Rain Update : राज्यात मागील आठवड्यापासून अवकाळी पावसाने धुमशान घातलं आहे. यामुळे शेतपिकांचं नुकसान होऊन शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. यातच आता पु्न्हा मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने दिली आहे. उत्तर कोकणातील तुरळक क्षेत्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तसंच या भागात तुरळक क्षेत्रात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे.
मुंबई शहर आणि उपनगरांत उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. तसंच आज सायंकाळी मेघगर्जनेसह वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तर आज मुंबईत कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३६°C आणि २९°C च्या आसपास असणार आहे.
दरम्यान मराठवाड्यातील जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे.
Published on: 17 May 2024, 10:29 IST