Marathawada Rain Update : राज्यात सध्या काही ठिकाणी कडक ऊन तर काही ठिकाणी अवकाळी पाऊस होत असल्याचं पाहायला मिळत आहे. तर आता हवामान खात्याकडून मराठवाड्याच्या काही भागात पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. तर मुंबई आणि बाजूच्या परिसरात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
हवामान खात्याने उत्तर कोकणाच्या एकाकी भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. यासोबतच वादळ आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह ३०-४० किमी प्रतितास वेगाने हे वारे येण्याची शक्यता देखील आहे.
मुंबई शहर आणि उपनगरांत पुढील २४ तास वातावरण निरभ्र राहील. यामुळे शहर आणि उपनगरांमध्ये उष्णतेची लाट येण्याची दाट शक्यता आहे. तर कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३९ अंश सेल्सियस आणि २४ अंश सेल्सियसच्या आसपास असण्याची शक्यता आहे.
मागील चार ते पाच दिवसांपासून मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान झालं आहे. तर मराठवाड्याच्या आणि विदर्भाच्या काही भागात गारपीट देखील झाली आहे. यामुळे पिकांचं नुकसान होऊन शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे.
दरम्यान, काल (दि.१५) रोजी भारतीय हवामान खात्याने पत्रकार परिषद घेऊन पावसाचा पहिला अंदाज व्यक्त केला आहे. यंदा जून ते सप्टेंबर दरम्यान देशात १०६ टक्के पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. या अंदाजामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
Published on: 16 April 2024, 10:43 IST