Maharashtra Weather Update : मागील काही दिवसांपासून वातावरणात बदल होत असल्याने त्याचा वातावरणावर परिणाम झाला आहे. यामुळे विदर्भात अवकाळीने हजेरी लावली असून आज (दि.१२) रोजी देखील विदर्भात अवकाळी पावसाचा अंदाज कायम आहे. मागील दोन दिवसांत विदर्भात गारपीटीसह जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे पिकांचे नुकसान झालंय. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. गेल्यावर्षी अवकाळी आणि गारपिठीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते.
पिकांचे मोठे नुकसान
विदर्भात जोरदार गारपीटीने हजेरी लावली आहे. यामुळे फळपिकांचे आणि रब्बीच्या पिकांचे नुकसान झाले आहे. अमरावतीतील जिल्ह्यात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हरभरा, गहू, तूर, कांदा, संत्रा आणि भाजीपाला, फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकरी आता पुन्हा एकदा संकटात सापडले आहेत.
वातावरणात बदल झाल्यामुळे अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. १३ फेब्रुवारीपर्यंत विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यात १२ फेब्रुवारीपर्यंत तुरळक ठिकाणी गडगडाटीसह मध्यम पावसाची शक्यता आहे. यामुळे विदर्भातील शेतकरी आता चिंतेत आहेत.
वर्धा जिल्ह्यात देखील अवकाळीने चांगलीच हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील देवळी तालुक्यात पावसाने धुमाकूळ घातला. तसंच भिडी, तळणी, आकोली, लोणी, आगरगाव या भागात झालेल्या अवकाळी, गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे पिके भुईसपाट झाली आहेत. हरभरा, गहू, तूरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
दरम्यान, नागपूरसह विदर्भाच्या काही भागात शनिवारी रात्री गारपिटीसह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. हिंगणा, मौदा, भिवापूर तालुक्यातील काही गावात गारपीटसह पाऊस झाला. यामुळे गहू, हरभरा, कांदा, भाज्यांसह रब्बी पिकांचं नुकसान झालं आहे. तसंच विदर्भातील अमरावती, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यात गारपीट तर गोंदिया जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे.
Published on: 12 February 2024, 10:42 IST