत कोकणातील तुरळक क्षेत्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्रातील एक दोन ठिकाणी रात्रीच्या वेळी उष्ण वातावरण होण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये एक किंवा दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वाऱ्यासह पावसाचा अंदाज देखील हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे.
दरम्यान स्कायमेट हवामान संस्थेने देखील हवामानाबाबत महत्त्वाचे अपडेट दिले आहेत. देशाच्या पूर्वोत्तर भागात येणाऱ्या अरुणाचल प्रदेश आणि नजीकच्या भागात हलक्या बर्फवृष्टीची शक्यता या संस्थेने व्यक्त केली आहे. तसंच हिमालयाच्या पश्चिमेकडील क्षेत्रामध्ये हलक्या हिमवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर पंजाब, उत्तर प्रदेश, हरियाणा या भागात वाऱ्याची शक्यता वर्तवली आहे.
Published on: 17 April 2024, 10:48 IST