'असनी'चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात धडकले असून त्याचा परिणाम आता दिसायला लागला आहे.
भारतीय हवामान खात्याने या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल तसेच ओडीसा त्या राज्यांना वादळी पावसाचा इशारा दिला असून आज सकाळपासून हे वादळ तीव्र स्वरूप धारण करेल असे हवामान खात्याने सांगितले आहे. भारतीय हवामान विभागाच्या मते, असणी चक्रीवादळाचा प्रभाव अंदमान-निकोबार च्या 610 किमी उत्तर-पश्चिम, पोर्ट ब्लेअर च्या 500 किमी पश्चिम, विशाखापट्टणमच्या 810 किमि आग्नेय आणि पुरीच्या 880 किमी दक्षिण-पूर्वस सर्वात जास्त दिसेल. या वादळाचा वेग पाहिला तर आज नऊ मे रोजी बंगाल आणि ओडिशा मध्ये 90 किमी प्रति तास आणि 10 मे रोजी 125 किमी प्रति तास या वेगाने वारे वाहतील असा देखील अंदाज वर्तवला आहे आणि त्यासोबत वादळी वाऱ्यासह पाऊस देखील पडेल.
या राज्यांनाही बसणार फटका
ओडीसा व्यतिरिक्त बिहार, पश्चिम बंगाल, झारखंड, सिक्किम, आसाम आणि आंध्रप्रदेश सोबत अनेक राज्यांमध्ये चक्रीवादळ असनीचा प्रभाव दिसून येईल.
तसेच भारतीय हवामान विभागाकडून सदर राज्यांसाठी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच मध्य प्रदेश राज्याच्या लागून असलेल्या राज्यांमध्ये हवामान ढगाळ करण्याचीदेखील शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
महाराष्ट्रावर काय होईल परिणाम?
संपूर्ण देशातील अनेक भागांमध्ये उष्णतेची लाट सुरू असून लोक त्रस्त झाले आहेत. महाराष्ट्रातील विदर्भ, राजस्थान तसेच दक्षिण हरियाणा, दक्षिण पंजाब, पश्चिम मध्य प्रदेश आणि जम्मूतील वेगवेगळ्या भागांमध्ये उष्णतेची लाट तीव्र होण्याची शक्यता आहे. येणाऱ्या 24 तासात हे वादळ आणखी तीव्र स्वरूप धारण करणार असून ओडिशाच्या किनारपट्टीला धडकण्या ऐवजी दहा मेच्या रात्रीपासून पूर्व किनाऱ्याला समांतर उत्तर दिशेने वाटचाल करेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
तसेच मान्सून वर याचा तुर्तास देखील कुठलाही परिणाम होणार नसल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
Published on: 09 May 2022, 11:25 IST