Monsoon Update : केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर त्याचा परिणाम आता राज्यातील वातावरणावर झाल्याचं दिसून येत आहे. सध्या केरळात जोरदार पाऊस होत आहे. मान्सूनला पुढील प्रवासासाठी देखील अनुकूल वातावरण झाले. मात्र उत्तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक क्षेत्रात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. तर विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक क्षेत्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
एकीकडे देशात मान्सूनने आगमन केलं आहे तर दुसरीकडे मात्र राज्यात उष्णतेची लाट वाढली आहे. अनेक भागांत तापमानात वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत उष्णतेपासून दिलासा कधी मिळेल, याचीच वाट नागरिक पाहत आहेत. मान्सून केरळमध्ये दाखल झाल्यानंतर सात ते आठ दिवसात मान्सूनचे राज्यात आगमन होतं. यामुळे नागरिकांना उकाड्यापासून सुटका मिळवण्यासाठी अजून आठवडा वाट बघावी लागणार आहे.
दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज (दि.३१) मुंबई शहर आणि उपनगरांत आकाश अंशतः ढगाळ राहील. उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३५°C आणि २९°C च्या आसपास असेल.
Published on: 31 May 2024, 10:25 IST