पुणे : राज्यात मागील आठवड्यापासून ढगाळ वातावरण आहे. तसेच राज्याच्या अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. तर आज (दि.३) देखील मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडाच्या बहुतांश भागात गारपीटीचा इशारा हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
हवामान विभागाने (IMD) देशभरातील वातावरण बदल होणार असून अनेक भागात पावसाचा अंदाज़ व्यक्त केला आहे. तसेच अनेक भागात पाऊस, गारपीट आणि तापमानात चढउतार देखील होईल. मध्य महाराष्ट्रावर चक्राकार वारे निर्माण झाले आहेत, तसेच अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून येणारे आर्द्र वारे वाहतील, ज्यामुळे अनेक भागात पाऊस पडेल.
मुंबई, पुणे या शहरात देखील दिवसभर वातावरण ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. तर दुपारनंतर शहरात पाऊस पडण्याची शक्यता आहे. हा पाऊस गेल्या काही दिवसांपासून 34 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलेल्या उष्णतेला काहीसा ब्रेक देईल. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, आणि धुळे या भागांत हा बदल अधिक जाणवेल.
राज्यात मागील एक आठवड्यापासून हवामानात बदल होत असल्याने त्याचा शेतपिकांवर परिणाम झाला आहे. मार्च, एप्रिलमध्ये प्रचंड उन्हाच्या झळा असतात मात्र सध्या ढगाळ वातावरण दिसून येत आहे. तर दुसरीकडे बहुतांश भागात पावसाची रिमझिम तर काही ठिकाणी चांगला पाऊस पडताना दिसून येत आहे.
Published on: 03 April 2025, 11:19 IST