Maharashtra Weather News : राज्यातील तापमानात वाढ झाल्यामुळे थंडीचा कडाका कमी झाला आहे. तसंच वातावरणात काही बदल झाल्यामुळे हवामान खात्याने राज्यात पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. काल (दि.४) सायंकाळी सांगली, बुलढाणा, कोल्हापूर भागात हलक्या पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई, पुणे आणि राज्याच्या इतर भागात देखील पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
हवामान खात्याच्या माहितीनुसार, राज्यातील वातावरणात बदल झाल्यामुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. आज (दि.५) रोजी राज्यात पावसाचा अंदाज आहे. तसंच कोकणाच्या काही भागात देखील पावसाचा अंदाज आहे. धुळे, नंदुरबार येथेही तीन दिवस हलक्या पावसाची शक्यता आहे. तसंच मध्य महाराष्ट्र, मराठवाडाच्या काही भागात देखील पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यासोबतच सातारा, सांगली, सोलापूर, बीड, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, गोंदिया, नागपूर येथे पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
काल बुलढाणा जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. बुलढाण्यातील मोताळा तालुक्यातील आव्हा, तळणी, लिहा भागात अवकाळीने हजेरी लावली आहे. इतर गावात गुरुवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या गहू, तुर, मका, हरभरा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसंच नोव्हेंबरमध्ये झालेल्या अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे आधीच नुकसान झाले आहे. त्यात आता पु्न्हा अवकाळीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आलेत.
दरम्यान, वातावरणातील बदलामुळे राज्यात पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मुंबईत सरासरीपेक्षा कमी तापमान आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार सुरूच आहे. मुंबईत धुक्याची चादरही पसरलेली आहे. तसंच पुढील चार ते पाच दिवस मुंबईत ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
Published on: 05 January 2024, 10:43 IST